‘लाँग लॅण्ड पॅटर्न मस्केट’ जशी ब्रिटिश साम्राज्यविस्तारास उपयोगी पडली तशीच त्यापुढील ‘एनफिल्ड पॅटर्न १८५३ रायफल्ड मस्केट’ भारतीयांसाठी घातक ठरली. १८५७चा उठाव घडण्यास आणि त्यात भारतीयांचा पराभव होण्यास कारणीभूत ठरली ती हीच ‘एनफिल्ड पॅटर्न १८५३ रायफल्ड मस्केट’.

त्यापूर्वीचा शतकभराहून अधिक काळ  ‘लाँग लॅण्ड पॅटर्न मस्केट’ने गाजवला होता. मात्र ती स्मूथ बोअर गन असल्याने तिची अचूकता कमी होती. रायफलिंगच्या शोधाने त्यावर उपाय मिळाला होता. व्हिएन्ना येथील गॅस्पर्ड कोलनर यांनी १५व्या शतकात बंदुकीच्या नळीच्या आतील पृष्ठभागावर दोन सरळ खाचा पाडून बंदुकीच्या गोळीची अचूकता वाढते हे दाखवून दिले होते. त्यानंतर न्यूरेंबर्ग येतील ऑगस्टस कोटर यांनी १५२० साली बंदुकीच्या नळीतील या खाचांना लांबट सर्पिलाकार आकार दिला. त्याने अचूकतेत आणखी भर पडली. गन बॅरलच्या आतील पृष्ठभागावर असे आटे पाडण्याला रायफलिंग करणे म्हणतात. तसे आटे पाडलेल्या बंदुकीला रायफल म्हणतात. ‘एनफिल्ड पॅटर्न १८५३’ ही तशी रायफल होती. त्यामुळे तिची अचूकता त्यापूर्वीच्या स्मूथ बोअर ब्राऊन बेसपेक्षा जास्त होती.

एनफिल्ड रायफल ब्रिटनमध्ये १८५३ साली वापरात आली. त्यानंतर ब्रिटिशांनी १८५६ सालाच्या अखेरीस भारतातील ईस्ट इंडिया कंपनीच्या सैनिकांच्या ब्राऊन बेस बंदुका बदलून एनफिल्ड पॅटर्न १८५३ बंदुका देण्यास सुरुवात केली. या नव्या बंदुकांच्या काडतुसांना गायीची आणि डुकराची चरबी लावली असल्याच्या अफवा पसरल्या. ती कागदी काडतुसे दाताने फाडून गनपावडर आणि गोळी बंदुकीत ठासून भरावी लागत असे. त्याला हिंदू आणि मुस्लीम दोन्ही सैनिकांनी विरोध केला. अखेर तोपर्यंत साठलेल्या असंतोषाचा उद्रेक झाला. बंगालमधील बराकपूर येथील छावणीत २९ मार्च १८५७ रोजी ३४व्या बंगाल नेटिव्ह इन्फंट्रीच्या ६व्या कंपनीतील शिपाई मंगल पांडे यांनी ब्रिटिश वरिष्ठ अधिकारी लेफ्टनंट बॉ याच्यावर हल्ला केला आणि उठावाची ठिणगी पडली.

या उठावात सुरुवातीला काही ठिकाणी बंडखोर भारतीय सैनिकांची सरशी झाली. पण पुढे बराच कालापव्यय केल्याने आणि अन्य कारणांमुळे भारतीयांचा पराभव झाला. ब्रिटिशांच्या सैन्याचा उत्तम समन्वय, तारायंत्र आदी वरचढ तंत्रज्ञानाचा ब्रिटिशांच्या विजयात जसा मोठा वाटा होता तसाच तो एनफिल्ड पॅटर्न १८५३ रायफलचाही होता. तिचा एकूण पल्ला १२५० यार्ड (११४० मीटर) इतका होता आणि त्यातील बऱ्याच अंतरापर्यंत अचूक नेम लागत असे. त्याउलट भारतीय सैनिकांकडील ब्राऊन बेस फारतर ५० ते १०० यार्डापर्यंत अचूक मारा करू शकत. त्यामुळे ब्रिटिश सैनिकांची भारतीयांवर सरशी झाली.

बहुतांश ब्रिटिश इतिहासकारांनी ही बाब वर्णवर्चस्वाच्या भावनेतून जाणूनबुजून झाकलेली दिसते. मात्र ब्रिटिश लेखक एस. एस. थॉरबर्न यांनी त्यांच्या लिखाणात मान्य केले आहे, की भारतीय सैनिकांनी एनफिल्ड रायफल स्वीकारून त्यानंतर उठाव केला असता तर तो दडपण्यास ब्रिटिशांना खूप अवघड ठरले असते आणि ब्रिटिशांच्या अडचणी बऱ्याच वाढल्या असत्या.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com