गेली दहा र्वष स्नेहज्योती निवासी अंध विद्यालय, ही शाळा पूर्णपणे विनाअनुदान तत्त्वावर चालवली जात आहे. त्यामुळे दरमहा सुमारे दीड लाख रुपयांच्या खर्चाची तोंडमिळवणी करताना आशाताईंची बरीच धावपळ होते. प्रसंगी पदरमोड करून खर्च भागवावे लागतात. शासनाकडून अनुदान मिळवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. तरीसुद्धा सातत्याने वाढणारे खर्च आणि भावी काळातील योजना लक्षात घेता संस्थेला भरीव कायमस्वरूपी निधीचीही गरज आहे.  
खरं तर वयाची साठी जवळ आली की माणसाला निवृत्तीचे वेध लागू लागतात. प्राचीन भारतीय परंपरेनुसार वानप्रस्थाश्रमाचा अवलंब करण्याचा हा काळ. पण पुण्या-मुंबईत आयुष्य घालवलेल्या आशा कामत आणि प्रतिभा सेनगुप्ता या दोघी बहिणींच्या मनात या वयात काही वेगळेच विचार सुरू झाले. आशाताईंचे यजमान शशिकांत कामत पोलीस खात्यात अधिकारी. त्यामुळे शिक्षकी पेशा असूनही आशाताईंना यजमानांच्या सततच्या बदल्यांमुळे एकाच संस्थेत फार काळ नोकरी करता आली नाही. मात्र मुलांना शिकवण्याची हौस आणि सामाजिक जाणिवेपोटी त्या शक्य तिथे शाळकरी मुलांच्या शिकवण्या घेत राहिल्या. प्रतिभाताईंनी अंध जनांना शिकवण्याचा अभ्यासक्रम पूर्ण करून पुण्याच्या प्रसिद्ध अंध शाळेत कामाला सुरुवात केली आणि तिथे सुमारे तीन दशकं  सेवा बजावली. पण तेवढय़ावर दोघींचंही समाधान होत नव्हतं. लहान मुलांशी संवाद साधण्याचं कौशल्य दोघींकडे सुरुवातीपासून होतं. शिवाय अंधशाळेत काम करण्याचा दांडगा अनुभव प्रतिभाताईंच्या गाठीशी होता. या दोन्हीची सांगड घालत दोघींनी अंध मुलांसाठी काम करण्याचा संकल्प सोडला.
रत्नागिरी जिल्ह्य़ातल्या मंडणगड तालुक्यात घराडी हे त्यांचं माहेर. जुन्या काळातील ख्यातनाम शिक्षक किनरे गुरुजी यांच्या त्या कन्या. सुमारे हजार-बाराशे वस्तीच्या या छोटय़ाशा गावाच्या एका टोकाला त्यांच्या आईचं घर होतं. आशाताई तिथे मुंबईहून अधूनमधून येऊन राहू लागल्या. भवतालच्या लोकांचे प्रश्न समजावून घेऊ लागल्या. प्रतिभाताईंनीही पुण्याच्या अंधशाळेतून स्वेच्छानिवृत्ती घेऊन त्यांना साथ देण्याचं ठरवलं आणि घराडीच्या त्या लहानशा जागेत सुरू झालं- स्नेहज्योती निवासी अंध विद्यालय! अर्थात प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यापूर्वी या दोघींनी नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड (नॅब) आणि नॅशनल फेडरेशन ऑफ ब्लाइंड या संस्थांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना भेटून कोकणातल्या अंध लोकांच्या प्रश्नांची, परिस्थितीची माहिती करून घेतली. कोकणातल्या दुर्गम भागातल्या खेडय़ांमध्ये जाऊन तिथे असलेल्या अंध मुलांच्या पालकांच्या गाठी-भेटी घेतल्या. त्यांच्या घरातल्या अंध मुलाबद्दल माहिती गोळा केली. अशा मुलांसाठी आपण सुरू करीत असलेल्या निवासी शाळेची माहिती देऊन त्यांच्या पाल्याला या शाळेत पाठवण्याबाबत विनंती केली. अशा प्रकारे चार-पाच मुलांचे पालक तयार झाल्यानंतर २००३ च्या मार्च महिन्यात शाळेचं प्रत्यक्ष काम सुरू झालं.
पुण्याच्या अंधशाळेत दीर्घ काळ काम केलं असल्यामुळे प्रतिभाताईंना अंध मुलांचे प्रश्न आणि मानसशास्त्राची चांगली जाण होती. पण कोकणातल्या खेडय़ांमध्ये पालकांचं अज्ञान, अडाणीपणा, अंधश्रद्धा हे मोठे अडसर होते. तिथे आशाताईंचं अशा माणसांशी संवाद साधण्याचं कौशल्य आणि चिकाटी उपयोगी पडत होती. त्यामुळे हळूहळू जिल्ह्य़ाच्या निरनिराळ्या भागांतून अंध मुलांचे पालक शाळेत येऊन मुलांची नावं नोंदवायला लागले. आज या शाळेत चार-पाच वर्षांपासून अठरा-एकोणवीस वर्षांपर्यंतची एकूण तीस मुलं-मुली शिकत आहेत.
