‘डॉक्टर.. माझा गुडघा खूप दुखतोय..तुम्ही माझी ‘नी रीप्लेसमेंट’ करून टाका! म्हणजे पुन्हा कटकट नको!’ असा तक्रारवजा सल्ला घेऊन अनेक रुग्ण डॉक्टरांकडे येतात. गुडघ्याच्या जुनाट दुखण्यावर नी रीप्लेसमेंट शस्त्रक्रिया करून कृत्रिम गुडघा बसवता येतो हे त्यांना माहीत असते. सततच्या दुखण्यापेक्षा एकदाची शस्त्रक्रिया करून टाकलेली बरी!, अशी त्यांची भावना असते. पण नी रीप्लेसमेंट हा गुडघेदुखीवरचा एकमेव उपाय निश्चितच नाही. तो अंतिम उपाय आहे. ही शस्त्रक्रिया नेमकी केव्हा करतात, कृत्रिम गुडघा बसवतात म्हणजे काय, हे जाणून घेऊ अस्थिशल्यविशारद डॉ. संजीव गोखले यांच्याकडून-
गुडघ्याचे दुखणे घेऊन जेव्हा रुग्ण डॉक्टरांकडे जातो तेव्हा त्याला दुखणे कमी करणारी गोळ्या- औषधे दिली जातात, थोडी विश्रांती घ्यायला, गुडघा कोमट पाण्याने शेकायला सांगितले जाते. एवढे करुनही रुग्णाला बरे वाटले नाही तर त्याला चालताना ‘नी कॅप’ वापरुन पाहायला सांगतात, हातात काठीचा आधार घ्यायलाही सुचवतात. या सर्व गोष्टी करून झाल्या आणि दुखणे आटोक्यात आले तर ते पुन्हा उद्भवू नये म्हणून विशिष्ट व्यायाम करायला सांगितले जाते. त्यानंतरचा टप्पा म्हणजे रुग्णाचे वजन अधिक असल्यास ते कमी करायला सांगणे. पण सर्व उपाय करूनही गुडघ्याचे दुखणे कमी झालेच नाही तर अंतिम उपाय म्हणून कृत्रिम गुडघा प्रत्यारोपणाचा विचार केला जाऊ शकतो. हा विचार करताना गुडघेदुखीची तीव्रता आणि ते दुखणे किती जुने आहे या गोष्टी लक्षात घेणे आवश्यक असते. गुडघ्याला मार लागणे, फ्रॅक्चर होणे किंवा वयस्कर व्यक्तींना गुडघ्याची झीज झाल्यामुळे झालेली गुडघेदुखी या प्रकारांत उपचार सुरू असूनही दुखणे पूर्णपणे जाण्यास दीड-दोन महिन्यांचा कालावधी लागू शकतो. चार-पाच महिने डॉक्टरांनी सांगितलेले सर्व उपाय भक्तिभावाने करूनही दुखणे जाण्याचे नावच घेत घेत नसेल तरच शस्त्रक्रियेचा पर्याय तपासून पाहिला जातो.
गुडघ्याची झीज कशी होते?
व्यक्तीचे वय लहान असताना अपघात होणे, संधीवात, युरिक अ‍ॅसिड वाढलेले असणे, सोरायटिक अथ्र्रायटिस असणे या कारणांमुळे गुडघेदुखी होऊ शकते. पण गुडघा झिजल्यामुळे झालेली गुडघेदुखी साधारणपणे वयाच्या साठीनंतरच डोके वर काढते.
हाडांचा पृष्ठभाग निरोगी असताना गुळगुळीत असतो. गुडघ्याच्या दोन हाडांच्या मध्ये असलेल्या कूर्चेला वैद्यकीय भाषेत ‘मेनिस्कस’ म्हणतात तर हाडाच्या वरील कूर्चेला (आवरणाला) ‘कार्टिलेज’ म्हणतात. वय वाढत जाते तसे दोन हाडाच्या मधले मेनिस्कस आधी झिजू लागते, मग हाडाच्या वरील कार्टिलेजही झिजण्यास सुरूवात होते. झीजेमुळे हाडांचा पृष्ठभाग खडबडीत व्हायला लागतो. त्याला बारीक भेगा पडायला लागतात. पुढे या भेगा मोठय़ा होत जाऊन आणि हाडाच्या पृष्ठभागावर खड्डे पडू लागतात. या खड्डय़ांमुळे दोन हाडांचे एकमेकांवरील घर्षण वाढते आणि दुखणे सुरू होते. हाडे एकमेकांवर घासली जाऊन तिथे पाणी निर्माण होते आणि गुडघा सुजतो. हाडाच्या कूर्चेला अजिबात संवेदना नसतात. हाडाच्या आत मात्र नव्‍‌र्हज् असतात. त्यामुळेच कूर्चा झिजून जेव्हा हाड उघडे पडते आणि हाडावर हाड घासले जाते तेव्हा तीव्र वेदना होतात आणि टाकलेले प्रत्येक पाऊल क्लेशदायक बनते.
