06 July 2020

News Flash

प्रवास ५० चौ. फुटांपासून १० हजार चौ. फुटांचा

कोटिंगपासून वीज बचत करणाऱ्या उष्णतारोधक कोटिंगचं संशोधन करणाऱ्या या दाम्पत्याविषयी..

सचिन व डॉ. कुसुम जोशी या दाम्पत्याने स्थापन केलेल्या एस. के. फॉम्र्युलेशन्स कंपनीने पॉलिमर टेक्नॉलॉजी या क्षेत्रात गेल्या २० वर्षांत बाजारात आणलेल्या दहा उत्पादनातील सहांना केवळ भारतातच नव्हे तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, दुबई, बाहरिन, अशा अनेक देशातून पेटंट मिळाली आहेत. घरच्या टीचभर गॅलरीत सुरू झालेल्या या व्यवसायाने आता १० हजार चौरस फुटांची जागा व्यापली आहे. पाणी गळती थांबवणाऱ्या कोटिंगपासून वीज बचत करणाऱ्या उष्णतारोधक कोटिंगचं संशोधन करणाऱ्या या दाम्पत्याविषयी..

‘‘गोरेगावच्या ‘बॉम्बे एक्झिबिशन ग्राऊंड’वर आयोजिलेल्या इलेक्रामा (इलेक्ट्रिकल व मेकॅनिकल) या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात (२००६), चारशे / पाचशे स्टॉल्स्च्या झगमगाटात आमचा म्हणजे एस. के. फॉम्युलेशन्सचा जेमतेम शंभर चौरस फुटांचा स्टॉल काहीसा अंग चोरूनच उभा होता. विद्युत प्रतिबंधक आवरण (इलेक्ट्रिकल इन्शुलेशन कोटिंग) आणि गंजविरोधी आवरण (अ‍ॅण्टी करोजन कोटिंग) ही दोनच रसायनं आम्ही प्रदर्शनात मांडली होती. आमची मदार होती ती आमची गुणवत्ता दाखल्यानंतर मिळणाऱ्या प्रतिसादावर. (परफॉर्मन्स रिपोर्ट) जे बाजूच्या स्क्रीनवर सतत दिसत राहतील याची आम्ही दक्षता घेतली होती. या प्रगतीपुस्तकाने जादू केली आणि दुसऱ्याच दिवशी प्रदर्शन बघण्यासाठी आलेले भारतीय नौदलाचे काही अधिकारी आमच्या स्टॉलपाशी थबकले. चर्चेअंती त्यांनी आम्हाला अ‍ॅण्टी करोजन कोटिंग या उत्पादनाच्या प्रेझेंटेशनसाठी आमंत्रण दिलं. त्यानुसार आम्ही केलेल्या सादरीकरणाचा परिणाम असा झाला की कोणाच्याही शिफारशीविना निव्वळ गुणवत्तेवर आम्हाला भारतीय नौदलातील युद्धनौकांना गंजमुक्त करण्याचं (पाण्यावरील सर्व भाग) काम मिळालं. आधी जे भाग तीन महिन्यात गंजून जायचे, त्यांचं आयुष्य आमच्या कोटिंगमुळे सहापटीने वाढलं. या सुधारणेसाठी (व्हॅल्यू अ‍ॅडिशन) नौदलाच्या त्या विभागाला विशेष पदकंही मिळालं. त्यांनीदेखील हे कौतुक एक खास सन्मानपत्राद्वारे आमच्यापर्यंत पोहचवलं. शिवाय एका भारतीयाने संशोधन केलेले सर्वोत्तम उत्पादन (इलेक्रामा- २००६) हा बहुमोल पुरस्कारही मिळाला..’’ एस. के. फॉम्र्युलेशन्सचे सचिन जोशी आपल्या वाटचालीतील एक अभिमानाचा क्षण उलगडत होते. सचिन व डॉ. कुसुम जोशी या दाम्पत्याने स्थापन केलेल्या या कंपनीने ‘पॉलिमर टेक्नॉलॉजी’ या क्षेत्रात गेल्या २० वर्षांत बाजारात आणलेल्या दहा उत्पादनातील सहांना केवळ भारतातच नव्हे तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, दुबई, बाहरिन.. अशा अनेक देशातून पेटंट मिळाली आहेत आणि उर्वरित चार (पेटंट मिळण्याच्या) प्रतीक्षेत आहेत.

