एका व्यक्तीच्या प्रयत्नांचा संपूर्ण शस्त्रास्त्र उद्योगावर परिणाम झाल्याची खूप कमी उदाहरणे आहेत. त्यात अमेरिकेतील सॅम्युएल कोल्ट यांचा क्रमांक नक्कीच अव्वल लागतो. आधुनिक रिव्हॉल्व्हरचा हा जनक. किंबहुना कोल्ट आणि रिव्हॉल्व्हर हे समीकरण अगदी पक्के आहे. कोल्ट यांच्या कंपनीने विविध काळात जी शस्त्रे विकसित केली त्यांनी त्या-त्या काळावर आपली छाप पाडली आहे. सॅम्युएल कोल्ट यांच्या व्यक्तिमत्त्वात संशोधक, उद्योजक, विपणनतज्ज्ञ (मार्केटिंग एक्स्पर्ट), जाहिरातकार आणि पेटंटचा (बौद्धिक संपदा हक्क) जागरूक पुरस्कर्ता अशा अनेक गुणांचा समुच्चय आढळतो. त्यामुळे कोल्ट यांच्या रिव्हॉल्व्हर्ससह त्यांच्या जीवनाचा आढावा घेणेही क्रमप्राप्त ठरते.

सॅम्युएल कोल्ट यांना अगदी लहानपणापासून बंदुकांमध्ये विलक्षण रस आणि गती होती. त्यांच्या वडिलांनी या उनाड मुलाला शिस्त लावण्यासाठी १६व्या वर्षी अमेरिका ते लंडन आणि कलकत्ता अशा जहाजप्रवासाचे तिकिट काढून दिले. त्यात जहाजाच्या सुकाणूचे निरीक्षण करताना त्यांना बंदुकीतून एका वेळी अनेक गोळ्या झाडण्यासाठी त्या चाकासारखी फिरणाऱ्या यंत्रणेची रचना करण्याची कल्पना सुचली. त्यातूनच रिव्हॉल्व्हरचे डिझाइन आकाराला आले आणि १८३६ साली कोल्ट यांच्या ‘पॅटरसन’ नावाच्या पहिल्या रिव्हॉल्व्हरचा जन्म झाला. गोळ्या ज्यात भरल्या जात ते चेंबर गोलाकार फिरते (रिव्हॉल्व्ह होते) म्हणून अशा बंदुकीला रिव्हॉल्व्हर म्हणतात. त्यात एका वेळी पाच गोळ्या भरण्याची सोय होती. न्यू जर्सीतील पॅटरसन या ठिकाणी पेटंट आम्र्स कंपनीतर्फे त्यांची निर्मिती होऊ लागली म्हणून त्या प्रकारच्या रिव्हॉल्व्हरला पॅटरसन म्हटले जाऊ लागले.

मात्र त्या काळात अद्याप धातूच्या एकत्रित काडतुसांचा वापर सुरू झाला नव्हता. कोल्ट पॅटरसनमध्ये गनपावडर आणि गोळ्या वेगवेगळ्या भरून ठासाव्या लागत. त्यानंतर त्या झाडता येत असत. या प्रक्रियेत वेळ जात असे. या काळात अमेरिकेतील युरोपीय वंशाचे लोक पश्चिमेकडे आणि अन्य दिशांना त्यांच्या प्रदेशाचा विस्तार करत होते. त्यात त्यांचा सामना स्थानिक आदिवासींशी होत असे. पॅटरसन रिव्हॉल्व्हर एकदा लोड केले की एका दमात पाच गोळ्या डागता येत असत, पण ते पुन्हा भरेपर्यंत आदिवासींनी दहा बाण सोडलेले असत. त्यामुळे युद्धाच्या धामधुमीत पॅटरसन रिव्हॉल्व्हर निष्प्रभ ठरू लागले. कोल्ट यांनी पॅटरसन रिव्हॉल्व्हर अमेरिकी सैन्याला विकण्याचाही प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी राजधानी वॉशिंग्टनचा दौरा केला. सैन्याने पॅटरसनच्या स्वतंत्रपणे चाचण्या घेतल्या. लोडिंगमधील किचकटपणामुळे ते सैन्याच्या पसंतीस उतरले नाही आणि त्याला नकार मिळाला. १८३६ ते १८४२ या काळात साधारण २८०० पॅटरसन रिव्हॉल्व्हर तयार करण्यात आल्या. कोल्ट यांचा सुरुवातीचा प्रयत्न फारसा यशस्वी झाला नसला तरी एका दमात पाच गोळ्या डागण्याच्या कल्पनेचा मनोवैज्ञानिक परिणाम मोठा होता.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com