जाहिराती, मालिका, नाटक आणि चित्रपट क्षेत्रात चौफेर मुशाफिरी करणाऱ्या कलावंताचे भोवतालच्या व्यक्ती, घटना आणि घडामोडींवर खुसखुशीत मल्लिनाथी करणारे पाक्षिक सदर..
त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी त्यांना एकच मार्ग दिसत होता. आणि तो म्हणजे परमपिता परमेश्वर. म्हणून मग ते मुंबईहून चालत चालत निघाले आणि एका तीर्थक्षेत्री जाऊन पोहोचले. तिथून ते परतले तेव्हा त्यांची सर्व र्कज फेडली गेली होती आणि पुढच्या आयुष्याची तरतूद होईल एवढे पैसेही बँकेच्या अकाऊंटमध्ये जमा झाले होते. ही कथा बऱ्यापैकी हृदयद्रावक, सुरस आणि चमत्कारिक होती. या सुरस कथेत भक्तांना ‘माझ्यासारख्या पापी माणसाला परमेश्वर मदत करू शकतो, तर कुणालाही करू शकतो!’ असा उपदेश व भक्तिमार्गाविषयी आवाहन होतं. पण माझ्यावर त्या कथेचा त्यांना अपेक्षित असलेला परिणाम झाला नाही. माझ्या मनात आलं, परमेश्वर जर एवढय़ा सहज कर्ज माफ करत असेल आणि उर्वरित आयुष्याची आर्थिक सोय करत असेल तर आपणही मटका खेळायला तयार आहोत.
काहीतरी गौडबंगाल असल्याचा मला संशय येत होता. पण हऱ्याला सावध करण्याचा मी अजिबात प्रयत्न केला नाही. एकतर न जाणो- हऱ्याचं डोकं फिरलं तर मला घरातून हाकलून द्यायचा. आणि दुसरं म्हणजे त्या स्वामी नावाच्या व्हायरसने हऱ्याचं हार्डवेअर, सॉफ्टवेअरच नाही, तर संपूर्ण सव्‍‌र्हरच करप्ट केला होता. माझ्यासारखं मुंबईत नवखं असणारं अँटीव्हायरस काही कामाचं नव्हतं. हऱ्याचं प्यादं स्वामी म्हणेल तसं चालणार होतं. काहीही म्हणा, स्वामींची आत्मकथा फारच इंट्रेस्टिंग होती. ती ऐकण्यात माझ्या आयुष्यातले तीन तास कुरतडले गेले होते. संध्याकाळचे सात वाजले. मग एक-दोन भक्त आले. त्यांच्या जीवनाविषयीच्या तक्रारी ऐकून त्यांचं निरसन करण्यात काही वेळ गेला. स्वामी जो उपाय सांगतील तो जर भक्तांनी अमलात आणला आणि तो उपाय जर फळाला आला, तर त्या भक्तांनी म्हणे स्वामींना सिगरेटचं पाकीट भेट द्यायचं. आणि प्रसाद म्हणून स्वामींनी ओढलेल्या सिगरेटचं थोटुक भक्तांनी जवळ ठेवायचं, किंवा अनेक थोटकं साठवायची. हे ऐकल्यावर मी जे ऐकतोय त्यावर पहिल्यांदा माझा विश्वासच बसेना. पण एका भक्ताने जेव्हा एक प्लॅस्टिकची पिशवी सॅकमधून बाहेर काढली आणि त्याने साठवलेली ती पन्नासेक सिगरेटची थोटकं मी बघितली तेव्हा माझ्या मेंदूची राखच झाली. यात मला तरी निव्वळ आचरटपणाशिवाय दुसरं काहीच दिसत नव्हतं. यातलं काहीच माझ्या तर्कबुद्धीला पटण्यासारखं नव्हतं. मला बर्फाच्या लादीवर शीर्षांसन करावंसं वाटत होतं. बऱ्यापैकी बुद्धिमान हऱ्याला यात काहीच गैर वाटत नव्हतं. मला याचंच आश्चर्य वाटत होतं. उलट, त्याच्याकडेसुद्धा काही थोटकं सापडली. छे छे छे! कुणाच्या नादी लागलाय हा हऱ्याऽऽऽ!
