स्वयंपाकघरात मसाल्याचा पदार्थ म्हणून वापरला जाणारा दालचिनी  टाईप-२ मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करू शकते, असे संशोधनात दिसून आले आहे. टाईप २ मधुमेहाच्या ५४३ रुग्णांची अंदाजे निवड करून त्यांच्या माहितीचे विश्लेषण करण्यात आले. गोळीच्या स्वरूपात दालचिनी १२० मि.ग्रॅ ते ६ ग्रॅम इतक्या प्रमाणात घेणाऱ्या रुग्णांच्या रक्तातील साखर १८ आठवडय़ांत कमी झालेली दिसली. तुलनेने दालचिनी न घेणाऱ्या रुग्णात साखरेचे प्रमाण तसेच राहिले. दालचिनी सेवन करणाऱ्या रुग्णात उपाशीपोटी प्लाझ्मा ग्लुकोजचे प्रमाणही कमी होते. सिनॅमोनम कॅसिया या प्रकारच्या दालचिनीचा वापर यात करण्यात आला. त्यांना जेवणाआधी व नंतर अशा दोन पद्धतीने दालचिनीच्या गोळ्या देण्यात आल्या. त्यामुळे एसडीएल हे वाईट कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराइड यांचे प्रमाण कमी झाले तर एचडीएल या चांगल्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढले, असे कॅलिफोर्नियातील पोमोन येथे अशलेल्या वेस्टर्न युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेसच्या प्रा. ऑलिव्हिया फंग यांनी सांगितले. दालचिनीतील सिनॅमाल्डेहायडेन या रसायनामुळे शरीरात त्याचा चांगला परिणाम दिसून येतो. त्यामुळे इन्शुलिनसारखाच परिणाम साध्य होऊन रक्तातील साखर कमी होते. दालचिनी नेमकी किती मात्रेत व किती वेळा घेतल्याने फायदे होतात याची निश्चिती अजून झालेली नाही. ‘द अ‍ॅनल्स ऑफ फॅमिली मेडिसीन’ या नियतकालिकात हा शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे.