18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

आज ना उद्या..

एक षोडशवर्षीय कन्या त्याच्याकडे बघून सारखी हसते आहे असा त्याचा गैरसमज झाला.

निखिल रत्नपारखी | Updated: December 25, 2016 1:01 AM

एवढय़ात नागपूरला जाण्याचा प्रसंग आला. एका नातेवाईकाच्या लग्नासाठी- म्हणजे बायकोच्या कुठल्याशा भावाच्या लग्नासाठी. तो भाऊ आता लग्न करण्याइतपत मोठा झाला आहे, एवढीच माहिती आत्तापर्यंत त्या भावाबद्दल मला कळली होती. मी पहिल्यांदाच या भावाला डायरेक्ट त्याचं लग्न होतानाच बघणार होतो. लग्नमंडपात पोहोचल्यावर आमच्या सासऱ्यांना मी गमतीने म्हणालो की, ‘मी ज्यांच्या लग्नाला आलोय ती व्यक्ती काळी का गोरी मी बघितली नाहीये.’ त्यांनी लगेच नवऱ्या मुलाशी माझी ओळख करून दिली. ‘अहो जयदीप, तुम्ही काळे का गोरे हेसुद्धा माहीत नाही असं म्हणाले आमचे जावई. कुणा अनोळखी लग्नात जेवतोय असं उगाच त्यांना वाटायला नको म्हणून म्हटलं सर्वप्रथम तुमची ओळख करून द्यावी!’ असं म्हणून स्वत:च हसले. पाठीमागून नकळत कोणीतरी शर्टात बर्फाचा खडा टाकावा तशी माझी अवस्था झाली. आणि ते जयदीप आमच्या सासऱ्यांनी करून दिलेल्या ओळखीने बुचकळ्यात पडले. आणि स्वत:चं थोडय़ाच वेळात लग्न आहे वगैरे विसरून मी कोणी आदिवासी की परग्रहवासी, अशी काहीतरी विलक्षण विचित्र भावमुद्रा करून उभे राहिले. नवऱ्या मुलाची अशी ओळख या पृथ्वीतलावर याआधी कोणीच करून दिली नसेल. आणि मी नवऱ्या मुलाशी आपली ओळख झालीये की नाही, या संभ्रमात कसंबसं हस्तांदोलन करत त्याचं अभिनंदन केलं. नंतर वातावरण पूर्वपदावर आलं. आमच्या सासऱ्यांच्या चेहऱ्यावर मात्र त्यांनी काहीतरी भयंकर विनोद केलाय असं समाधान पसरलं होतं. नंतर जेव्हा जेव्हा त्या नवऱ्या मुलाची आणि माझी नजरानजर झाली तेव्हा तो माझ्याकडे बघून अगदी कसनुसा.. इथून पुढे माझी ओळख ठेवाल ना, असा हसत होता. मला नेहमी अशा लग्नात आपले नेमके काय एक्स्प्रेशन्स असावेत हेच कळत नाही. कारण बहुतेक लोक अनोळखी असतात. जिच्या ओळखीने मी आलो होतो ती माझी बायको इथे येईपर्यंत माझ्याबरोबर होती. नंतर मात्र आपण कुणाबरोबर इथे आलो आहोत, हे ती पूर्णपणे विसरली होती. बहुतेक सर्व जण हसत होते. आता ते आपल्याकडे बघून हसतायत की या आनंद-सोहळ्यानिमित्त आपसूकच त्यांच्या चेहऱ्यावर हसू आहे, यात बऱ्याचदा गल्लत होते. आमचा एक मित्र बन्या अशाच एका लग्नाला गेला होता. एक षोडशवर्षीय कन्या त्याच्याकडे बघून सारखी हसते आहे असा त्याचा गैरसमज झाला. त्यामुळे तोही मावा खाऊन लाल झालेले आपले दात दाखवत होता. नुकतीच ओळख झालेल्या बाजूला बसलेल्या व्यक्तीला तो म्हणाला, ‘तो लाल साडीतला बांधा बघितलात. मघापासून लाइन देतीये आपल्याला. काय सुरेख बांधकाम आहे बघा.’ ती व्यक्ती म्हणाली, ‘त्या बांधकामाचा मुकादम मीच आहे. माझी मुलगी आहे ती.’ यानंतरचं संभाषण सांभाळता सांभाळता बन्या एवढा अंतर्मुख झाला, की मनावरची सगळी जळमटं झटकली जाऊन जगातली प्रत्येक स्त्री मातेसमान असते, इथवर जाऊन पोहोचला आणि न जेवताच त्या लग्नातून पसार झाला. म्हणून आपण आपलं खाली मान घालून बसावं, हे उत्तम.