स्वामींच्या दिनक्रमाविषयी मला नेहमी उत्सुकता वाटत होती. रात्री या ना त्या कारणाने त्यांचं जागरण होत असेल आणि म्हणून ते दिवसा सहा-सात तास विश्रांती- स्पष्टच सांगायचं तर झोप घेत असतील असा माझा समज होता. पण रात्रीच्या आठ तास झोपेशिवाय अजून वेगळी सहा-सात तास झोप त्यांना लागत असे. मुंबईला ‘कधीही न झोपणारं शहर’ म्हणतात असं त्यांनीच कधीतरी मला सांगितलं होतं. न जाणो- समाधीचा कुठलातरी प्रकार असावा म्हणून दुर्लक्ष केलं. माझ्यात मी जे महत्त्वपूर्ण बदल केले त्यात दुर्लक्ष करणे हा एक महत्त्वाचा होता. शिवाय डोळ्यासमोर घडत असलेल्या गोष्टींचा त्रागा करून घेण्यापेक्षा मी त्या सर्व प्रकाराची मजा घ्यायला लागलो. कधी कधी मलाही रट्टे बसत असत. पण ते अतिशय क्षुल्लक असायचे. उदाहरणार्थ, त्याकाळी मी बोर्नव्हिटा पीत असे. काही कारणाने मी आठ दिवस पुण्याला जाऊन परत चाळीत आलो तर बोर्नव्हिटाचा पूर्ण भरलेला डबा रिकामा झाला होता. मागच्या आठ दिवसांपासून स्वामींना सकाळ, संध्याकाळ, रात्र बोर्नव्हिटा प्यायची आणि येता-जाता बडीशेप खायची सवय लागली होती. त्यामुळे माझी मात्र तसली महागडी सवय सुटली, ती कायमचीच.
एक दिवस स्वामींना चाळीत यायला उशीर झाला. गाडी पंक्चर झाल्याचं त्यांनी सांगितलं. ‘भगवंताची रचना! दुसरं काय?’ मी उडालोच. मी विचारलं, ‘म्हणजे?’ पुढं जाऊन काहीतरी दुर्घटना होणार होती म्हणून भगवंताने मुद्दाम ठरवून त्यांची गाडी पंक्चर केली आणि ही सगळी रचना घडवून आणली. अशा कितीतरी क्षुद्र व फालतू रचना भगवंत त्यांच्याबाबतीत घडवून आणत असे. या ‘रचना’ प्रकरणाची गंमत करावी म्हणून मी एक दिवस त्यांच्या बाइकची किल्ली लपवून ठेवली. बराच वेळ शोधाशोध करूनही ती सापडेना. जे मला वाटलं होतं तेच आणि तसंच झालं. लग्गेच स्वामी बोललेच, ‘निश्चित यामागे भगवंताची काहीतरी रचना असणार.’ पण ते जेव्हा म्हणाले की, आजची रात्र इथेच राहावं लागणार असं दिसतंय- तेव्हा लगेच मी किल्ली काढून दिली आणि म्हणालो, ‘हे बघा- सापडली किल्ली. तुम्ही घरी जावं अशी भगवंताची रचना असणार.’ एक दिवस दुपारी उठले आणि म्हणाले, ‘मला आत्ताच साक्षात्कार झालाय. या वास्तूत एक श्वान असायला पाहिजे.’ माझ्या पोटात गोळाच आला. श्वान म्हणजे मला पहिल्यांदी घोडा वाटला. पण नंतर आईला फोन केल्यावर कळलं, की श्वान म्हणजे कुत्रा. पहिलं अक्षर ‘ल’ व शेवटचं अक्षर ‘र’- म्हणजे लॅबरेडॉर नाव येईल अशी सगळी स्वत:च्या सोयीने छान रचना केली होती स्वामींनी. बापरे! आता त्या जागेत मी, हऱ्या, स्वामी आणि आता ते कुत्रं असे चौघे राहणार होतो. स्वामी निदान झोपायला तरी घरी जाणार होते; पण हे कुत्रं इथे आपल्याबरोबरच राहणार, या विचाराने मला अपार खिन्नता आली. इथे आमच्या दोन वेळच्या खाण्याची मारामार आणि आता उरावर अजून या कुत्र्याची जबाबदारी! कसं आणि कुठून असं कुत्रं मिळेल यावर चर्चा, फोन सुरू झाले. या जातीचं कुत्रं बऱ्यापैकी महाग असून ते विकत घेणं सध्याच्या आर्थिक स्थितीत परवडणारं नाही असं मत जोर धरायला लागलं. चला, म्हणजे हे कुत्रं एवढय़ात काही या वास्तूत शिरकाव करू शकणार नाही- या समाधानात तीन-चार दिवसांच्या आऊटडोअर शूटिंगसाठी मी निघून गेलो. परत येऊन बघतो तर काय? क्वॅ क्वॅ करत ते कुत्रं घरभर फिरत होतं. विषबाधा होऊन हे कुत्रं मरण्याची रचना जर भगवंत करतील तर किती बरं होईल. अगदी विषबाधा होऊन जरी त्याला मरण आलं नाही, तरी मरणप्राय यातना मात्र त्याच्या वाटय़ाला आल्याच. स्वामींना झालेल्या साक्षात्कारातून या जागेत अवतरलेल्या त्या कुत्र्याचं पालनपोषण स्वामी त्याला फक्त शाकाहारी भोजन देऊन करणार आहेत; नव्हे त्यांनी तसा निश्चयच केल्याचं समजलं. त्यामुळे मग शिरा, उपमा, वरणभात, चुरमुऱ्याचा चिवडा, साबुदाण्याची खिचडी, बेसनाचा लाडू वगैरे पदार्थ त्याच्या नशिबी येऊ लागले. हवा खाऊन जगता येत नाही, त्यामुळे केवळ कसंबसं शरीर चालवायचं म्हणून आपलं ते कुत्रं तसले अन्नपदार्थ खात असे. नाइलाजास्तव पापड-कुरडयासुद्धा खाताना मी त्याला बघितलं होतं. वास्तविक मांसाहार करणारं ते जनावर! ते शिकरण आणि पोळी कसं खाईल? शाकाहारी अन्नावरच वाढवायचं होतं तर मग डायरेक्ट शेळीच आणायची ना! कुत्रं आणून त्याची शेळी करण्याची ही कुठली अजब रचना होती भगवंताची- कुणास ठाऊक. एकदा तर ते शिंकलं म्हणून त्याला निलगिरीसुद्धा हुंगायला लावली होती या लोकांनी. आठ-दहा महिन्यांतच लॅबरेडॉर जातीचं ते कुत्रं अक्षरश: मरतुकडय़ा हरणासारखं दिसत होतं. चावणं वगैरे तर फार लांबची गोष्ट; एवढय़ा दिवसात कधी नुसतं ते भुंकलंसुद्धा नव्हतं. काय करणार! भुंकण्याचंसुद्धा त्राण नसायचं त्याच्या अंगात. एखाद्या छानशा कुत्रीकडे मान वळवून बघायचे कष्टसुद्धा त्यानं कधी घेतले नाहीत. सारखं एकाच जागी बसून त्याला जळमटं लागायची बाकी होती. कधीतरी हऱ्या व स्वामी त्यांच्या भक्तीमंडळाचा प्रचार करण्यासाठी कुठे कुठे जायचे. मग मलाच दया येऊन मी त्या कुत्र्याला अंडी वगैरे उकडून खाऊ घालायचो. असं मटामटा खायचं ते! त्या कुत्र्याचे अगदी कुत्र्यासारखे हाल झाले होते त्या घरात. मीच काय तो त्याच्यासाठी आशेचं हाडूक होतो.
