18 April 2019

News Flash

फ्रेंच मिराज-२००० : अण्वस्त्रवाहू लढाऊ विमान

रशियन मिग-२९ आणि सुखोई-२७/३०, स्वीडनचे ग्रिपेन या विमानांचा समावेश होतो.

फ्रेंच मिराज-२००० लढाऊ विमान

फ्रान्सच्या दसाँ एव्हिएशन कंपनीने १९७०च्या दशकात विकसित केलेले मिराज-२००० हे बहुउद्देशीय लढाऊ विमान (मल्टिरोल फायटर एअरक्राफ्ट) जगातील अत्याधुनिक आणि आघाडीच्या लढाऊ विमानांमध्ये गणले जाते. अमेरिकेच्या एफ-१५ आणि एफ-१६ या विमानांच्या तोडीची मोजकीच विमाने जगात आहेत. त्यात फ्रान्सचे मिराज-२००० आणि राफेल, युरोपीय देशांनी एकत्रितपणे विकसित केलेली युरोफायटर टायफून आणि टॉरनॅडो, रशियन मिग-२९ आणि सुखोई-२७/३०, स्वीडनचे ग्रिपेन या विमानांचा समावेश होतो.

दसाँ कंपनीची मिराज-एफ१ आणि मिराज-३ ही विमाने १९६० आणि १९७०च्या दशकांत जगभरात प्रसिद्ध होती. ही विमाने जुनी झाल्यानंतर त्यांना बदलण्यासाठी फ्रान्सने मिराज-२००० विमानाची रचना केली. त्याच्या पहिल्या प्रारूपाचे उड्डाण १९७८ मध्ये झाले आणि १९८३ पासून मिराज-२००० फ्रेंच हवाई दलात सामील होण्यास प्रारंभ झाला. मिराज-२००० विमानांनी फ्रान्सला पुन्हा जागतिक विमान उद्योगात आघाडी मिळवून दिली. मिराज-२००० हे वजनाला हलके, आकाराने आटोपशीर, वेगवान, चपळ आणि संहारक लढाऊ विमान आहे. त्याला शेपटाकडील लहान पंख (टेल विंग्ज) नाहीत.  त्रिकोणी आकाराचे मुख्य पंख (डेल्टा विंग्ज) हे मिराज-२०००चे वैशिष्टय़. त्यामुळे त्याला वेगाने हवाई कसरती किंवा डावपेच करण्यास मदत मिळते. त्याची स्नेक्मा एम-५३ पी-२ टबरेफॅन इंजिने ब्रिटिश आणि अमेरिकी जेट इंजिनांपेक्षा वजनाला हलकी, सुटसुटीत आणि प्रभावी आहेत. त्याने मिराज-२००० विमानांना ताशी कमाल २३३८ किमी इतका वेग मिळतो. त्याचा पल्ला १८५० किमी आहे. ते एका मिनिटात ५६,००० फूट उंची गाठते.

मिराजवरील शक्तिशाली डॉप्लर रडार एका वेळी २४ लक्ष्यांचा माग काढू शकते. रडारची ‘लुक डाऊन, शूट डाऊन’ क्षमता विमानाखालील हवेतील लक्ष्ये टिपण्यास मदत करते. मिराज-२००० वर दोन ३० मिमी व्यासाच्या कॅनन, ६३०० किलो वजनाची शस्त्रास्त्रे वाहून नेण्याची सोय आहे. मिराजवरून अण्वस्त्रांसह, लेझर गायडेड बॉम्ब, स्मार्ट बॉम्ब, मात्रा मॅजिक आणि मायका ही हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि एक्झोसेट ही हवेतून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे डागता येतात. मिराज-२००० विमानांनी बोस्निया आणि कोसोवो संघर्षांत भाग घेतला होता. भारतीय हवाई दलातील मिराज-२००० (वज्र) विमाने कारगिल युद्धात वापरली गेली.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com

 

 

First Published on August 27, 2018 1:03 am

Web Title: different types of weapons part 90