24 January 2021

News Flash

आर्थिक मंदीच्या गणेशोत्सवावर पावसाचेही पाणी

विघ्नहर्त्यां गणरायाच्या उत्सवावर आर्थिक मंदीचे सावट असतानाच सलग चार दिवसांच्या जोरदार पावसानेही उत्साहावर पाणी पडले आहे.

| September 13, 2013 02:45 am

विघ्नहर्त्यां गणरायाच्या उत्सवावर आर्थिक मंदीचे सावट असतानाच सलग चार दिवसांच्या जोरदार पावसानेही उत्साहावर पाणी पडले आहे. पावसाने उघडीप घेतल्यानंतर देखावे पूर्ण करण्यासाठी कार्यकर्त्यांची लगबग सुरू झाली असून शुक्रवारी (१३ सप्टेंबर) गौरी विसर्जनानंतर गणपतीे पाहण्यासाठी नागरिक कुटुंबीयांसह घराबाहेर पडतील, अशी आशा बाळगून आहेत.
रुपयाचे झालेले अवमूल्यन, वाढती महागाई आणि जाहिरातदारांनी घेतलेला आखडता हात यामुळे यंदाच्या गणेशोत्सवावर आर्थिक मंदीचे सावट जाणवत आहे. त्यातच पावसाने कार्यकर्त्यांच्या उत्साहावर पाणी पडले. श्रावण महिन्याच्या विश्रांतीनंतर रविवारपासून पावसाचे जोरदार पुनरागमन झाले आहे. सलग चार दिवसांच्या पावसाने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते धास्तावले होते. दिवसभराच्या कडक उन्हानंतर गुरुवारी सायंकाळपासूनच ढगाळ वातावरण असले तरी पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे अपुरे राहिलेले देखावे पूर्ण करण्याकडेच कार्यकर्त्यांचा कल होता. गणरायाच्या आगमनानंतर माहेरवाशीण म्हणून आलेल्या गौरींचे गुरुवारी पूजन करण्यात आले. आता शुक्रवारी गीैरींबरोबरच घरगुती गणपतींचे विसर्जन झाल्यावर देखावे पाहण्यासाठी नागरिक सहकुटुंब रस्त्यावर येतील आणि या उत्सवात रंग भरण्यास सुरूवात होईल. त्यामुळे कार्यकर्त्यांनी देखावे आणि सजावटीचे काम पूर्णत्वास कसे जाईल यावरच लक्ष केंद्रित केले.
आर्थिक मंदीची झळ बसल्यामुळे अनेक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी यंदाचा गणेशोत्सव साधेपणानेच करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे उपनगरासह शहराच्या मध्यवस्तीमध्ये कित्येक मंडळांच्या मंडपामध्ये केवळ गणपती आणि साधी आरास हे दृश्य पहावयास मिळत आहे. गेल्या काही वर्षांपासून पौराणिक आणि ऐतिहासिक देखावे साकारण्याची परंपरा असलेल्या िनबाळकर तालीम मंडळाने यंदा मखरामध्ये गणरायाची प्रतिष्ठापना केली आहे. काही मंडळांनी मखराची सजावट उचलून विसर्जनाच्या गाडय़ावर ठेवणे शक्य होईल अशाच पद्धतीने केली आहे. महत्त्वाच्या मंडळांचा अपवाद वगळता पोस्टर, बॅनर, कमानी या माध्यमातून जाहिरातीद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नाला काही मंडळांना मुकावे लागले आहे. काही मंडळांनी साधेपणाने सजावट केली असून करमणुकीच्या कार्यक्रमांना फाटा दिला आहे.
वैज्ञानिक देखावे सादर करणाऱ्या मेहुणपुरा मित्र मंडळाने यंदा ‘अक्षय ऊर्जा’ हा देखावा साकारला आहे. देखाव्यामध्ये डोंगराची प्रतिकृती उभारताना पोत्यावर वापरण्यात आलेले प्लॅस्टर ऑफ पॅरिस पावसामुळे वाहून गेले. त्यामुळे पुन्हा तयारी करण्यात आली असून शुक्रवारपासून देखावा पाहता येईल, असे मंडळाचे पराग ठाकूर यांनी सांगितले. चार दिवसांच्या जोरादर पावसामुळे पाणी वाहून जाण्यासाठी मंडपाचे मागील पत्रे उचलून वर घेण्यात आले असल्याचे साईनाथ मंडळ ट्रस्टचे पीयूष शहा यांनी सांगितले. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2013 2:45 am

Web Title: rain spoiled 3 days of ganesh festival
टॅग Ganesh Festival
Next Stories
1 अष्टविनायक चौथा गणपतीः रांजणगाव महागणपती
2 वारसा समर्थपणे सांभाळताना..
3 बेपत्ता व्यक्तींच्या नातेवाइकांना देखाव्याद्वारे आशेचा किरण
Just Now!
X