28 November 2020

News Flash

फळे व भाज्या सेवनाने पित्ताशयाच्या कर्करोगाचा धोका कमी

फळे व भाज्या यांच्या सेवनाने स्त्रियांमध्ये पित्ताशयाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो असे संशोधनात दिसून आले आहे.

| September 7, 2013 03:58 am

फळे व भाज्या यांच्या सेवनाने स्त्रियांमध्ये पित्ताशयाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो असे संशोधनात दिसून आले आहे. हवाई येथील कर्करोग केंद्राचे संशोधक सोंग यी पार्क व त्यांच्या सहकाऱ्यांनी एकूण १८५,८८५ प्रौढांचा साडेबारा वर्षे अभ्यास केला. त्यांच्यापैकी १५८ महिला व ४२९ पुरुष यांना पित्ताशयाचा कर्करोग झालेला होता. ‘मल्टीएथनिक कोहोर्ट’ अभ्यासाचा भाग म्हणून  आहार, जीवनशैली, जनुकीय घटक व कर्करोगाची जोखीम यांचा विचार करण्यात आला. ज्या महिलांनी जास्त प्रमाणात फळे व भाज्या सेवन केल्या होत्या, त्यांना पित्ताशयाचा कर्करोग कमी प्रमाणात झाल्याचे दिसून आले. ज्या महिलांनी नारिंगी व पिवळ्या रंगाच्या भाज्या सेवन केल्या, त्यांना नारिंगी व पिवळ्या रंगाच्या भाज्या ज्यांनी कमी  प्रमाणात सेवन केल्या त्यांच्यापेक्षा पित्ताशयाच्या कर्करोगाची जोखीम कमी होती असे दिसून आले. ज्या स्त्रियांनी अ, क, व इ जीवनसत्त्वे सेवन केली होती त्यांच्यातही ही जोखीम कमी होती. पुरुषांमध्ये मात्र फळे व भाज्या यांचे सेवन व पित्ताशयाचा कर्करोग यांचा संबंध दिसून आला नाही. फळे व भाज्यांच्या सेवनाने स्त्रियांमध्येच असा परिणाम का दिसून येतो यावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे असे पार्क यांनी म्हटले आहे.
ब्रोकोलीमुळे संधिवाताला अटकाव
ब्रोकोली या भाजीतील एक संयुग संधिवाताच्या अनेक प्रकारांना अटकाव करते किंबहुना त्याची वाढ रोखते, असे नवीन अभ्यासात दिसून आले आहे. इस्ट अँग्लिया विद्यापीठातील संशोधकांनी म्हटले आहे, की ब्रोकोलीमध्ये असलेल्या सल्फोराफेन या संयुगामुळे सांध्यांमधील कूर्चाची हानी कमी होते. कूर्चाची हानी झाल्याने ऑस्टिओआरथ्रायटिस होतो. त्यामुळे हात, पाय, मणका, गुडघे यांच्यावर खूप वाईट परिणाम होऊन ते दुखत राहतात. ब्रुसेल्स स्प्राउट, फुलकोबी विशेष करून ब्रोकोलीच्या सेवनाने सल्फोराफेन शरीरात सोडले जाते. उंदरांवर केलेल्या प्रयोगात असे दिसून आले, की या संयुगाचा समावेश असलेला आहार दिल्याने कूर्चाची हानी कमी होते, परिणामी हाडांचा संधिवातही कमी होतो. मानव, गाय यांच्या कूर्चा पेशींवर नेमका काय परिणाम होतो हे यात तपासण्यात आले. यूइए स्कूल ऑफ बायोलॉजिकल सायन्सेस, नॉरविच मेजिकल स्कूल, ऑक्सफर्ड, नॉरफोक, नॉरविच विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने हे संशोधन करण्यात आले. संधिवात संशोधन विभागाचे वैद्यकीय संचालक प्रा. अॅलन सिलमन यांनी सांगितले, की ब्रोकोलीसारख्या नेहमीच्या भाजीने हाडांचा व इतर प्रकारचा संधिवात असलेल्या रुग्णांना फायदा होतो. आतापर्यंत आहाराचा हाडांचा संधिवात रोखण्याशी असलेला संबंध दर्शवणारे संशोधन झाले नव्हते. उंदरांमध्ये ब्रोकोलीयुक्त आहाराने कूर्चा पेशींवर चांगला परिणाम दिसून आला. मानवातही असाच चांगला परिणाम दिसून येईल, असे मत स्नायूजीवशास्त्राचे प्रा. आयन क्लार्क यांनी सांगितले. एकूण ४० रुग्णांवर सुपर ब्रोकोलीचा प्रयोग करण्यात येणार असून त्यात सल्फोराफेनचे प्रमाण जास्त असणार आहे, त्यांना गुडघ्याच्या शस्त्रक्रियेच्या दोन आठवडे अगोदर असा आहार दिला जाणार आहे. त्यानंतर या रुग्णांमध्ये काही फरक दिसून येतो किंवा काय याचा शोध घेतला जाणार आहे.आरथ्रायटिस अँड ऱ्हुमॅटिझम या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
डिमेन्शियावर स्टॅटिन औषधे उपयोगी
वयानुसार वृद्धांमध्ये वाढीस लागणाऱ्या डिमेन्शियावर स्टॅटिन औषधांचा जास्त डोस प्रभावी ठरतो असे संशोधनातून दिसून आले आहे. यात एकूण ५८००० रुग्णांची पाहणी करण्यात आली. त्यात ज्यांनी जास्त प्रमामात स्टॅटिन्स घेतले होते त्यांचे डिमेन्शियापासून रक्षण झालेले दिसले. तैवानच्या नॅशनल हेल्थ इन्शुरन्स योजनेचे सदस्य असलेल्या १० लाख रुग्णांची माहिती यात घेण्यात आली. एकूण साडेचार वर्षांच्या कालावधीत ५५१६ जणांना डिमेन्शियाचे निदान झाले होते. उर्वरित ५२१५३ व्यक्ती या ६५ वर्षांवरील होत्या. डॉ. टिन से लिन यांनी सांगितले, की डिमेन्शियाची जोखीम ही रोज स्टॅटिन सेवन करणाऱ्या रुग्णांमध्ये कमी होते असे दिसून आले आहे. स्टॅटिनमुळे हा धोका तीन पटींनी कमी होतो. अॅटोरव्हस्टॅटिन व रोसुव्हॅस्टॅटिन या औषधांमुळे डिमेन्शियाचा धोका कमी झाल्याचे दिसून आले.
आत्महत्येची शक्यता ओळखण्यासाठी रक्तचाचणी
एखादी व्यक्ती भविष्यात पुढे जाऊन आत्महत्या करील असा अंदाज करता येत नाही पण आता संशोधकांनी असे आरएनए बायोमार्कर शोधून काढले आहेत की, ज्यांच्या मदतीने रक्ताची चाचणी करून एखादी व्यक्ती आत्महत्या करण्याची जोखीम कितपत आहे हे सांगता येईल. ‘जर्नल ऑफ मॉलिक्युलर सायकिअॅट्री’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार इंडियाना विद्यापीठात तीन वर्षे व्यक्तीमत्व भंगाच्या काही रूग्णांवर याबाबत प्रयोग करण्यात आले आहेत. त्यात या रूग्णांच्या मानसरोगतज्ञांनी मुलाखती घेतल्या. त्यांच्यात कुठल्या प्रकारचे विचार आहेत हे बघितलेगेल व तीन-सहा महिन्यांनी त्यांच्या रक्ताचे नमुने घेतले गेले. प्रत्येक भेटीच्या वेळी त्यांचे हॅमिल्टन रेटिंग स्केल फॉर डिप्रेशन-१७ या मोजमाप पद्धतीने मूल्यांकन करण्यात आले. आत्महत्येचे विचार व हे मूल्यांकन यांची सांगड घालण्यात आली. या रूग्णांमध्ये आत्महत्येचे विचार नसतानापासून ते प्रबळ होईपर्यंत रक्तात काय बदल दिसून येतात हे तपासण्यात आले. त्यात असे दिसून आले त्यांच्या जनुकांमध्ये फरक पडत जातो. सॅट- १ या बायोमार्करमुळे आत्महत्येचे विचार ओळखता येतात किंबहुना तो त्याचा जैविक संदेश असतो. त्यानंतर ज्यांनी आत्महत्या केलेली आहे अशा व्यक्तींचे नमुनेही तपासण्यात आले असता त्यांच्यातही या प्रकारच्या बायोमार्करचे प्रमाण वाढलेले होते असे दिसून आले आहे. इंडियाना युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन या संस्थेचे डॉ. अॅलेक्झांडर निक्युलेस्क्यू यांनी सांगितले की, या बायोमार्करची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर ज्या दोन गटातील व्यक्तींवर हे संशोधन चालू होते त्यांच्या रक्तचाचण्यातही सॅट १ बायोमार्करचे प्रमाण जास्त असलेल्या रूग्णांमध्ये आत्महत्येचे विचार मोठय़ा प्रमाणात होते असे दिसून आले, त्यामुळे या संशोधनाच्या आधारे आत्महत्येची जोखीम असलेल्या रूग्णांची रक्ताची चाचणी आणखी प्रगत पद्धतीने विकसित करता येईल

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2013 3:58 am

Web Title: important health tip
Next Stories
1 तेलातुपाचे कोडे..
2 दातांचे किडणे आणि आपला आहार!
3 मानसस्वास्थ्य – चिंता
Just Now!
X