दोन निरोगी हाडे एकमेकांवर अगदी चपखल बसलेली असतात. जेव्हा एखादे हाड मार लागून फ्रॅक्चर होते तेव्हा त्याचा आकार काहीसा बदलतो. गुडघ्याच्या आतील हाडाच्या आकारात सुमारे ४ मिलिमिटरपेक्षा अधिक फरक पडला तर दुखणे सुरू होते.       
गुडघेदुखीबद्दलच्या काही ठळक गैरसमजुती-
१. वय वाढल्यावर गुडघ्यातील तेल किंवा वंगण कमी झाले म्हणून गुडघा कुरकुरतो, अशी लोकांची समजूत असते. ही मोठी गैरसमजूत आहे. वयानुसार वंगण नव्हे तर त्याची गुणवत्ता कमी होत असते.
गुडघ्यांतील वंगणाला ‘सायनोव्हिअल फ्लुइड’ म्हणतात. त्याला एक प्रकारचा चिकटपणा, घनता असते. हालचाली करताना वंगणाच्या चिकटपणामुळेच हाडे एकमेकांपासून विलग राहू शकतात. हाडांच्या झिजेबरोबर वंगणाची घनता कमी होऊन ते पातळ होते. वंगण पातळ झाल्यावर हाडे एकमेकांच्या जवळ येतात आणि घर्षणास सुरूवात होते.
२. वयामुळे हाडे ठिसूळ झाल्यामुळे आपला गुडघा दुखतो असे अनेक रुग्ण सांगतात. ही आणखी एक गैरसमजूत आहे. हाडे ठिसूळ झाली तर ती लवकर मोडतात. आपण आपल्या उंचीएवढय़ा उंचीवरून पडलो आणि हाड फ्रॅक्चर झाले तर अशा व्यक्तीची हाडे मुळातच ठिसूळ आहेत असे म्हणतात. हाडे कमकुवत असतील तर अंग दुखेल, अशक्तपणाही वाटू शकेल. पण ठिसूळ हाडे कोणताही विशिष्ट सांधा दुखायला कारणीभूत ठरत नाहीत.
शस्त्रक्रिया केव्हा?  
कृत्रिम गुडघा प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया साधारणपणे रुग्णाच्या साठीनंतर करायचा सल्ला दिला जातो. कारण बसवलेला कृत्रिम गुडघा सुमारे वीस-बावीस वर्षे टिकतो. अर्थात लहान वयात शस्त्रक्रियेला पर्यायच नाही अशी रुग्णाची स्थिती असेल तर ती केली जाते. पण शक्यतो लहान वयात शस्त्रक्रिया टाळण्याचा प्रयत्न केला जातो. पण अशा रुग्णांमध्ये कृत्रिम गुडघ्याचे वीस वर्षांचे वय उलटले की पुन्हा शस्त्रक्रियेची गरज पडू शकते. त्याला ‘रीव्हिजनल रीप्लेसमेंट’ शस्त्रक्रिया म्हणतात.  
कृत्रिम गुडघा प्रत्यारोपणाचे प्रकार
गुडघ्याला तीन कप्पे असतात. शरीराच्या आतल्या बाजूचा कप्पा, बाहेरच्या बाजूचा कप्पा आणि गुडघ्याच्या वाटीच्या मागचा कप्पा. भारतीय रुग्णांमध्ये यांतील  आतला आणि बाहेरचा कप्पा खराब झालेला दिसतो. क्वचित कुठलातरी एकच कप्पा खराब झालेलाही आढळतो. गुडघ्याचा एकच कप्पा बदलण्याच्या शस्त्रक्रियेला ‘युनिकंपार्टमेटल नी रीप्लेसमेंट’ म्हणतात. तर दोन कप्पे बदलण्याच्या शस्त्रक्रियेला ‘टोटल नी रीप्लेसमेंट’ म्हणतात.
