सध्या देशभरामध्ये गणेशोत्सवाचे वारे वाहत आहेत. त्यामुळे प्रत्येक नागरिक बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी करत आहेत. या साऱ्या धामधुमीच्या काळात मात्र कपूर कुटुंबीय या सगळ्यापासून अलिप्त राहिल्याचं पाहायला मिळत आहे. दरवर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव सेलिब्रेट करणारं कपूर कुटुंब यंदा ७० वर्षांची परंपरा पुढे चालवू शकणार नाहीये. ज्येष्ठ अभिनेता रणधीर कपूर यांनी याविषयीची माहिती दिली.

कपूर कुटुंबीयांच्या बाप्पाचं गेल्या ७० वर्षांपासून आर.के. स्टुडिओमध्ये आगमन होतं. दरवर्षी या बाप्पाच्या दर्शनासाठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी येतात. त्यासोबतच कपूर कुटुंबीय यावेळी बाप्पाच्या सेवेसाठी हजर असतं. मात्र काही महिन्यापूर्वी आर. के.स्टुडिओ ‘गोदरेज प्रॉपर्टीज’ने खरेदी केला. त्यामुळे यंदा आर. के. स्टुडिओमध्ये कपूर कुटुंबीयांच्या बाप्पाचं आगमन होणार नाही, असं रणधीर कपूर यांनी सांगितलं.

आर. के. स्टुडिओ आता नाहीये, मग तुमच्या बाप्पाचं आगमन कोठे होणार? असा प्रश्न रणधीर यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, “आमच्या वडिलांनी ७० वर्षांपूर्वी मोठ्या उत्साहामध्ये आर. के.स्टुडिओमध्ये बाप्पाची स्थापना केली होती. मात्र आता आमच्या जवळ बाप्पाचं स्वागत करावं, त्याची स्थापना करावी अशी जागा नाहीये. आम्ही सारेच जण बाप्पावर प्रचंड विश्वास ठेवतो, त्याच्यावर प्रेम करतो,मात्र आता ही परंपरा पुढे नेणं आम्हाला शक्य होणार नाही, असं दिसून येतंय”, असं रणधीर यांनी सांगितलं.

दरम्यान, गेल्या वर्षी २०१८ मध्ये या स्टुडिओमध्ये कपूर कुटुंबीयांना अखेरचा गणेशोत्सव साजरा केला होता. यावेळी संपूर्ण कुटुंबीय उपस्थित होतं. १९४८ साली राज कपूर यांनी आर. के. स्टुडिओची स्थापना केली होती. १९४८ ते १९८६-८७ पर्यंत सलग ४० वर्षे ‘आर. के. स्टुडिओ’मध्ये चित्रपटनिर्मिती झाली. त्यानंतरही या स्टुडिओने बॉलिवूडला अनेक नावाजलेले आणि लोकप्रिय चित्रपट दिले.