लग्न छान पार पडलं. मी फारसं इकडेतिकडे न बघता सर्व कार्ये पार पाडली. सर्व कार्ये म्हणजे जेवण. लग्नात नवरदेव-वधू, त्यांचे आई-वडील आणि भटजी एवढे जण सोडले तर इतरांसाठी फक्त तेवढंच कार्य करण्यासाठी शिल्लक असतं. जेवताना सासऱ्यांनी अजून एका वल्लीशी ओळख करून दिली. ‘हे आमचे जावई. मुंबईला असतात. चित्रपटांत वगैरे काम करतात..’ एवढं सांगितल्यानंतरही ‘पण म्हणजे धंदापाणी काय?’ असा प्रश्न त्या इसमाने विचारला. या वाक्यावर श्रीखंडपुरीचा घाससुद्धा मी पाण्याबरोबर गिळला. एखाद्या बाईने आपलं नुकतंच जन्मलेलं मूल दाखवावं आणि समोरच्याने ‘अरे वाऽऽ! लग्न झालंय का आपलं?’ असं विचारण्यासारखं होतं ते.

जेवण वगैरे झाल्यावर संध्याकाळपर्यंतचा वेळ सासऱ्यांबरोबर लपाछपी खेळण्यात मजेत गेला. माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच लवकर सर्व विधी आटोपले. पाच वाजायच्या सुमारास कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी खुच्र्या, सतरंज्या, भांडी वगैरेंची आवराआवरी सुरू केली. आमचं परतीचं फ्लाइट ८.३० वाजता होतं. नेहमी शेवटच्या रडण्याचे वगैरे विधी सहसा लांबतात. साधारणत: ७ वाजेपर्यंत कार्यक्रम चालेल हे डोक्यात ठेवून त्यानंतर अध्र्या तासात एअरपोर्ट आणि ८.३० च्या फ्लाइटने घरी! पण नववधू फारशी न रडल्यामुळे आमचं प्लॅनिंग फिसकटलं. ५.३० ला सगळीकडे सामसूम झाली. आता या अनोळखी शहरात संत्र्याच्या बर्फीशिवाय अजून दुसरं काय चांगलं मिळतं, याव्यतिरिक्त कुठलीही माहिती नसल्यामुळे करायचं काय, असा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न नवरी मुलीच्या एका बहिणीने सोडवला. ती नाटय़क्षेत्राशी संबंधित होती. नागपुरात त्यांनी स्थापन केलेल्या नाटय़संस्थेला आम्ही भेट द्यावी असा प्रस्ताव तिने मांडला.

नागपूर-प्रवासाला अशा प्रकारे वेगळं वळण लागेल अशी अजिबात कल्पना नव्हती. मला कल्पना आवडली; पण मी उगाच आढेवेढे घेतले. माझी एक सवय आहे. समोरच्या माणसाला आपल्याला निमंत्रण द्यायची मनापासून इच्छा आहे की नाही हे मी नेहमी पडताळून बघतो. ‘परत एअरपोर्टवर सोडू’ या बोलीवर मी तयार झालो. त्यांच्यातलाच एक नाटय़कर्मी कारने आम्हाला घ्यायला आला.

