शीतयुद्धाच्या सुरुवातीच्या काळात सोव्हिएत युनियनने तयार केलेला ‘टी-५४’ हा रणगाडा जगातील सर्वाधिक उत्पादन झालेला रणगाडा मानण्यात येतो. त्याच्या विविध आवृत्ती मिळून ८६ हजार ते १ लाख रणगाडे तयार झाल्याचा अंदाज आहे. त्या खालोखाल क्रमांक लागतो तो सोव्हिएत युनियनच्याच दुसऱ्या महायुद्धात वापरलेल्या ‘टी-३४’ या रणगाडय़ाचा.

सोव्हिएत युनियनने १९४७ साली ‘टी-५४’ चा विकास सुरू केला आणि १९४९ साली हा रणगाडा सोव्हिएत सैन्यात दाखल झाला. त्याच्यावरील चिलखताची जाडी २०३ मिमी (८ इंच) होती आणि त्यावर १०० मिमी व्यासाची मुख्य तोफ आणि मशिनगन होत्या. ३५ टन वजनाचा हा रणगाडा ताशी ४८ किमी वेगाने एका दमात ४०० किमीचे अंतर पार करू शकत असे.

याचे वैशिष्टय़ म्हणजे उंचीला कमी असलेले ‘हल’ (मुख्य बॉडी) आणि मश्रुमच्या आकाराचे गन टरेट. कमी उंचीमुळे हा रणगाडा शत्रूच्या माऱ्याला सहजासहजी बळी पडत नसे. पुढे सर्वच रशियन रणगाडय़ांची ही खासियत बनली.

टी-५४ च्या टी-५४ ए, टी-५५ बी आदी अनेक आवृत्ती विकसित होत गेल्या. मूळ रणगाडय़ाला आण्विक हल्ल्याच्या वातावरणात लढण्याची क्षमता देऊन टी-५५ ही सुधारित आवृत्ती तयार केली होती. त्याचे चिलखत अधिक जाड आणि इंजिन अधिक प्रभावी होते. दुसऱ्या महायुद्धानंतर सोव्हिएत प्रभावाखालील वॉर्सा पॅक्ट संघटनेतील ४० देशांना टी-५४ आणि टी-५५ या आवृत्तींचा भरपूर पुरवठा केला होता. झेकोस्लोव्हाकिया, रुमानिया, पोलंड, चीन अशा अनेक देशांसह खुद्द सोव्हिएत युनियनमध्ये त्याचे १९९० च्या दशकापर्यंत उत्पादन होत होते. चीनने या रणगाडय़ाची टाइप-६९ नावाने आवृत्ती तयार केली. शीतयुद्धात अन्य कोणत्याही रणगाडय़ापेक्षा अधिक संघर्ष या रणगाडय़ाने पाहिलेला आहे.

अरब देश आणि इस्रायलमधील १९६७ चे ‘सिक्स डे वॉर’ आणि १९७३ चे योम किप्पूर युद्ध यात टी-५४/५५ रणगाडय़ांचा भरपूर वापर झाला. इस्रायलने युद्धात अरब देशांकडून १००० हून अधिक टी-५४/५५ रणगाडे काबीज केले आणि त्यांच्या सैन्यात वापरले. इस्रायलने या रणगाडय़ांवरील रशियन १०० मिमीची तोफ बदलून १०५ मिमीची तोफ बसवली आणि रशियन इंजिन बदलून जनरल मोटर्स कंपनीचे डिझेल इंजिन बसवले. इस्रायलने या रणागाडय़ांना ‘तिरान-५’ असे नाव दिले.

टी-५४/५५ रणगाडय़ांनी १९८० ते १९८८ दरम्यानचे इराण-इराक युद्ध, व्हिएतनाम युद्ध, युगोस्लाव्हियाच्या विघटनानंतरचे बाल्कन युद्ध अशा अनेक संघर्षांत महत्त्वाची भूमिका बजावली.

सचिन दिवाण

sachin.diwan@ expressindia.com