निवासी शाळा म्हटल्यावर सकाळपासून रात्रीपर्यंतचे सर्व कार्यक्रम योजनाबद्ध रीतीने आखून पार पाडावे लागतात. त्यानुसार या शाळेतली मुलं दररोज सकाळी पाच वाजता उठल्यानंतर थोडा वेळ व्यायाम आणि त्यानंतर गायन-वादनाचा सराव करतात. सकाळी आठ ते साडेनऊ या वेळात अभ्यास केल्यानंतर अकरा वाजता शाळा सुरू होते. संध्याकाळी पावणेपाच वाजता शाळा सुटल्यानंतर मुलांना थोडा मोकळा वेळ दिला जातो. त्यानंतर जेवण आणि थोडा वेळ अभ्यास करून घेतला जातो. पहिली ते आठवीपर्यंतच्या या शाळेत मुलांसाठी तीन विशेष शिक्षक, एक कला शिक्षक आणि दोन संगीताचे शिक्षक आहेत. त्याव्यतिरिक्त पाच वसतिगृह कर्मचारी आहेत. त्यामुळे सर्व मुलांकडे व्यक्तिगत लक्ष पुरवणं शक्य होतं. अभ्यासाबरोबरच खेळ, संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही शाळेतली मुलं उत्साहाने सहभागी होतात. राष्ट्रीय दृष्टिहीन संघ, शासनाचा समाज कल्याण विभाग यांच्यातर्फे होणाऱ्या स्पर्धामध्ये या शाळेची मुलं सतत चमकत आली आहेत.
दृष्टिहीन व्यक्तींना संगीताचं विशेष भान आणि जाण असते, असं अनेकदा अनुभवाला येतं. ‘स्नेहज्योती’च्या मुला-मुलींचाही खास वाद्यवृंद आहे. दापोली तालुक्यातील कुडावळे येथील वीणाताई महाजन यांच्याकडे ही मुलं संगीताचं शास्त्रीय शिक्षण घेऊन गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षांनाही बसतात. त्यांपैकी चौदा जणांनी या परीक्षांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलं आहे. आशिका शेडगे ही मुलगी तर जिल्हास्तरीय गायन स्पध्रेमध्ये पहिल्या क्रमांकाची मानकरी ठरली आहे. अमेरिकेतील दलाल परिवाराच्या उदार देणगीतून साकार झालेल्या खास संगीत दालनामध्ये सर्व प्रकारची वाद्यं आधुनिक ध्वनीव्यवस्थेसह मुलांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
एखाद्या कुटुंबात मतिमंद, मूकबधिर किंवा अंध मूल जन्माला आलं की त्या कुटुंबाच्या आनंदावर स्वाभाविकपणे विरजण पडतं. नियतीने दिलेलं दु:ख पचवून काही पालक त्या मुलाचं आयुष्य सुसह्य़ कसं होईल, यासाठी प्रयत्न सुरू करतात. अशा वेळी ‘स्नेहज्योती’सारख्या संस्था त्यांच्यासाठी मोठा आधार असतात. पण त्याबाबतचे आशाताईंचे अनुभव वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. काही पालक आपल्या मुलांची नियमितपणे चौकशी करतात. गणपती, दसरा-दिवाळी किंवा उन्हाळी सुट्टीत त्यांना घरी घेऊन जातात आणि सुट्टी संपल्यावर पुन्हा शाळेत आणून सोडतात. पण काही पालक असं मूल शाळेवर सोपवून त्याला जणू विसरूनच जातात. लांजा तालुक्यात चिरेखाणीवर काम करणाऱ्या एका बिहारी कष्टकरी दाम्पत्याच्या पोटी जन्माला आलेली पूजा तुरा ही जन्मांध मुलगी जेमतेम तीन वर्षांची असताना तिला घरात एकटं सोडून आई-बाप परागंदा झाले. लहानग्या पूजाच्या रडण्याचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी घरात डोकावून पाहिलं तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून तिला आशाताईंच्या स्वाधीन करण्यात आलं. रत्नागिरीच्या स्वयंसेतू संस्थेच्या श्रद्धा कळंबटे यांनी त्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. उत्तम मराठी बोलणारी पूजा आता या संस्थेत चांगली रुळली आहे. इथे येणाऱ्या अपरिचितांशीही ती अतिशय चुणचुणीतपणे संवाद साधते. आई-बापाच्या प्रेमाला ती पारखी झाली असली तरी आशाताईंमुळे तिला मायाळू आधार लाभला आहे.
