चिंचवडमधील ट्रस्टमार्फत ‘मूर्ती आमची किंमत तुमची’ योजना; भक्तांच्या दानाचा विधायक कामांसाठी वापर

आकर्षक, उंच, वेगवेगळय़ा रुपांतील गणेशमूर्तीच्या विक्रीचे बाजारीकरण होत असतानाच चिंचवडमधील एका सेवाभावी संस्थेने ग्राहकांना, नव्हे तर भक्तांना मागतील त्या किमतीत गणेशमूर्ती पुरवण्याचा उपक्रम राबवला आहे. आपल्याला आवडेल त्या गणेश मूर्तीची निवड करायची आणि त्या मूर्तीची आपल्याला योग्य वाटेल एवढी किंमत तेथील दानमंदिरामध्ये ठेवण्यात आलेल्या पाकिटामध्ये जमा करायची, असा ‘मूर्ती आमची किंमत तुमची’ हा अभिनव उपक्रम चिंचवडमध्ये राबविला जात आहे. येथे सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत किंवा सुरक्षारक्षकही नाहीत. तर, माणसातील दातृत्व आणि देवत्वाला साद घालत सुरू झालेला हा उपक्रम आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मधून पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, चिंचवड येथील श्री शंकर महाराज सेवा मंडळ ट्रस्टमार्फत गेल्या तीन वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची विक्री करण्याचा उपक्रम केला जात आहे. माती, हळद, कुंकू, बुक्का गुलाल, गेरू अशा शंभर टक्के नैसर्गिक वस्तूंपासून बनविलेल्या मूर्तीची विक्री केली जाते. मोरया गोसावी मंदिराजवळील मोरया यात्री निवास येथे हे गणेशमूर्तीचे विक्री दालन साकारले असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. अविनाश वैद्य यांनी ‘लोकसत्ता’शी बोलतना दिली. हा ट्रस्ट समाजातील वंचित घटकांसाठी काम करतो. अविनाश पंढरीनाथ झेंडे या दात्याने देहूगावामध्ये ११ गुंठे जागा ट्रस्टला दान म्हणून दिली असून तेथे बेघर, निराधार लोकांसाठी वृद्धालयाची उभारणी करण्यात येणार आहे. त्यासाठी ५० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून ट्रस्टने निधीसंकलनासाठी समाजातील दानशूरांना आवाहन केले असल्याचे डॉ. वैद्य यांनी सांगितले.

‘मूर्ती आमची किंमत तुमची’ हा प्रयोग आम्ही दोन वर्षांपूर्वी अगदी प्रायोगिक तत्त्वावर राबविला होता. त्या वर्षी केवळ तीन मूर्ती विकल्या गेल्या. मात्र, उमेद कायम ठेवून गेल्या वर्षी हा उपक्रम राबविला. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला आणि तब्बल चारशे मूर्तीची विक्री झाली, असे सांगून वैद्य म्हणाले,‘‘लोक येऊन गणेशमूर्तीची निवड करतात. त्याची किंमत दानमंदिरामध्ये ठेवण्यात आलेल्या पाकिटामध्ये जमा करतात. मात्र, ही रक्कम किती हे मूर्ती घेणाऱ्या ग्राहकाने कोणालाही सांगायचे नाही आणि त्यांना कोणी विचारणारही नाही. माणसातील दातृत्वावर विश्वास ठेवूनच हे काम चालते. आनंद पर्वणी काळात तुम्ही ‘नाही रे’ घटकासाठी दानधर्म करावा, असे आवाहन आम्ही ट्रस्टचे कार्यकर्ते करतो. मूर्तीची निवड केल्यानंतर दान मंदिराचे दार उघडले जाते. मूर्ती घेणाऱ्या ग्राहकाने मंदिरामध्ये ठेवलेल्या पाकिटामध्ये रक्कम ठेवून दार ठोठावले की मंदिराची कडी उघडली जाते. मग, ती व्यक्ती बाहेर येते. अशा विश्वासावर हा व्यवहार चालतो, असे वैद्य यांनी सांगितले.

ट्रस्टच्या कामावर विश्वास

श्री शंकर महाराज सेवा ट्रस्टच्या कामावर नागरिकांचा विश्वास आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची विक्री करताना आम्हाला नुकसान होत नाही. या गणेशमूर्ती घडविणाऱ्या मूर्तिकाराला त्याचे पैसे दिल्यानंतर ट्रस्टला सामाजिक कामासाठी पैसे उरतात, असा अनुभव गेल्या वर्षी आला. मागील वर्षी गणेशमूर्तीच्या ३७० पाकिटांमध्ये मिळून पाच हजार रुपये तर, उर्वरित ३० पाकिटांमधून तब्बल सव्वाचार लाख रुपये मिळाले होते, असे डॉ. अविनाश वैद्य यांनी सांगितले.