भारतीय रुग्णामध्ये सहसा गुडघ्याची वाटी खराब होत नाही. पण पाश्चात्य रुग्णामध्ये ही वाटीही सर्रास खराब झालेली आढळते. आपल्याकडे जमिनीवर मांडी घालून बसणे, उकीडवे बसणे या हालचाली अगदी दररोज केल्या जातात. अशा प्रकारच्या नियमित हालचाली गुडघ्याची वाटी खराब न होण्यासाठी कारणीभूत ठरत असावी.
काही वेळा तरूण रुग्णांमध्ये गुडघ्याला केवळ बाक आलेला आढळतो. अशा वेळी गुडघ्याचा एखादाच कप्पा खराब व्हायला सुरूवात झालेली असते. अशा वेळी शस्त्रक्रियेत गुडघ्याचा बाक सरळ केला जातो. याला ‘हायटिबिअल ऑस्टिओटॉमी’ म्हणतात. यासाठी कोणताही कृत्रिम भाग गुडघ्यात बसवण्याची गरज पडत नाही.
दोन्ही गुडघे एकदम एका वेळी बदलण्याच्या शस्त्रक्रियेला ‘बायलॅटरल नी रीप्लेसमेंट’ म्हणतात. पूर्वी अशा रुग्णांमध्ये एक गुडघा आधी बदलून सुमारे पंधरा दिवसांनी दुसरा गुडघा बदलला जात असे. पण दोन्ही गुडघे बदलण्याची आवश्यकता असेल तर ते एकदमच बदण्याचे काही फायदे असल्याचे दिसून आले आहे. जंतूसंसर्गाचा धोका कमी होणे, शस्त्रक्रियेत होणारे काही विशिष्ट खर्च कमी होणे असे हे फायदे आहेत.
कृत्रिम गुडघारोपणाची शस्त्रक्रिया झाल्यावर दोन-तीन दिवसांत रुग्ण चालू शकतो. पहिले पंधरा दिवस वॉकर घेऊन चालण्याचा सल्ला दिला जातो. त्यापुढील पंधरा दिवस काठीचा आधार घेऊन चालायला सांगतात. महिना-दीड महिन्याने रुग्ण सुटा चालू शकतो. त्याला टप्प्याटप्प्याने फिजिओथेरपीचे व्यायामही सांगितले जातात. या शस्त्रक्रियेनंतर चालणे-फिरणे, वाहन चालवणे, जिने चढणे- उतरणे, मांडी घालून बसणे या हालचाली करताना व्यक्तीला काहीही अडचण येत नाही. पण सहसा उकिडवे बसणे अशा व्यक्तीला जमत नाही. तसेच त्याला टेनिस, बॅडमिंटनसारखे मैदानी खेळ न खेळण्याचा सल्ला दिला जातो. अर्थात रुग्ण वयस्कर असले तर त्याला मैदानी खेळ खेळण्याची अपेक्षाही नसते. पण दुखण्यामुळे जे रुग्ण चालूही शकत नसतात त्यांचे रोजचे जीवन नक्कीच सुकर होते.  

व्यायाम का गरजेचा?
वाढलेले वजन आणि व्यायामाचा अभाव सांधेदुखीला कारणीभूत ठरतात. चालताना, व्यायाम करताना गुडघ्याची दोन हाडे एकमेकांवर दाबली जातात. असे होताना दोन हाडांमधील वंगणही हाडांवर दाबले जाऊन ते हाडाच्या आवरणामधून आत झिरपते. या वंगणात प्राणवायू असतो. वंगण कूर्चेच्या आत दाबले गेल्याने कूर्चेचे पोषण होते आणि कूर्चा निरोगी राहते. अर्थातच तो सांधाही निरोगी राहतो. म्हणून व्यायाम महत्त्वाचा. वजन आटोक्यात राहणे हा व्यायामाचा अप्रत्यक्ष फायदा असतो.

balmaifal article, story for kids, water literacy, Water importance, do not waste water lesson, story cum lesson for water, save water, kids and water, marathi article, loksatta article,
बालमैफल : जलसाक्षरता
Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?