स्वामींचा दिनक्रम मागची दोन वर्षे तसाच अव्याहतपणे चालू होता. भक्तांची संख्या वाढत होती आणि भक्तांकडच्या सिगरेटच्या थोटकांचीही. भक्तांची या स्वामींविषयी श्रद्धापण कमालीची भोळसट होती. रस्ता असो, स्टेशन असो, चिख्खल असो की घरदार- हे भक्त कुठेही त्यांच्या पायावर लोळण घेत. परिस्थितीपुढे नमतं घेणं किंवा परिस्थितीपुढे शरण जाणं म्हणजे काय, ते मी उघडय़ा डोळ्यांनी बघत होतो. त्या अडलेल्या, हरलेल्या भक्तांना त्यावेळी स्वामींनी उपाय म्हणून दगड जरी खायला सांगितले असते तरी त्यांनी हसत हसत खाल्ले असते.
हऱ्या आणि त्यांचा अजूनही एक पट्टशिष्य होता. आपल्या सोयीसाठी आपण त्याला नाऱ्या असं म्हणू. एकदा एका जेवणाच्या पंगतीला हऱ्या आणि नाऱ्या स्वामींच्या मागे गुडघ्यावर बसले. साधारणत: श्वानासनात (कुत्र्यासारखं) बसावं तसे. मला काही टोटलच लागेना. स्वामींचं जेवण होईपर्यंत हे श्वान असेच गुडघ्यावर बसून त्यांची राखण करणार आणि त्यांचं जेवण उरकल्यावरच त्यांच्या उष्टय़ा ताटात जेवणार. या सगळ्या देखाव्याचा अर्थ मला कधीच लक्षात आला नसता- जर त्यांच्यापैकीच एका भक्ताने मला समजावून सांगितलं नसतं! हे सगळं माझ्यासाठी भयानक धक्कादायक होतं. पाया पडणे किंवा अगदी पायावर लोळण घेणे इथपर्यंत मी समजू शकत होतो. पण या श्वानसंप्रदायाचे भक्तीप्रकार माझ्या कल्पनाशक्तीच्या आवाक्याबाहेरचे होते. माणूस आपली बुद्धी कुठल्या थराला जाऊन गहाण टाकू शकतो याचं हऱ्या-नाऱ्या म्हणजे अगदी स्वच्छ उदाहरणं होती. या बेअक्कल हऱ्याने ‘हे स्वामी नुसता बल्बकडे कटाक्ष टाकतात आणि बल्ब लागतो. पंखा, टीव्ही, मिक्सर वगैरेही ते तसाच सुरू करतात. नुसतं टीव्हीकडे बघतात आणि बंद टीव्ही चालू होतो.’ म्हटलं, बरं आहे. पुढे-मागे आत्ताचा उद्योग बंद पडला की स्वामी इलेक्ट्रिकल वस्तू रिपेअरिंगचं दुकान टाकू शकतील. नुसता एक कटाक्ष टाकला की बंद वस्तू पुन्हा चालू! या हऱ्याच्या बुद्धीपुढे हसावं का रडावं, हेच मला समजेनासं झालं होतं. हतबुद्ध होऊन फक्त बघण्यापलीकडे मी काहीच करू शकत नव्हतो.
