गर्दी नसल्याने अर्ध्या तासातच भाविकांना दर्शन

गेले काही दिवस धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईतील प्रमुख गणेशोत्सव मंडळाच्या मंडपातील गर्दी रोडावली असली तरी कार्यकर्त्यांचा उत्साह कमी झालेला नाही. ‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी तर पहिल्या दिवसापासूनच सिनेतारेतारकांबरोबरच राजकीय नेते, उद्योजक, प्रतिष्ठित मंडळीही दर्शनासाठी येत आहेत. त्यातच पावसामुळे गर्दी कमी असल्याचा अंदाज करत काही भाविक ऐन पावसाळ्यात दर्शनाची पर्वणी साधत आहेत. त्यामुळे एरवी जिथे दर्शनासाठी तासनतास रांगेत तिष्ठत राहावे लागत होते तिथे अर्ध्या तासातच दर्शन होत असल्याने भाविक खूश आहेत.

गणपती आगमनाबरोबरच पावसानेही पुन्हा दमदार हजेरी लावल्याने गणेशभक्तांचे दर्शनासाठी घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. एरवी गणेशोत्सवात लालबाग, परळचा परिसर पहिल्याच दिवसापासून भक्तांच्या गर्दीने फुलण्यास सुरुवात होते. परंतु, यंदा पावसामुळे भाविकांचा उत्साह काहीसा मावळल्याचे चित्र आहे.लालबागचा राजा, गणेश गल्लीचा मुंबईचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी अशी मुंबईमधील काही प्रमुख गणेश मंडळे लालबाग परिसरात आहेत. हे तिन्ही गणपती एकमेकांपासून हाकेच्या अंतरावर असल्याने दरवर्षी मोठय़ा संख्येने भाविक दर्शनासाठी या ठिकाणी गर्दी करतात. पाच दिवसांच्या गणपती विसर्जनानंतर खऱ्या अर्थाने सार्वजनिक मंडळाच्या मंडपांमध्ये गर्दी वाढू लागते. परंतु, गेली काही वर्षे पहिल्याच दिवसापासून भाविक दर्शनाची पर्वणी साधू लागले आहेत. तुलनेत कमी असलेली गर्दी हेही एक कारण आहेच. मात्र यंदा सतत कोसळणाऱ्या पावसामुळे लालबाग परिसरात भाविकांची गर्दी रोडावली आहे.

चार दिवसांत ३२ लाख भाविक

मागील चार दिवसात सुमारे ३२ लाख भाविकांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतल्याची माहिती मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी दिली. पावसामुळे भाविकांच्या गर्दीवर थोडाफार परिणाम झाल्याचेही त्यांनी सांगितले. हीच परिस्थिती चिंचपोकळीचा चिंतामणी आणि मुंबईच्या राजा गणेश गल्ली मंडळाबाबतही आहे. गणेश भक्तांची रीघ कमी झाली असली तरी सेलिब्रिटींचा ओघ मात्र सुरूच आहे. गेल्या दोन दिवसात ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, अजय देवगण, प्रियांका चोप्रा, शिल्पा शेट्टी, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी लालबागचा राजाचे दर्शन घेतले. तारेतारकांचा हाच ओघ चिंतामणी आणि गणेश गल्लीतही सुरू आहे.