सर्वानाच चरबी वाढल्याने लठ्ठपणा येण्याची भीती वाटते त्यासाठी डाएटिंग वगैरे अनेक उपायही केले जातात पण लठ्ठपणा हा जनुकांशीही निगडित असतो. पेरिलिपिन २ या प्रथिनाशी संबंधित जनुक काढून टाकले किंवा ते एखाद्या व्यक्तीत नसेल, तर त्या व्यक्तीने जास्त उष्मांक असलेला आहार घेतला, तरी ती लठ्ठ होणार नाही असे प्राथमिक संशोधनात दिसून आले आहे.  उंदरांवर केलेल्या प्रयोगात या जनुकाचे महत्त्व स्पष्ट झाले आहे. पेरिलिफिन-२ शी संबंधित जनुक नसलेल्या उंदरांसह इतर काही उंदरांना १२ आठवडे पाश्चात्त्य पद्धतीचा साखर, खूप मेद असलेला मुबलक आहार दिला असता ज्यांच्या पेरिलिफिन-२ नव्हते त्यांच्याच लठ्ठपणा आला नाही. विशेष म्हणजे इतर उंदरांनी मुबलक अन्न सेवन केले तर हे जनुक नसलेल्या उंदरांनी कमी आहार सेवन केला. त्यांच्यात मेदपेशी कमी व लहान होत्या, ट्रायग्लिसराइडचे प्रमाण कमी होते व इन्शुलिन संवेदनशीलता चांगली होती. अमेरिकेतील टफ्ट्स विद्यापीठात हे संशोधन करण्यात आले. पेरिलिफिन-२ शी संबंधित जनुक नसलेल्या उंदरांचे हालचालींचे
प्रमाणही जास्त होते त्यांच्यात पांढऱ्या मेदपेशीपेक्षा तपकिरी रंगाच्या मेद जाळणाऱ्या मेदपेशी जास्त दिसून आल्या. माणसातही पेरिलिफिन-२ संबंधित जनुक असते त्यामुळे हे संशोधन माणसातही लागू आहे. मधुमेह व लठ्ठपणा यावर मात करण्यासाठी नवी औषधे तयार करण्यासाठी त्यातून दिशा सापडू शकेल. ‘लिपीड रीसर्च’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.