ज्यात शिक्षण घेतलंय त्याच विषयात वेगवेगळे प्रयोग करायला मिळणं ही मोठी संधी. याउपर त्याच क्षेत्रातील तज्ज्ञ जोडीदार मिळून एकत्र व्यवसाय करताना उद्योगजगतात वेगळा ठसा उमटवता येणं ही तर परम संधी! अशा जोडप्यात सचिन आणि कुसुम यांची गणना करता येईल.

पॉलिमर तंत्रज्ञानाची पदवी घेतल्यानंतर सचिन ठाण्याच्या एका कंपनीत संशोधन आणि विकास विभागात रुजू झाले. तिथे आपल्या ज्ञानाचा उपयोग करत त्यांनी कंपनीच्या उत्पादनांचा दर्जा उंचावण्यासाठी वेगवेगळ्या रसायनांची निर्मिती केली व त्याचे भारतभर यशस्वी मार्केटिंग केले. हा अनुभव पुढच्या वाटचालीसाठी मोलाचा ठरला. कुसुम

एम. एस्सी (केमिस्ट्री) मध्ये सुवर्णपदक मिळवून यू.जी.सी.च्या परीक्षेची तयारी करत असताना कामाचा अनुभव घ्यावा म्हणून सचिन काम करत असलेल्या कंपनीत संशोधन विभागातच दाखल झाल्या. इथूनच त्यांच्या सहजीवनाची सुरवात झाली.

कुसुम यांनी यू. जी. सी. ची परीक्षा यशस्वीपणे पूर्ण केल्याने त्यांना पीएच.डी.साठी स्कॉलरशिप मिळाली. लग्नानंतर त्यांचा यू.डी.सी.टी.मधून डॉक्टरेटचा अभ्यास सुरू झाला. त्यासाठी त्यांनी निवडलेला विषय होता पॉलिमर सायन्स. म्हणजे दोघेही पॉलिमर क्षेत्रातील तज्ज्ञ. साहजिकच वाचलेलं, अभ्यासलेलं ज्ञान व्यवहारात आणण्यासाठी त्यांचे प्रयोग सुरू झाले. घरच्या टीचभर बाल्कनीतच त्यांनी आपली प्रयोगशाळा मांडली. या मंथनातून बाहेर पडलेलं पहिलं रत्न म्हणजे वॉटर प्रूफिंगचं कोटिंग. हे रसायन त्यांनी आपल्या मित्रमंडळींना वापरून पाहण्यासाठी दिलं. त्यांना ते इतकं पसंत पडलं की त्या दोस्तांनी या दोघांना आग्रह करून धंद्यात अक्षरश: ढकललं. काही तरी वेगळं करण्याची सुप्त इच्छा दोघांच्या मनात होतीच; तिला असं खतपाणी मिळाल्यावर जोशी दाम्पत्याने पुढचं पाऊल उचललं. जानेवारी १९९६ मध्ये शेजारच्या सोसायटीत ५० चौरस फुटांची छोटीशी भाडय़ाची जागा घेऊन एस. के. फॉम्र्युलेशन्सची (‘एस. के. एफ.’) मुहूर्तमेढ रोवण्यात आली.

