युद्धभूमीवर जसा रणगाडय़ांचा वापर आणि प्रभाव वाढला तसतशी त्यांना भेदणारी शस्त्रेही वापरात आली. त्यात बझुका, रिकॉइललेस गन (मागे झटका न बसणारी छोटी तोफ), आरपीजी (रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेड) आदी शस्त्रांचा समावेश होतो. ही शस्त्रेदेखील तोफखान्याचेच एक अंग आहेत. त्यांनीही युद्धभूमीवर मोठा प्रभाव पाडला आहे.

नेहमीच्या तोफा डागल्यानंतर न्यूटनच्या गतिविषयक नियमानुसार- क्रिया आणि प्रतिक्रिया- तोफगोळा पुढे सुटला की मागे तोफेलाही तेवढाच झटका (मझल किंवा रिकॉइल) बसतो. त्याने तोफांच्या वापरावर मर्यादा येतात. हा धक्का किंवा रिकॉइल पूर्ण संपवता आला नाही तरी कमी करणे किंवा शोषून घेणे हे तोफेच्या रचनाकारांचे एक मोठे उद्दिष्ट राहिले आहे. त्यातूनच रिकॉइललेस तोफांचा जन्म झाला. त्यात विशेष उपकरणे वापरून तोफगोळा डागताना निर्माण होणाऱ्या वायूंपैकी ८० टक्के हिस्सा झरोक्यांमधून तोफेच्या मागच्या बाजूस सोडला जातो. त्यामुळे स्फोटाची शक्ती शोषली जाते आणि धक्का बसत नाही किंवा कमी जाणवतो.

या प्रकारात सर्वात प्रसिद्ध असलेले शस्त्र म्हणजे स्वीडनची बोफोर्स कंपनी आणि रॉयल स्वीडिश आम्र्स अ‍ॅडमिनिस्ट्रेशनचे डिझायनर हॅराल्ड जेंटझेन आणि ह्य़ुगो अब्राम्सन यांनी विकसित केले कार्ल गुस्ताव. त्याच्या १९४८ पासून आजवर एम-१, एम-२, एम-३ आणि एम-४ अशा आवृत्ती विकसित झाल्या आहेत. खांद्यावर ठेवून फायर करता येणाऱ्या कार्ल गुस्तावमधून एका मिनिटात ३०० ते १००० मीटपर्यंत सहा गोळे डागता येतात.

१९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धात कंपनी क्वार्टरमास्टर हवालदार अब्दुल हमीद यांनी जीप-माऊंटेड रिकॉइललेस गनने ३ पाकिस्तानी पॅटन रणगाडे उद्ध्वस्त केले होते. त्यांना मरणोपरांत परमवीर चक्र प्रदान करून गौरवण्यात आले.

अशाच प्रकारचे रशियन आरपीजी-७  हे शस्त्र रणगाडे आणि चिलखती वाहनांचे कर्दनकाळ म्हणून ओळखले जाते. सोव्हिएत युनियनने १९६० च्या दशकात हे रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेड लाँचर वापरात आणले. त्यातून विविध प्रकारचे रणगाडाभेदी गोळे २०० ते ५०० मीटर अंतरावर डागता येतात. हाताळण्यास खूप सोपे असलेले हे शस्त्र तितकेच प्रभावी आहे. एकटा सैनिक ते खांद्यावर ठेवून वापरू शकतो. जगातील ४० देशांच्या सैन्यांसह अनेक दहशतवादी आणि फुटीर संघटनांचे हे आवडते हत्यार आहे. व्हिएतनाम, अफगाणिस्तान, इराक, सीरिया आणि अन्य अनेक देशांतील संघर्षांत आरपीजी-७ चा वापर झाला आहे. १९७९ ते १९८९ या दशकात सोव्हिएत युनियनविरुद्ध लढणाऱ्या अफगाण मुजाहिद्दीनांनी आरपीजी-७ वापरत तेथे रशियन रणगाडय़ांची दफनभूमी बनवली होती.

sachin.diwan@expressindia.com