दुसऱ्या महायुद्धात फ्रान्समध्ये जर्मनीकडून पराभव पत्करावा लागल्याने ब्रिटन अडचणीत आले होते. डंकर्क येथून माघार घेताना ब्रिटिशांच्या सैन्याला मोठय़ा प्रमाणात अवजड साहित्य आणि युद्धसामग्री मागे सोडून द्यावी लागली होती. त्यामुळे १९४०-४१ दरम्यान ब्रिटनला शस्त्रास्त्रांचा तुटवडा जाणवत होता. नवी शस्त्रे डिझाइन करून त्यांचे उत्पादन सुरू करण्यात वेळ जाणार होता. अमेरिका आदी मित्र देशांकडून मिळणारी शस्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण देण्यातही वेळ जात होताच.

अशा काळात ब्रिटनने त्वरित मोठय़ा प्रमाणात उत्पादन करता येतील अशी कामचलाऊ स्वरूपाची शस्त्रे तयार केली. त्यातही अवजड आणि अधिक प्रगत रणगाडे करणे शक्य झाले नाही. म्हणून मध्यम व कमी वजनाचे पण वेगवान क्रुझर रणगाडे विकसित करण्यावर भर दिला. तसेच ब्रिटनमधून युद्धभूमीवर रणगाडे वाहून नेताना रेल्वेचा आकार लक्षात घेऊन त्याच मापाचे रणगाडे बनवावे लागत होते. या कारणांनी ब्रिटनचे युद्धाच्या उत्तरार्धातील बहुतांश रणगाडे शत्रूपेक्षा कमी जाडीच्या चिलखताचे आणि थोडे कमी प्रतीचे होते.

मिडियम टँक्सचा वेग कमी होता आणि लाइट टँक्सचे चिलखत आणि मारक क्षमता कमी होती. त्यावर उपाय म्हणून ब्रिटनने क्रुझर रणगाडे तयार केले. त्यातील पहिला रणगाडा होता ए-९ क्रुझर मार्क १. सर जॉन कार्डन यांनी त्याचे डिझाइन बनवले होते. तो १९३८ मध्ये युद्धाच्या एक वर्ष अगोदर तयार झाला होता. याच मालिकेत पुढे ए-१० क्रुझर मार्क २ ए, ए-११ माटिल्डा १, ए-१२ माटिल्डा २, ए-१३ क्रुझर मार्क ३ आणि ४, ए-१३ मार्क ५ कॉव्हेनांटर, ए-१५ क्रुसेडर, ए-१७ टेट्रार्क, ए-२२ चर्चिल, ए-२४ कॅव्हॅलिअर, ए-२५ हॅरी हॉपकिन्स, ए-२७- सेंटॉर, ए-२७ एम क्रॉमवेल, ए-३० चॅलेंजर, ए-३० अ‍ॅव्हेंजर, ए-३३ हेवी असॉल्ट टँक एक्सेलसियर, ए-३४ कॉमेट, ए-३८ व्हॅलियंट, ए-३९ हेवी असॉल्ट टँक टॉरटॉइज, ए-४३ ब्लॅक प्रिन्स हे रणगाडे तयार केले गेले. त्यातील ए-१० क्रुझरचे काही सुटे भाग वापरून व्हॅलेंटाइन हा रणगाडा तयार केला होता. यापैकी चर्चिल हा विशेष नावाजलेला रणगाडा त्याची सुरुवातीच्या मार्क १ या आवृत्तीत अनेक त्रुटी होत्या. त्या सुधारून मार्क ६ आवृत्ती तयार केली होती. ती बरीच प्रभावी आणि अद्ययावत होती.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com