चार वर्षे प्रचंड उत्पात घडवून १९१८ साली पहिले महायुद्ध थांबले.  मात्र त्याने युरोपमध्ये आणि जगात स्थायी स्वरूपाची शांतता प्रस्थापित होऊ शकली नव्हती. विविध देशांतील हेवेदावे पूर्णपणे मिटले नव्हते. युद्धाचा हा पूर्णविराम नसून केवळ स्वल्पविराम आहे असेच वाटत होते. त्यामुळे सर्वच प्रमुख देश आगामी संघर्षांसाठी शस्त्रसज्ज होत होते. अमेरिकेच्या स्प्रिंगफिल्ड आर्सेनलमधील  जॉन गरँड यांनी १९२० च्या दशकात .३० कॅलिबरची रायफल  डिझाइन केली होती.  ती १९३६ साली अमेरिकी सैन्याने अधिकृत रायफल म्हणून स्वीकारली. ती एम-१ गरँड रायफल म्हणून ओळखली गेली.

एम-१ गरँड ही मजबूत, सेमी-ऑटोमॅटिक, गॅस-ऑपरेटेड रायफल होती. तिच्या मॅगझिनमध्ये ८ गोळ्या मावत. त्यातून एका मिनिटाला १६ ते २४ गोळ्या झाडता येत. तिचा एकूण पल्ला ११०० मीटर असला तरी ती ४२० मीटपर्यंत प्रभावी आणि अचूक मारा करू शकत असे. अमेरिकी जनरल जॉर्ज पॅटन यांनी  एम-१ गरँड रायफलचे वर्णन आजवर डिझाइन करण्यात आलेले सर्वात चांगले आणि जगातील सर्वात घातक शस्त्र म्हणून केले होते. अमेरिकी लष्कराने ती स्वीकारल्यानंतर  १९५७ पर्यंत तिच्या साधारण ५४ लाख प्रती निर्माण केल्या गेल्या होत्या.  एम-१ गरँड रायफलने अमेरिकी सैनिकांची दुसरे महायुद्ध, कोरियन युद्ध आणि व्हिएतनाम युद्धापर्यंत साथ केली.

या बंदुकीत एक त्रुटी होती. तिच्या गोळ्या संपल्या की गोळ्या ज्यात बसवलेल्या असत ती धातूची क्लिप ‘पिंग’ असा आवाज करत बाहेर पडे. त्या आवाजाने शत्रूला बंदूक रिकामी झाल्याचे कळत असे आणि तो त्या सैनिकाला मारत असे. अशा पद्धतीने अमेरिकेचे अनेक सैनिक मारले गेले. पण त्यावर मात करण्यासाठी अमेरिकी सैनिकांनी लवकरच एक शक्कल शोधून काढली. ते रायफल पूर्ण भरून तयार ठेवत आणि एखादी मोकळी क्लिप कठीण जमिनीवर फेकत. त्याच्या आवाजाने शत्रूसैनिकाला अमेरिकी सैनिकाची रायफल रिकामी असल्याचा समज होऊन तो डोके वर काढत असे आणि मारला जात असे.

एम-१ रायफलचे निर्माते जॉन गरँड यांची कहाणीही तितकीच उद्बोधक आहे.  जॉन गरँड यांचा जन्म १ जानेवारी १८८८ रोजी कॅनडातील क्युबेक येथे झाला. वयाच्या ११ व्या वर्षी ते कनेक्टिकट येथील कापड कारखान्यात जमीन (फरशी) पुसण्याचे काम करत. पण यंत्रसामग्रीमध्ये त्यांना विलक्षण रस होता. फावल्या वेळात त्यांनी या कारखान्यातील सर्व यंत्रांचे काम जाणून घेतले होते. वयाच्या १८व्या वर्षी ते त्या कारखान्यात मशिनिस्ट म्हणून काम करू लागले होते.

नोव्हेंबर १९१९ मध्ये ते मॅसॅच्युसेट्स येथील स्प्रिंगफिल्ड आर्मरीमध्ये काम करू लागले आणि तेथेच चीफ सिव्हिलियन इंजिनियर बनले. तेथेच त्यांनी एम-१ रायफल बनवली आणि अन्य  शस्त्रांचा विकास केला. मात्र त्याबद्दल संपूर्ण सेवाकाळात त्यांना सरकारी पगाराशिवाय वेगळे काहीही मिळाले नाही. गरँड यांच्या योगदानाबद्दल त्यांना काही आर्थिक लाभ मिळाला पाहिजे अशी मागणी होऊ लागली. पण त्यांना १ लाख डॉलरची मदत करण्याचा प्रस्ताव अमेकिी काँग्रेसमध्ये चर्चेला आला तेव्हा तो संमत झाला नाही. गरँड यांना १९४१ साली मेडल फॉर मेरिटोरियस सव्‍‌र्हिस आणि १९४४ साली गव्हर्नमेंट मेडल फॉर मेरिट ही सन्मानपदके मिळाली. गरँड १९५३ साली सेवनिवृत्त झाले आणि १६ फेब्रुवारी १९७४ साली त्यांचे निधन झाले.

 

सचिन दिवाण – sachin.diwan@ expressindia.com