जोशींच्या या पहिल्यावहिल्या उत्पादनावर केवळ ३/४ महिन्यांतच ग्राहक पसंतीची मोहर उमटली. या पाठबळावर सचिन यांनी वेगवेगळ्या सोसायटय़ांमध्ये जाऊन मार्केटिंग सुरू केलं. कामं मिळत गेली, पैसा येत गेला तसा जोशी पती-पत्नींचा हुरूपही वाढत गेला. त्यांच्या या छोटेखानी प्रयोगशाळेतली सर्व उपकरणं थेट स्वयंपाकघरातून आणण्यात आली होती. दहा किलोच्या दळणाच्या डब्यात तऱ्हेतऱ्हेची मिश्रणं बनायची; ती ढवळण्यासाठी साधन म्हणजे मोठा डाव. झालंच तर दोघांच्या कमाईतले पैसे वाचवून कच्च्या मालाची खरेदी अशा प्रकारे कोणाकडूनही एक पै देखील न मागता (यात बँक ही आली) ‘एस. के. एफ.’ ची वाटचाल सुरू झाली. व्यवसाय सुरू केल्यापासून अवघ्या चार महिन्यांत सचिन यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. यापाठचं त्यांचं तत्त्व.. जे काम करतोय त्याला शंभर टक्के न्याय द्यायचा. मग ती नोकरी असो वा व्यवसाय.

सोसायटय़ांची काम करता करता तिथल्या रहिवाशांच्या माध्यमातून त्यांच्या कामाच्या ठिकाणी, कंपन्यात ‘एस. के. एफ.’ चा शिरकाव झाला. जिथे जशी गरज होती, त्याप्रमाणे सोल्युशन द्यायला त्यांनी सुरवात केली. याच दिवसात गप्पांच्या ओघात त्यांच्या एका मित्राने विचारलं, ‘‘आमच्या कंपनीत आज एक अपघात झाला. कंट्रोल पॅनेलमध्ये विद्युत गळती होऊन शॉर्टसर्किट झालं. त्यामुळे मोठंच नुकसान झालं. यावर काही उपाय आहे का रे तुमच्या पॉलिमर तंत्रज्ञानात?’’ या प्रश्नाने दोघांची झोप उडाली. अभ्यास सुरू झाला आणि प्रयत्नपूर्वक ‘इलेक्ट्रिकल इन्शुलेशन कोटिंग’ हे रसायन त्यांनी तयार केलं, ज्याची धारणाशक्ती (कॅपॅसिटी) होती/आहे ५९००० व्होल्ट. म्हणजे तहहयात गॅरन्टी. हा प्रयोग कमालीचा यशस्वी ठरला. याच उत्पादनाने ‘एस. के. एफ.’च्या नावावर पहिलं पेटंट जमा केलं.

यानंतर मार्केटचा अदमास घेत वेगवेगळे प्रयोग सुरू झाले. कुसुम म्हणतात, ‘‘मुळात मोठय़ा प्रमाणात उत्पादन करणं हा आमचा उद्देश कधीच नव्हता. तेव्हाही आणि आताही आमचा दृष्टिकोन हाच की दहा लोक जे करतात ते आपण करायचं नाही. ग्राहकांच्या गरजेचं आणि सोयीचं (कस्टमर फ्रेंडली) नवं काही तरी शोधत राहायचं. आपला रंग नेहमी वेगळा असायला हवा..’’

गंजविरोधक कोटिंगच्या माध्यमातून भारतीय नौदलाशी संबंध आल्यावर जोशी दाम्पत्याने त्यांना त्यांच्या गरजेप्रमाणे वेगवेगळी सोल्युशन्स द्यायला सुरवात केली. युद्धनौकांवरील रडारच्या अँटिनावर लावण्याचं कोटिंग (रेडिओ फ्रिक्वेन्सी कोटिंग) हे त्यातील एक महत्त्वाचं उत्पादन. पूर्वी हे रसायन रशियाकडून आयात केलं जात असे. तेव्हा नव्वद नॉटिकल मैलांपर्यंतची (१६७ कि. मी.) जहाजं दृष्टीस पडायची. आता ‘एस. के. एफ.’ च्या स्वदेशी मालामुळे एकशेदहा नॉटिकल मैल अंतरापर्यंतचं (२०४ कि.मी) एकही जहाज नजरेतून सुटत नाही. सचिन म्हणतात, ‘‘देशासाठी आमची सेवा रुजू झाली याचा आम्हाला अभिमान वाटतो..’’

