News Flash

दमा गैरसमजुतींचा आजार!

आरोग्यावर लेखन करणारे लेखक आणि संपादकांची राष्ट्रीय परिषद नुकतीच गोव्यात पार पडली. ‘हील फाऊंडेशन’, ‘इंडियन मिडिया सेंटर’ आणि ‘व्हायामिडिया हेल्थ’ या संस्थांनी या परिषदेचे आयोजन

| September 16, 2014 06:44 am

आरोग्यावर लेखन करणारे लेखक आणि संपादकांची राष्ट्रीय परिषद नुकतीच गोव्यात पार पडली. ‘हील फाऊंडेशन’, ‘इंडियन मिडिया सेंटर’ आणि ‘व्हायामिडिया हेल्थ’ या संस्थांनी या परिषदेचे आयोजन केले होते. श्वसनविकार तज्ज्ञ डॉ. सुजित राजन यांनी या वेळी दमा आणि त्याविषयीचे समज- गैरसमज याविषयी विवेचन केले. त्याचा हा संपादित अंश..
दमा- नावापासूनच गैरसमजुतींना सुरूवात!
 ‘अस्थमा’ किंवा ‘दमा’ हे शब्दच घाबरवणारे आहेत. या आजाराच्या नावापासूनच गैरसमजुतींना सुरूवात होते. दम्यावरील उपचारांमध्ये वापरले जाणारे ‘इन्हेलर’ आणि त्यात वापरली जाणारी ‘स्टिरॉईड’ औषधे या रुग्णांना आणखी घाबरवणाऱ्या आणि त्यांच्या मनात पुरता गोंधळ निर्माण करणाऱ्या गोष्टी. आपल्याला सगळे ‘दमेकरी’ म्हणूनच ओळखतील याच्या भीतीमुळे तसेच आणि ‘इन्हेलर्स’ आणि ‘स्टेरॉईडस्’बद्दलच्या गैरसमजुतींमुळे रुग्ण गोळ्या आणि पातळ औषधांचा मार्ग पत्करतात. प्रसंगी दम्याची जाणवणारी लक्षणेही बळेच सहन करायची त्यांना सवय होऊन जाते. दम्याविषयीची चौथी आणि अडचणीची ठरू शकणारी गोष्ट म्हणजे ‘सध्या बरे वाटते आहे’ या सबबीवर उपचार बंद करून टाकणे. दम्याचा त्रास होत नसतानाही रुग्णांनी त्यावरील नियमित उपचार सुरू ठेवणे आवश्यक ठरते.
इन्हेलर आणि स्टेरॉईडस् – खरेच भीतीदायक आहेत का?
दम्यावरील ‘स्टेरॉईड’ आौषधांनी दमेकरी रुग्णांचे जीवन खरोखरच बदलून टाकले आहे. दम्यात होणारा श्वसनमार्गाचा दाह कमी करण्यासाठी स्टेरॉईडस् उपयुक्त ठरतात. अगदी लहान मुलांसाठीही इन्हेलर स्टेरॉईड औषधे वापरणे सुरक्षित आहे. ही स्टेरॉईडस् गोळ्यांच्या स्वरूपात घेणे आणि ‘इन्हेलर’द्वारे घेणे यात मात्र खूप फरक आहे. यातला अधिक सुरक्षित प्रकार अर्थातच ‘इन्हेलर’चा आहे. इन्हेलर म्हणजे तोंडावाटे औषध ओढण्याचे उपकरण. यात स्टेरॉईड औषधाचा डोस वीस पटीने कमी घेतला जातो, तेव्हा स्टेरॉईड औषधांची भीती नको. या औषधांविषयी आणि इन्हेलरच्या वापराविषयी आपल्या डॉक्टरांशी सविस्तर बोलून, आपल्या सर्व शंकांचे निरसन करून घेणेच चांगले.
उपचार- आजारावर की लक्षणांवर?
दम्याच्या एखाद्या रुग्णाला दम्याचा झटका आल्यावर तातडीने रुग्णालयात हलवले जाते, फुफ्फुसात औषध पोहोचवण्यासाठीचे ‘नेब्युलायझर’ हे उपकरण वापरून त्याच्यावर उपचार होतात आणि बरे वाटल्यावर रुग्णाला घरी सोडले जाते. पण खरे सांगायचे तर नेब्युलायझरचा वापर आपल्या देशात दम्यासाठी अतिप्रमाणात केला जातो. कारण त्याद्वारे शरीरात जाणारा औषधांचा डोस मोठा असतो. मग नेब्युलायझर वापरायचाच नाही का किंवा केव्हा वापरायचा असा प्रश्न पडणे साहाजिक आहे. दम्याच्या त्रासाची अगदी तीव्र लक्षणे असताना नेब्युलायझरचा वापर चूक नव्हे. पण मुळात दम्यावर नियमित उपचार करण्यासाठी इन्हेलरच उपयुक्त ठरते. आपल्याला केवळ आजाराच्या लक्षणांवर उपचार करायचे नसून मूळ आजारावर उपचार करायचे आहेत.
प्रदूषणामुळे दमा होतो का?
दम्याचे मूळ कारण ज्ञात नाही. प्रदूषणामुळे दमा होत नाही हे खरे, पण प्रदूषण हे दम्याचा असलेला त्रास वाढण्यासाठी कारणीभूत ठरते.
दमेकऱ्यांनी व्यायाम करूच नये का?
दमेकरी व्यक्ती म्हणजे व्यायामावर फुली असे मुळीच नाही. विशेषत: दमेकरी लहान मुलांसाठी व्यायाम खूप फायदेशीर ठरतो. अगदी उबदार पाण्यात पोहण्यासारखे व्यायाम देखील ही मंडळी करू शकतात. आपल्या प्रकृतीला कोणता व्यायाम मानवेल, कोणत्या व्यायामामुळे आजार बरा होण्यासाठीही मदत होईल याविषयीही आपल्या डॉक्टरांशी जरूर चर्चा करा.
शब्दांकन- संपदा सोवनी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2014 6:44 am

Web Title: asthma
टॅग : Asthma,Health It
Next Stories
1 चायनिज खाताय? जरा जपून
2 गर्भाशयाचा कॅन्सर (युटेरायिन कॅन्सर)
3 मुलगा- एक दिवस लवकर आलो आणि बघतो तर बाबा आपल्या मत्रिणीबरोबर.. तेसुद्धा घरी!
Just Now!
X