रणगाडय़ावर सुरुवातीला साधारण १२ मिलीमीटर (अर्धा इंच) जाडीचे पोलादी पत्र्याचे चिलखत होते. जर्मन ७.९२ मिमी व्यासाची ‘के-बुलेट’ ते चिलखत भेदू शकत असे. १९४५ साली रणगाडय़ांच्या तोफा ८५० मीटर प्रतिसेकंद वेगाने गोळा डागून १०० मीटर अंतरावरून १५० ते २०० मिमी (६ ते ८ इंच) जाड चिलखत भेदू शकत. आज रणगाडय़ांच्या तोफा १७५० मीटर प्रतिसेकंद वेगाने तोफगोळे डागून २ किलोमीटरवरून ६०० मिमी (२३.६ इंच) जाड चिलखत भेदू शकतात. गन स्टॅबिलायझेशन, बॅलिस्टिक कॉम्प्युटर, इन्फ्रारेड आणि लेझर रेंजफाईंडर आदीनी तोफांची परिणामकारकता वाढली.

त्यांना थोपवण्यासाठी चिलखताची जाडीही वाढत गेली. तसेच ते बनवण्याच्या पद्धतीही बदलत गेल्या. सुरुवातीला रोल्ड स्टील प्लेट्सचे चिलखत असे. नंतर ‘काब्र्युरायझिंग’ तंत्र वापरून अधिक कठीण पोलाद तयार होऊ लागले. त्याचे चिलखत बनवले गेले. मग दोन्ही प्रकारचे चिलखत एकत्र करून ‘सिमेंटेड आर्मर’ तयार झाले.

त्याच वेळी चिलखत भेदणारी शस्त्रेही विकसित होत होती. ब्रिटनने १९४० च्या दशकात हाय एक्स्प्लोझिव्ह स्क्वाश हेड (हेश) प्रकारचे रणागाडाविरोधी स्फोटक शस्त्र तयार केले. त्याचा फ्यूज थोडा हळू कार्यान्वित होत असे. त्याने तोफगोळ्यातील स्फोटक रणगाडय़ाच्या पृष्ठभागावर पसरून मग त्याचा स्फोट होत असे. त्याने रणगाडय़ावर जोरात ठोसा मारल्यासारखा परिणाम होऊन रणगाडय़ाच्या चिलखताचे आतल्या बाजूला तुकडे निघून सैनिकांना लागत. हाय एक्स्प्लोझिव्ह अँटि-टँक (हिट) प्रकारच्या रणगाडाभेदी शस्त्रात शेप्ड चार्ज वापरलेला असतो. त्याने तोफगोळा रणगाडय़ावर आदळताना गोळ्यातील धातू वितळून त्याचा वेगवान फवारा रणगाडय़ावर सांडून चिलखत भेदले जाते. तसेच आर्मर-पियर्सिग डिस्कार्डिग सॅबो (एपीडीएस) आणि आर्मर-पियर्सिग फिन-स्टॅबिलाइज्ड डिस्कार्डिग सॅबो (एपीएफएसडीएस) प्रकारचे रणगाडाभेदी गोळे टणक धातूच्या टोकदार कांबीचा अतिवेगाने मारा करून चिलखत भेदतात.

त्यांच्यावर उपाय म्हणून क्रोमियम, मॉलिब्डेमन, निकेल, टंगस्टन आणि अखेर डिप्लिटेड युरेनियम असे कठीण धातू आणि मित्रधात वापरून तसेच कॉम्पोझिट प्रकारची रणगाडय़ांची चिलखते बनवली जाऊ लागली. वितळलेल्या धातूचा गरम झोत वापरून चिलखत फोडणाऱ्या शस्त्रांविरुद्ध ब्रिटिश ‘चोभम’ नावाचे चिलखत विकसित झाले. त्यात धातूच्या आवरणामध्ये सिरॅमिक ब्लॉक्सचा वापर केलेला असतो.

रणगाडभेदी शस्त्रांपासून बचाव करण्यासाठी चिलखताचे अन्य प्रकारही विकसित झाले. त्यात सोपा उपाय म्हणजे मुख्य चिलखताबाहेर रणगाडय़ावर धातूच्या सळ्यांचा पिंजरा (बार आर्मर) बसवला जातो. त्याने तोफगोळ्याची स्फोटक ऊर्जा विखुरली जाते आणि रणगाडा वाचतो. आणखी एक प्रकार म्हणजे एक्स्प्लोझिव्ह रिअ‍ॅक्टिव्ह आर्मर (ईआरए). त्यात रणगाडय़ाच्या मूळ चिलखतावर धातूच्या पट्टय़ांमध्ये सँडविचप्रमाणे स्फोटक भरलेले असते. शत्रूच्या रणगाडाभेदी शस्त्राचा त्यावर आघात झाला की त्याचा रणगाडय़ाच्या बाहेरच्या बाजूला स्फोट होऊन तोफगोळा किंवा क्षेपणास्त्र बाहेर ढकलले जाते. त्याच्या पुढे जाऊन रशियन ‘श्टोरा’ प्रणाली संवेदक (सेन्सर) आणि ‘जॅमर’ वापरून शत्रूच्या क्षेपणास्त्राला बाजूला वळवते. रणगाडय़ाचा बचाव करण्यासाठीच्या नव्या तंत्रज्ञानात  त्याला लपवण्याचे (स्टेल्थ) तंत्रज्ञान विकसित होत आहे. त्यासाठी धुराचे लोट पसरवणारे स्मोक ग्रेनेड्स वापरले जातात. रणगाडय़ातून उत्सर्जित होणारी उष्णता वारून शत्रू रडारवर त्यांचा शोध लावू शकतो. ही उष्णता रोखण्यासाठी इन्फ्रारेड सप्रेसिव्ह पेंट (रंग), थर्मल क्लॅडिंग (कपडे) किंवा इन्सुलेशन, रेडिएशन अ‍ॅब्सर्ॉबट कोटिंग आदींचा वापर होत आहे. तसेच रणगाडय़ावर सभोवतालच्या वातावरणाची चित्रे ‘प्रोजेक्ट’ करून त्याला वातावरणात बेमालूमपणे लपवण्याचे प्रयत्न होत आहेत.

sachin.diwan@expressindia.com