पावसाने निरोप घेतल्यानंतर अवघ्या काही दिवसात वाढलेल्या तापमानाने सगळ्यांना त्रस्त करून सोडले आहे. या त्रासदायक उन्हाने विविध रोगांना आमंत्रणही दिले आहे.
* गरम आणि दमट हवेच्या विषाणूवाढीसाठी पूरक वातावरणात जंतूंची पैदास सहज होऊ शकते. त्यामुळे विविध प्रकारचे संसर्गजन्य रोग झपाटय़ाने पसरतात. अतिथंड पेयामुळे जीवाणूंसाठी घशाजवळ पोषक परिस्थिती निर्माण होते. हल्ली बहुतेकांना होणाऱ्या आम्लपित्ताच्या (अ‍ॅसिडिटी) त्रासात आम्ल घशापर्यंत येत असते. अशाप्रकारे संसर्ग आणि प्रदूषणामुळे घशाचा भाग कायम संवेदनशील असतो आणि कुठल्याही घातक बदलामुळे संसर्गाचे प्रमाण वाढते.
* वाढलेल्या उष्म्यामुळे शरीरातून घाम जास्त प्रमाणात जात असल्यामुळे त्याची भरपाई घेण्याची काळजी घ्यायला हवी. साधे पाणी किंवा लिंबू सरबत, फळांचा रस, ताक, नारळपाणी असे एखादे पेय शरीराची पाण्याची गरज भागवू शकते.
* उन्हाचा त्रास होतो म्हणून आइस्क्रीमसारखे थंड पदार्थ खाण्याकडे किंवा सहज उपलब्ध असलेले बाटलीबंद थंड पेय पिण्याकडे बहुतेकांचा कल असतो. परंतु हे दोनही प्रकार धोकादायक आहे. एकतर अशा रीतीने शरीराचे सामान्य तापमान झपाटय़ाने कमी करण्याचा प्रयत्न प्रत्येकाच्या प्रकृतीला झेपतोच, असे नाही.
* त्यातून घशाचा संसर्ग, पोट बिघडणे अशा तक्रारी उद्भवतात. दुसरा धोका असतो तो खोकला किंवा सर्दी होण्याचा. त्याचा त्रास सौम्य असला, तरी अस्वस्थ करणारा असतो. त्यामुळे लगेच ‘कुछ ठंडा हो जाए’, म्हणण्यापूर्वी एकदा नीट विचार करा.
* रस्त्यावर विकल्या जाणाऱ्या आइस कॅण्डी, बर्फाचे गोळे यांच्यासाठी वापरला जाणारा बर्फ हा अशुद्ध
पाण्यातून बनवला असण्याची शक्यता असते. लिंबू सरबत आरोग्यासाठी चांगले असले तरी रस्त्याकडेला
मिळणाऱ्या सरबताने अनारोग्यालाच निमंत्रण
मिळण्याची  शक्यता अधिक.
* बर्फाच्या गोळ्यावर वापरले जाणारे रंग डोळ्यांना कितीही आकर्षक वाटत असले तरी पोटासाठी ते नक्कीच चांगले नाहीत.
* आजारांना आमंत्रण देणाऱ्या या वातावरणात अतिथंड पेय, तळलेले आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळलेले केव्हाही चांगले. ठरलेल्या वेळी जेवण, व्यायाम आणि पुरेशी झोप आवश्यक आहे.