25 March 2019

News Flash

कलाशनिकोव्ह आणि एके मालिका : एक आख्यायिका

रुग्णालयातील वास्तव्यात त्यांनी देशासाठी चांगली असॉल्ट रायफल तयार करण्याचा ध्यास घेतला.

मिखाइल टिमोफेयेविच कलाशनिकोव्ह यांचा जन्म सोव्हिएत युनियनमधील कुर्या येथे १० नोव्हेंबर १९१९ साली झाला. दुसऱ्या महायुद्धात ते सोव्हिएत युनियनच्या लाल सेनेत टँक कमांडर होते. अ‍ॅडॉल्फ हिटलरने ऑपरेशन बार्बारोझा सुरू केले आणि नाझी फौजांनी सोव्हिएत प्रदेशात खोलवर मुसंडी मारली. ऑक्टोबर १९४१ मध्ये ब्रायन्स येथील लढाईत जर्मन सैन्याविरुद्ध टी-३४ रणगाडय़ावरून लढताना कलाशनिकोव्ह जखमी झाले. ते एप्रिल १९४२ पर्यंत रुग्णालयात उपचार घेत होते.

चांगल्या असॉल्ट रायफलच्या अभावी सोव्हिएत सेनेची वाताहत झाली याचे शल्य कलाशनिकोव्ह यांना फार लागले होते. रुग्णालयातील वास्तव्यात त्यांनी देशासाठी चांगली असॉल्ट रायफल तयार करण्याचा ध्यास घेतला. जखमी सैनिकांशी तासन्तास चर्चा करून रायफलसंबंधी त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या आणि नवी रायफल डिझाइन केली. सोव्हिएत सेनेने दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस रायफल डिझाइन करण्याची स्पर्धा ठेवली होती. त्यात कलाशनिकोव्ह यांच्या रायफलचा प्रथम क्रमांक आला. सोव्हिएत सेनेने १९४७ साली ती स्वीकारली आणि १९४९ साली ही नवी रायफल सेनेच्या हाती पडली. कलाशनिकोव्ह यांनी जर्मन श्टुर्मगेवेर -४४ या रायफलच्या धर्तीवर एके-४७चे डिझाइन तयार केले, असा आरोप होतो. पण कलाशनिकोव्ह यांनी त्याचा इन्कार केला होता.

इझमश ही ‘एके-४७’ची निर्माती कंपनी रशियातील इझेवस्क नावाच्या गावात वसली आहे. या गावाची खासियत म्हणजे तेथील पूर्वापार व्यवसाय शस्त्रास्त्रे बनवण्याचा. अ‍ॅडॉल्फ हिटलरच्या नाझी जर्मन आक्रमणाच्या शतकभरापूर्वी नेपोलियनने रशियावर आक्रमण केले होते. त्याचाही तसाच पराभव झाला होता आणि त्या युद्धात रशियाने वापरलेल्या तोफाही इझेवस्क गावातील कारखान्यांतच बनल्या होत्या. तेथील मूळ कारखान्यात आता ‘एके-४७’चे उत्पादन होणे बंद झाले आहे. युद्धकाळात पुरुष आघाडीवर लढण्यासाठी गेले असल्याने येथील बऱ्याचशा कामगार स्त्रिया होत्या. त्या त्यांच्या कामात इतक्या पटाईत होत्या की त्यांच्याबद्दल गमतीने म्हटले जायचे – या महिलांना कोणत्याही कारखान्यात नेऊन सोडले तरी तेथील अंतिम उत्पादन एके-४७ च असेल.

आता बाजारात येणाऱ्या ‘एके-४७’ रशियाच्या मित्रदेशांत परवान्याने बनवलेल्या किंवा आंतरराष्ट्रीय शस्त्रास्त्रांच्या काळ्या बाजारातून आलेल्या ‘पायरेटेड कॉपीज’ असतात. अनेकांना ‘एके-५६’ ही त्याच श्रेणीतील पुढील बंदूक वाटते. पण ती ‘एके-४७’ची चिनी नक्कल किंवा आवृत्ती आहे. कालाशनिकोव्ह यांनी पुढे एकेएम, एके-७४, पीके मशिनगन, आरपीके लाइट मशिनगन आदी बंदुकाही तयार केल्या. ही सर्व मालिका जगभर खूपच गाजली. एके-७४ रायफलमध्ये पूर्वीच्या ७.६२ मिमी व्यासाच्या गोळ्यांऐवजी ५.४५ मिमी व्यासाच्या गोळ्या वापरल्या जात. एके-१०१, १०२, १०३ या बंदुकाही अस्तित्वात आहेत. कलाशनिकोव्ह रशियन सैन्यातून लेफ्टनंट जनरलच्या हुद्दय़ावरून निवृत्त झाले. २३ डिसेंबर २०१३ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांना यूएसएसआर स्टेट प्राइझ, हिरो ऑफ सोशलिस्ट लेबर, लेनिल प्राइझ, स्टालिन प्राइझ, हिरो ऑफ द रशियन फेडरेशन, ऑर्डर ऑफ सेंट अँड्रय़ू, ऑर्डर फॉर मेरिट टू द फादरलँड आदी पुरस्कार मिळाले होते. ते जिवंतपणीच एक आख्यायिका बनले होते.

sachin.diwan@expressindia.com

First Published on March 7, 2018 4:27 am

Web Title: kalashnikov rifle ak rifle