यंदा संस्थेच्या वाटचालीची दशकपूर्ती झाली. त्यानिमित्त आयोजित सोहळ्याला क्रिकेट जगतातला जादूगार सचिन तेंडुलकर उपस्थित राहिल्यामुळे सर्वासाठी हा सोहळा अविस्मरणीय ठरला. गेल्या ४ मार्च रोजी सकाळी अकरा वाजता सचिन शाळेच्या आवारात अवतरला. शाळेतल्या मुलांबरोबर मोकळेपणाने वेळ घालवता यावा म्हणून या भेटीची जाहीर वाच्यता न करण्याची अट मात्र त्याने आवर्जून घातली होती. शाळेच्या वाद्यवृंदाने मोठय़ा उत्साहात त्याचं स्वागत केलं. मुलांनी केलेल्या कलात्मक वस्तू आणि वैज्ञानिक प्रयोग न्याहाळून सचिनने त्यांचं कौतुक केलं. शाळेच्या आवारात बांधण्यात आलेल्या नयनबिंदू संगीत दालनाचं उद्घाटन सचिनच्या हस्ते करण्यात आलं. त्याच्याबरोबर क्रिकेट खेळण्याचा आनंदही मुलांनी लुटला. जाता जाता सचिनने स्वत:ची स्वाक्षरी असलेली बॅट मुलांना भेट देऊन त्या दिवसाचा कळसाध्याय गाठला.
ज्यांनी प्रकाशच पाहिला नाही त्यांना काळोखाची ओळख कशी असणार? तरीसुद्धा नियतीने लादलेल्या जीवनातल्या अंधकारावर मात करण्याची जिद्द ही मुलं बाळगून आहेत. त्यांच्या संवेदनशील मनाचा डोळसपणा त्यांच्या सहवासातून अनुभवाला येतो. शाळेच्या नावामध्ये आईचं (कै. स्नेहा किनरे) नाव गुंफत आशाताईंनी त्याला ज्ञानज्योतीची जोड दिली आहे आणि शाळेतली मुलं जणू या ज्योतीच्या प्रकाशात उज्ज्वल भविष्याची वाट धुंडाळणारे प्रवासी आहेत. त्यांना गरज आहे, फक्त कोणी तरी पाठीवर उदारमनस्कपणे थाप मारून ‘लढ’ म्हणण्याची!
    
स्नेहज्योती निवासी अंध विद्यालय, घराडी
सध्या शाळेची टुमदार इमारत उभी असली तरी अशा शाळेसाठी आवश्यक असलेले प्रशिक्षित शिक्षक बाहेरगावाहून येथे आलेले आहेत. त्यांच्या निवासाची स्वतंत्र सोय नसल्यामुळे सध्या ते विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातच राहत आहेत. त्यांच्या स्वतंत्र निवासाची सोय करण्याची गरज आहे. संस्थेतर्फे दर्जेदार व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा आशाताईंचा मनोदय आहे. त्यासाठी मोठय़ा निधीची गरज आहे.
आशाताई आणि प्रतिभाताईंची हाती घेतलेल्या कामावर असलेली कमालीची निष्ठा आणि अथक परिश्रमांमुळे या दशकभराच्या वाटचालीत संस्थेला अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. आगरकर पुरस्कार (लोकमान्य सेवा संघ, मुंबई), आदर्श अंध शैक्षणिक संस्था पुरस्कार (नॅब, नाशिक विभाग) इ.पुरस्कारांनी संस्थेच्या कार्याचा गौरव झाला आहे.
कोकणातल्या या एकमेव निवासी अंध शाळेच्या सुरुवातीच्या काळात अनेक अडचणी आल्या. त्यावर मात करताना दलितमित्र अण्णा शिरगांवकर, ना. अ. जुवेकर, राजा नामजोशी, डॉ. अशोक केतकर, कै. अलका बापट व कै. वासुदेवराव बापट इत्यादींची साथ मिळाली. उत्तमकुमार जैन आणि शेखर निमकर यांच्यासारखी मंडळी संस्थेची जबाबदारी उचलू लागली आहेत.
दुसऱ्यांना आनंद देण्याकरिता स्वत:चा वेळ देणारी आणि प्रयत्न करणारी माणसं विरळाच. त्यातही अशी व्यक्ती जर आपल्या जवळच्या नात्यातील असेल तर त्याचं समाधान अधिक. माझ्या आईची बहीण आशा मावशी कामत ही अशांपैकी एक. घराडी येथील अंध विद्यालयास व ते चालविणाऱ्या आशा मावशीस माझ्या अनेक शुभेच्छा!  
– सचिन तेंडुलकर

संस्थेपर्यंत कसे जाल?
मुंबई-गोवा महामार्गावर माणगावजवळ आंबेत फाटय़ाला वळून मंडणगडमार्गे सुमारे ४० किलोमीटर अंतरावरील घराडी इथे असलेल्या स्नेहज्योती निवासी अंध विद्यालयाला आपण भेट देऊ शकतो. रत्नागिरीहून दापोलीपासून सुमारे ३५ किमी अंतरावर असलेल्या या संस्थेत आपण जाऊ शकतो.
यशस्नेह ट्रस्ट
Yashsneha Trust
( कलम ८० जी अन्वये देणग्यांना प्राप्तिकर सवलत)