मागची दोन वर्षे माझी विविध प्रकारे करमणूक चालली होती. एवढय़ा दिवसांत माझी स्वामींशी मैत्रीही झाली होती. बाकी काहीही असा, त्यांची र्कम त्यांच्यापाशी. हऱ्या काय किंवा स्वामी काय, एक गोष्ट मात्र त्यांची वाखाणण्यासारखी होती. एखाद्याला मदत करताना ते पूर्ण झोकून देऊन करत असत. हऱ्याचा तर तो स्वभावच होता. मदतही टोकाला जाऊन करायचा. एकदा एका मित्राला पैशाची गरज होती म्हणून कुठलाही मागचा-पुढचा विचार न करता सरळ गळ्यातली सोन्याची चैन काढून दिली होती त्याने. स्वामींनी पण कुणाबद्दल कधी काही वाईट बोलल्याचं वा वाईट चिंतल्याचं मला आठवत नाही. आमच्यात चांगली मैत्री निर्माण व्हायला ते एकमेव कारण होतं. समाजातल्या रंजल्यागांजल्या लोकांचं कल्याण व्हावं असाच त्यांच्या कार्याचा उद्देश होता. पण त्यांचा मार्ग फारच विचित्र आणि खटकण्यासारखा होता. धमकी देऊन, भीती दाखवून, प्रसंगी फसवून लाइफ इन्शुरन्स पॉलिसी काढायला लावण्यासारखं ते होतं. आमचा असाच एक मित्र होता. त्याचे वडील अचानक वारले. आई खूप आधीच वारली होती. त्यालाही हऱ्याने चाळीत रोज रात्री जेवणासाठी बोलावलं. इच्छा फक्त एकच होती- त्याला कधी एकटं वाटू नये, ही. पण मला मात्र माझ्या रात्रीच्या डब्याची चिंता वाटू लागली. त्यात अजून एक वाटेकरी येणार होता. मी जेवणासाठी डबा उघडला, पण सगळे डबे रिकामे असल्याची स्वप्नं मला पडायला लागली. पण हा मित्र सुज्ञ निघाला. फार दिवस चाळीत नाही आला. हऱ्याने आणि स्वामींनी त्याचं लग्न ठरवून ते लावून दिलं. तो त्याच्या संसाराला लागला आणि माझा डब्याचा प्रश्न कायमचा निकालात निघाला.
हऱ्याचंही लग्न ठरलं. हऱ्याला अत्यंत सुज्ञ, प्रेमळ आणि समंजस बायको मिळाली. मला दोन गोष्टींची चिंता वाटत होती. एक म्हणजे हऱ्याच्या आयुष्याच्या चिखलात जे कमळ उगवलं होतं, ते किती दिवस तग धरू शकेल, याची. आणि दुसरी म्हणजे मला आता परत नवीन जागा शोधणं क्रमप्राप्त होतं. बिनडोक हऱ्याने आपण तिघे राहूया या घरात- असा आग्रह धरला होता. पण परमेश्वराने मला बऱ्यापैकी सदसद्विवेक बुद्धी आणि शरम दिली असल्यामुळे तो पर्याय मी धुडकावून लावला. शिवाय हऱ्याची बायको त्या घरात येण्याने अजूनही बऱ्याच थिल्लर व बाळबोध चाळ्यांना आळा बसणार होता. ते अत्यंत महत्त्वाचं होतं. या महान स्त्रीने हऱ्याच्या अमिबासारख्या पसरलेल्या आयुष्याला खरोखरीच चांगला आकार दिला. काळ्या-पांढऱ्या हऱ्यामध्ये जरा आगळेवेगळे रंगही दिसायला लागले. हऱ्याही तसा प्रेमळ माणूस होता. तो जेवढय़ा टोकाला जाऊन प्रेम करत असे, तेवढं प्रेम क्वचितच आम्हा मित्रांपैकी कोणी करू शकलं असतं. म्हणूनच मी घर सोडताना तो उगाच काहीतरी फालतू कामाचं कारण काढून कुठेतरी बाहेर निघून गेला होता.
