26 March 2019

News Flash

गणेशोत्सवातील संस्कृती-दर्शन : एकत्र कुटुंब पद्धतीसाठी ‘मोठय़ा आरतीचा’ गजर

नोकरीनिमित्त कोकण व अन्य प्रातांतून मुंबईत स्थायिक झालेली या समाजाची अनेक कुटुंबे आहेत.

चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाचा गणेशोत्सवात अनोखा धार्मिक उपचार; एक ते चार तास सलग आरती

एकत्र कुटूंब पद्धतीची मूल्ये जपण्यासाठी चांद्रसेनीय कायस्थ प्रभू (सीकेपी) समाजाने फार पूर्वीपासूनच एक अनोखा धार्मिक उपचार गणेशोत्सव साजरा करताना कायम पाळला आहे. गणपती विसर्जनाच्या आदल्या दिवशी या समाजाच्या बहुतांश कुटुंबांमध्ये विशिष्ठ प्रकारे ‘मोठय़ा आरती’चे आयोजन केले जाते. या वेळी जवळचे सगळे नातेवाईक आणि परिचित आदींना खास निमंत्रण देऊन किमान एक आणि कमाल चार तासांपर्यंत सलग आरती करण्यात येते. मुंबईतील या समाजाच्या कुटुंबांमध्ये आजही ही प्रथा पाळली जात आहे.

नोकरीनिमित्त कोकण व अन्य प्रातांतून मुंबईत स्थायिक झालेली या समाजाची अनेक कुटुंबे आहेत. आपल्या मूळ स्थानावरून मुंबईत येताना या कुटुंबांनी गणेशोत्सव साजरा करण्याच्या विविध प्रथा-परंपरा मुंबई-ठाण्यासारख्या शहरांमध्ये आणल्या. या कुटुंबांमध्ये दीड दिवस, गौरी-गणपती व अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती असले तरी, उत्सवी धाम-धूम ही गौरीसोबत होणाऱ्या गणपती विसर्जनादरम्यान पाहावयास मिळते. कायस्थ समाजातील कुटुंबे वेगवेगळ्या ठिकाणी राहत असली तरी गणपतीला होणाऱ्या ‘मोठय़ा आरती’ला एकत्र जमून उत्सवाचा आनंद घेतात. या मोठय़ा आरतीला १५० वर्षांहून अधिक वर्षांची परंपरा असल्याचे ठाण्यातील रविंद्र नाचणे यांनी सांगितले.

गणपती विसर्जनाच्या आदल्या दिवशी नातेवाईक व परिचित या आरतीसाठी जमतात. रात्री ९ च्या सुमारास आरतीला सुरूवात होते. अंदाजे ६५ वेगवेगळ्या देवी-देवतांच्या आरत्या कायस्थांनीच तयार केलेल्या पुस्तकातून म्हटल्या जातात. आरत्यांच्या चालीही नेहमीच्या आरत्यांपेक्षा वेगळ्या. या वेळी रंगत चढते ती आरत्यांच्या चढा-ओढीने. एकाने एक आरती म्हटली की दुसरा त्यावर मात करण्यासाठी दुसरी एखादी आरती म्हणतो. या वेळी टाळ-झांजांच्या साथीने आरत्या अनेक मिनिटे आळवल्या जातात. ‘आवडी गंगा जळे’.. ही एरव्ही अवघ्या चार मिनिटांत संपणारी आरती अर्धातासही लांबवली जाते. कमीत-कमी एक तास व नातेवाईक मंडळी उत्साहात असल्यास आरती चार तासही रंगते.

नैवैद्याला पंचपक्वान्नांबरोबरच सामिष भोजन

कायस्थांमध्ये गणेशोत्सवादरम्यान वेगवेगळे खाद्यपदार्थ तयार करण्याची पद्धत आहे. आदल्या दिवशी हरताळकापासूनच याला सुरूवात होते. या दिवशी डाळीचे पीठ व नारळाच्या दूधापासून निनावे हा खास पदार्थ तयार करण्यात येतो. तर, पहिल्या दिवशी वालाचे बिर्ढ, उकडीचे मोदक, अळूची व भेंडीची भाजी यांसह पंचपक्वान्नांचा मेनू असतो. विशेष म्हणजे गणपतीच्या नैवेद्यात कांदा-लसूण वापरण्यात येत नाही. तर, गौरी आगमनाच्या दिवशी काही कुटुंबात लाल माठाची भाजी व भाकरी तर काहींकडे नाचणी पीठाचे घावन व चण्याच्या उसळीचा मेनू असतो. परंतु, गौरी आगमनाच्या दुसऱ्या दिवशी मटण वडे किंवा माशाच्या सामिष आहाराचा नैवेद्य गौरीला दाखवण्यात येतो. काही कुटुंबांमध्ये गणपतीभोवती पडदा ठेवून गौरीला मजेशीररित्या सामिष भोजनाचा नैवेद्य दाखविला जातो.

परडी किंवा तेरडय़ाची गौर

कायस्थांमधील काही कुटुंबांमध्ये परडीतून गौर आणली जाते. या परडीत पाच प्रकारची फळे ठेवण्यात येत असून या वेळी घरातील एका कुमारिकेलाच गौर म्हणून पुजले जाते, असे सुधाकर वैद्य यांनी सांगितले. तर, काही कुटुंबांमध्ये तेरडय़ाच्या झाडापासून गौर बनवण्यात येते. एका महिलेचा आकार देऊन तीला मुखवटा लावून दागिने घालण्यात येतात. घरातील महिलाच हे काम करत असून त्या दिवशी रात्री जागरण करून आनंद साजरा करतात.

First Published on September 9, 2016 3:35 am

Web Title: ckp community celebrating ganesh festival with unique ways