पण भेट द्यायची म्हणजे काय करायचं? नुसत्याच गप्पा की आपली मुलाखत वगैरे घेणार? या क्षेत्रात येण्यासाठी काय करावे लागेल? योग्य संधी कशी ओळखावी? अभिनय म्हणजे नेमकं काय? हे आणि या प्रकारचे उगाच कुठलेतरी बालिश प्रश्न विचारून माझं डोकं तर नाही ना फिरवणार? (खरं तर या प्रश्नांची उत्तरं मी अजून शोधतोय.) कुणीतरी अतिउत्साही बालक एखादं स्क्रिप्ट तर नाही ना वाचणार? (हल्ली स्क्रिप्ट ऐकताना माझा बऱ्याचदा डोळा लागतो. मी घोरतोही म्हणे!) बापरे!! आपण होकार देऊन चूक तर नाही ना केली? या प्रश्नांच्या विचारमंथनात आम्ही इच्छित स्थळी कधी पोहोचलो ते कळलंच नाही.

संजय भाकरेंचा खूप सुंदर बंगला होता तो. त्यांनी दारातूनच मला अशी काही हाक मारली, की मला माझ्या घरी आल्यासारखंच वाटायला लागलं. पंधरा-वीस जणांचा त्यांचा ग्रुप होता. आम्ही घरात येऊन स्थिरस्थावर झाल्यावर एखाद्या साधूच्या उपदेशाची भक्तगण वाट बघतात तशी डोळ्यांत उत्सुकता ताणून सर्वजण माझ्याकडेच बघत होते. माझ्या अंगावर भगवी वस्त्रं, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा आणि पोटापर्यंत दाढी फुटल्याचा मला भास व्हायला लागला. सगळेजण शांत होते. पण एकूणच वातावरणात माझ्याविषयी आपलेपणा, आपुलकी, प्रेम असल्याचं जाणवत होतं. बऱ्याच वर्षांनी परदेशातून आपला कुणीतरी जवळचा नातलग परत आल्यानंतर जी मनाची अवस्था होते तसं काहीतरी झालं असावं.

संजय भाकरेंनी त्यांच्या अ‍ॅक्टिव्हिटीबद्दल सांगायला सुरुवात केली. गेली दोन र्वष दरमहा एक याप्रमाणे ते एकांकिका सादर करतात. रोज भेटून सर्व कलाकार एकांकिकांचा सराव करतात. भाकरेंकडे जवळजवळ पाच हजार एकांकिकांचा संग्रह आहे. प्रेक्षक गोळा करण्यापासून आपल्याला कशी तयारी करावी लागली.. आणि आज जवळजवळ ४०० ते ४५० एवढा प्रेक्षकवर्ग त्यांना लाभला आहे- त्यासाठी त्यांना आमरण प्रयत्न करावे लागले. पण प्रत्येक वेळी एवढा प्रेक्षकवर्ग उपलब्ध असेलच असं नाही. कधी कधी ही संख्या दहा-पंधरा प्रेक्षकांच्या वर जात नाही. या एकांकिका प्रेक्षकांसमोर मोफत करूनही म्हणावा तसा प्रेक्षकवर्ग त्यांना मिळत नाही. (अशा पद्धतीने पुण्यात एकांकिका सादर करा. मग बघा- कसे प्रेक्षक येतात नाटकाला. समोर काय चाललंय हेसुद्धा समजत नाही तरीही असले नाटय़प्रयोग ‘फुकट’ या एका ऐवजावर हाऊसफुल्ल होतात.) या कार्यासाठी लागणारं आर्थिक बळ भाकरे त्यांच्या पगारातून उभं करतात. हे ऐकून तर माझे हात-पायच गारठले. एकांकिकेच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयोग करून पाहणे व नि:स्वार्थबुद्धीने अशा प्रकारची नाटय़सेवा करत राहणे ही गोष्ट खचितच सोपी नाही. इतर प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्य नाटय़स्पर्धा हाच काय तो चॅनल! फार फार तर आजूबाजूच्या गावांमध्ये नाटकांचं सादरीकरण करून आपल्यासारख्या इतर नाटय़प्रेमींची ओळख करून घ्यायची आणि आपली ओळख करून द्यायची- हाच काय तो त्यांच्या उपक्रमाचा विस्तार.