काही आठवणी तुमच्या चेहऱ्यावर तुमच्या नकळत हसू आणतात. त्यांच्याबरोबर तुम्हाला घेऊन जातात. खूप लांबपर्यंत फेरफटका मारून आणतात. मनाला जरा ताजंतवानं झाल्यासारखं वाटतं. चाळीतल्या त्या दोन खोल्यांमधल्या आठवणीही अशाच आहेत. त्या दोन खोल्यांमध्ये मी दोन-अडीच वर्षांत जे शिकलो ते माझ्या शाळा-कॉलेजच्या दहा वर्षांतही शिकू शकलो नव्हतो. स्वामींच्या निमित्ताने अनेक व्यक्ती, अनेक वल्ली पाहायला मिळाल्या. त्यांच्या अडचणी, दु:खे ऐकायला मिळाली. मुंबईत राहणारा माणूस एका वेळी किती लढाया लढत असतो. एकाच वेळी मानसिक आणि शारीरिक अशा दोन दोऱ्यांवर कसरत करत एकेक पाऊल पुढे टाकायचं, हे काही सोपं नाही पेशवे. रोजच्या जगण्यासाठी एवढे परिश्रम घ्यावे लागतात. आपल्याला जिथे पोचायचं आहे तिथपर्यंत पोचण्यासाठी तर किती परिश्रम करावे लागतील. वेळप्रसंगी व्यक्तिगत दु:ख बाजूला ठेवून कार्यसिद्धीसाठी पाय रोवून ठामपणे उभं राहावं लागेल. पुण्यासारख्या शांतताप्रिय शहरात असलेल्या आमच्या सुरक्षित बंगल्यात यातल्या एकाही दु:खाशी किंवा अडचणींशी माझा परिचय झाला नव्हता. ज्यावेळी मी या चाळीत आलो तेव्हा पोरगेला असमंजस बालक होतो. पण जेव्हा मी तिथून बाहेर पडलो, तेव्हा मुंबईसारख्या शहरात जगण्यासाठी धडपडण्याचा आत्मविश्वास माझ्यात आला होता. मी एक समंजस जबाबदार व्यक्ती झालो होतो. मी या शहरात एकटा होतो. पण त्या दोन खोल्यांच्या आठवणींनी मला कधी एकटं पडू दिलं नाही. माझ्या नैराश्यात, असहायतेत नेहमी माझ्यासाठी बळ एकवटून माझ्या बाजूने उभ्या राहिल्या. माझ्या भगवंताने ही चाळीची रचना फारच काळजीपूर्वक केली होती असं दिसतंय.
आता बरीच वर्षे झाली चाळ सोडून. हऱ्याचा मामा चाळीत परत राहायला आल्यामुळे हऱ्यानेही आता चाळीतली जागा सोडून मुंबईच्या कुठल्याशा उपनगरात आपला संसार थाटला होता. त्यामुळे स्वामींच्या चाळीतल्या दुकानाचं शटर बंद झालं होतं. पण अशी दुकानं कधी बंद होत नसतात. ती एका जागेवरून दुसरीकडे फक्त स्थलांतरित होत असतात. स्वामींना आता वेगळे हऱ्या-नाऱ्या मिळाले आहेत आणि त्यांचा उद्योग आता चांगलाच फोफावलाय. सिगरेटचा ब्रॅन्ड फक्त त्यांनी बदललाय. भक्तांना आता इंपोर्टेड थोटकं मिळू लागली असल्याच्या बातम्या कुठून कुठून माझ्या कानावर येत होत्या. मी आता वाट पाहतो आहे ती त्या दिवसाची- जेव्हा स्वामी इलेक्ट्रिकल वस्तू रिपेअर करण्याचं दुकान सुरू करतील. आणि दुकानाचं नाव असेल- ‘रचना रिपेअरिंग शॉप!’ (उत्तरार्ध)
nratna1212@gmail.com

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
INDIA parties project unity at rally in Ranchi
आघाडीत राहिल्यामुळेच सोरेन तुरुंगात; ‘इंडिया’च्या सभेत खरगे यांचा आरोप
loksatta readers opinion on editorial readers reaction on loksatta news
लोकमानस : वंचित नव्हे, मविआच भाजपची ‘बी टीम’?
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र