पाणी गळती थांबवण्याबरोबर पन्नास टक्क्यांपर्यंत वीज बचत करणारं त्यांचं उष्णतारोधक कोटिंग म्हणजे सर्वसामान्यांपासून कंपन्यांपर्यंत सर्वासाठीच एक वरदान आहे, असा जोशी दाम्पत्याचा दावा आहे. मुंबईतील अनेक घरं व कंपन्यांसाठी यशस्वी प्रयोग केल्यानंतर हैदराबादच्या एका प्रसिद्ध कंपनीकडून परदेशी स्पर्धकांवर मात करत मिळालेलं काही कोटी रुपयांचं काम म्हणजे आपल्या गुणवत्तेवर शिक्कामोर्तब असं ते मानतात. त्यांच्या या उत्पादनाला (हीट इन्शुलेशन कोटिंग) दुबई विमानतळाच्या व्यवस्थापनानेही हिरवा सिग्नल दिलाय.

अशा वैशिष्टय़पूर्ण उत्पादनांमुळे ‘एस.के. एफ.’ला राष्ट्रीय पुरस्कार तर मिळालाच शिवाय सचिन व

डॉ. कुसुम जोशींना वैयक्तिक स्तरावर ‘उद्योगश्री’सह अनेक सन्मान प्राप्त झाले. त्याबरोबर थायलंड, दुबई, फिलिपाइन्स, श्रीलंका या देशात सर्व उत्पादनांची निर्यातही सुरू झाली. आता त्यांना अमेरिकेची बाजारपेठ खुणावते आहे.

पन्नास चौरस फुटांपासून सुरवात करत आता ‘एस. के. एफ.’ ने ठाण्याजवळील रबाळे इंडस्ट्रियल एरिया येथील दहा हजार चौरस फुटांच्या जागेत आपलं बस्तान बसवलं आहे. कंपनीतील कामाची वाटणी म्हणाल तर विक्री आणि विपणन (सेल्स आणि मार्केटिंग) ही जबाबदारी सचिन यांची तर उर्वरित सर्व कामं कुसुम यांच्या शिरावर. संशोधनाचा वाटा मात्र दोघांचा. त्यांची ४० कर्मचाऱ्यांची टीमही जिवाला जीव देणारी. हे आपलेपणाचं नातं निर्माण करण्याचं श्रेय कुसुम यांचं.. (इति सचिन)

याच प्रेमाने त्यांनी सासरी व माहेरी सर्वाना बांधून ठेवलंय. सचिन, कुसुम, त्यांची एकुलती एक कन्या रिद्धी व सचिनचे आई-बाबा असं हे एकसुखी समाधानी कुटुंब. कुसुम यांचं माहेरही जवळच असल्याने रिद्धी लहानाची मोठी (यंदा अकरावीत) कधी झाली ते दोघांनाही कळलं नाही.

उद्योगविश्वातील भरारीसोबत सचिन व कुसुम ‘उडान वेल्फेअर फाऊंडेशन’ या सामाजिक संस्थेशी गेली १० र्वष संलग्न आहेत. शिक्षण व स्त्रियांचं सक्षमीकरण यासाठी कटिबद्ध असलेल्या ‘उडान’साठी ते आपला पैसा व वेळ दोन्ही देतात.

मागे वळून बघताना गेल्या २० वर्षांत जे काही मिळवलं त्याबद्दल दोघंही पूर्ण समाधानी आहेत. मात्र भविष्यात पॉलिमर क्षेत्रातील अद्ययावत प्रयोगशाळा आणि ट्रेनिंग सेंटर सुरू करण्याचं त्यांचं स्वप्न आहे. हे स्वप्नंही लौकरच पूर्ण व्हावं यासाठी शुभेच्छा!

संपर्क – डॉ. कुसुम जोशी

९८२१६९२०५०

sachin@skformulations.com
waglesampada@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2016 1:12 am

Web Title: business stories article
Next Stories
1 ..येथे भान हरावे
2 हे शब्दाविन ये आमंत्रण..
3 आयुष्याचा महोत्सव
Just Now!
X