माझ्यातला तद्दन व्यावसायिक कलाकार त्यांच्या या उपक्रमाकडे व्यावसायिक बुद्धीने बघायला लागला. माझ्या मनात पहिला विचार आला- हे सर्व कशासाठी आणि कुणासाठी? केवळ आवड आणि इच्छा जोपासण्यासाठी एवढा वेळ घालवणं कुणाला कसं काय परवडू शकतं? मुख्य म्हणजे आजकालच्या काळात कोणत्याही आर्थिक लाभाची अपेक्षा न करता असा उपक्रम महिना-दोन महिने नाही, तर सलग दोन र्वष चालू ठेवणं ही दुर्दम्य इच्छाशक्ती यांच्याकडे कुठून आली? आणि शेवटी हे सगळं कुठपर्यंत पोहोचणार? नागपूरसारख्या शहरात कुणी हा उपक्रम करतो आहे याची कुणाला गंधवार्ताही नसेल. कुणाला काय आस्था असणार आहे या कलाकारांबद्दल? आज ना उद्या यांच्यातला एखादा कलाकार नावारूपाला येईलही.. पुण्या-मुंबईप्रमाणे आज ना उद्या या उपक्रमाला ग्लॅमर लाभेलही. पण हा झाला भाबडा आशावाद. मला जे प्रश्न दोन मिनिटांत पडले त्यातला एखादा प्रश्न यांच्यापैकी कुणाला गेल्या दोन वर्षांत पडला नसेल का? कदाचित पडलेही असतील. पण आपल्याकडून होईल तेवढं आपण करत राहायचं. कलाकृतीमध्ये एवढं निरागस नि:स्वार्थीपण मला जोपासता आलं नाही. का आणि कशासाठी, या दोन गोष्टी स्पष्ट असल्याशिवाय काही हालचाल करण्याचा विचारही मी कधी केला नाही. कुठल्यातरी प्रकारचा मोबदला- मग तो पैशांच्या स्वरूपात असेल, नाहीतर प्रसिद्धीच्या स्वरूपात- तो मिळाल्याशिवाय कुणासाठी- किंवा अगदी स्वत:साठीसुद्धा उगाच धडपड करण्याचा मी कधीच प्रयत्न केला नाही.

मी एकदा सर्वाच्या चेहऱ्याकडे निरखून बघितलं. ते सर्व समाधानी आणि आनंदी होते. एक जिद्द होती.. आशा होती उद्याची! त्या सर्वामध्ये जर कुणी अस्वस्थ दिसत असेल, तर तो मीच होतो.

मी मुंबईला परतलो. पूर्ण प्रवासभर मी त्या उपक्रमाचा विचार करत होतो. एका क्षणी मला असं वाटलं, ‘असं का असू नये?’ आपण एखादं गुटगुटीत, हसरं (किंवा रडकंही!) बाळ बघतो तेव्हा आपल्याला कुठं असं वाटतं, की काय होणार याचं पुढे? हा गुंड होणार की राजकारणी होणार? की कुणी भला माणूस होणार? अशी हसरी, खेळती बाळं बघितली की त्यांनी कधी मोठं होऊच नये असं वाटतं. आज ना उद्या त्याला त्याची वाट सापडेल. संजय भाकरे यांचा उपक्रमही असाच निरागस, पण बाळसेदार आहे. व्यावसायिक निकष इथे व्यर्थ ठरेल.

निखिल रत्नपारखी – nratna1212@gmail.com

(समाप्त)

First Published on December 25, 2016 1:01 am

Web Title: article by nikhil ratnaparkhi for lokrang 2