पार्किन्सन म्हणजे कंपवाताला कृत्रिम स्वीटनरमुळे अटकाव होऊ शकतो, असे एका संशोधनात दिसून आले आहे. मेंदूमध्ये एका विशिष्ट प्रथिनाच्या साचण्यामुळे हा रोग होतो व नेमके हेच या स्वीटनरमुळे टाळले जाते. मॅन्निटॉल हे अल्कोहोल शर्करा बुरशी, जीवाणू व शैवालामुळे तयार होते. हे मॅन्निटॉल शर्करामुक्त कँडीचा प्रमुख घटक असतो. या स्वीटनरचा वापर वैद्यकीय कारणांसाठीही केला जातो.शरीरातील जादाचे द्रव बाहेर काढण्यासाठी त्याचा वापर केला जातो. शस्त्रक्रियेच्यावेळी रक्त व मेंदूत औषधांचा मार्ग खुला करण्यासाठीही त्याचा वापर केला जातो. तेल अवीव विद्यापीठाचा रैणवीय सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, सागोल स्कूल ऑफ न्यूरोसायन्स या दोन संस्थांच्या वैज्ञानिकांना असे दिसून आले की, मॅन्नीटॉल हे मेंदूत अल्फा सायन्युक्लीन या प्रथिनाच्या गाठी बनण्यापासून बचाव करते. या गाठींमुळेच कंपवात म्हणजे पार्किन्सन होत असतो. याचा अर्थ कृत्रिम स्वीटनरचा वापर हा कंपवात व मेंदूचा ऱ्हास करणाऱ्या आजारांवर होऊ शकेल. सायन्युक्लीन प्रथिनाच्या गाठी कशा तयार होतात याचा संशोधकांनी अभ्यास केला असता वैज्ञानिकांनी या गाठी रोखणारे संयुग शोधण्याचा प्रयत्न सुरू केला होता. त्यात त्यांना मॅन्निटॉलचा वापर केला असता फळमाशीत अल्फा सायन्युक्लीन तयार करणारा जनुक सोडण्यात आला, त्यामुळे त्यांच्या हालचालींवर विपरित परिणाम झाला. नंतर या फळमाश्यांच्या अन्नात मॅन्निटॉलचा समावेश केला असता ७० टक्के फळमाश्या या परीक्षानळीत वपर्यंत चालत आल्या. त्यानंतर वारंवार करण्यात आलेल्या प्रयोगातही हे सिद्ध झाले आहे असे सॅंडियागो विद्यापीठाचे डॉ. एलिझर मॅसलिह यांनी सांगितले. उंदरांमध्येही मॅनिटॉल दिले असता त्यांच्या मेंदूत अल्फा सायन्युक्लीनचे प्रमाण खूप कमी झाले. फक्त मॅन्निटॉलच्या सुरक्षिततेसंबंधी अजून संशोधन होणे गरजेचे आहे.

कर्करोगाच्या मुकाबल्यासाठी गणिताचा वापर
गणितीय प्रारूपांच्या मदतीने कर्करोगास नियंत्रित करणारे जनुकसंस्कारित विषाणू तयार करणे, तसेच निरोगी पेशींना टाळून कर्करोग झालेल्या पेशी मारणे, या दोन्ही गोष्टी साध्य होतात असे नवीन संशोधनात दिसून आले आहे. या तंत्रात काही जनुकीय बदलांमुळे ऑनकोलायटिक विषाणू हे कर्करोगयुक्त पेशींचा नैसर्गिक बचाव मोडून काढू शकतात. ऑनकोलायटिक विषाणू हे कर्करोगयुक्त पेशींवर मारा करू शकतात, असे ओटावा हॉस्पिटल रीसर्च इन्स्टिटय़ूटचे डॉ. बेल यांनी सांगितले. ते म्हणाले की, कर्करोग हा फार गुंतागुंतीचा असतो व त्यातील काही प्रकारच्या कर्करोगात जनुकसंस्कारित विषाणू हवा तो परिणाम साध्य करू शकतात पण त्यासाठी ते विषाणूही सुरक्षित करावे लागतात. या शिवाय ते निरोगी पेशींवर परिणाम करीत नाहीत, तरीही कर्करोगयुक्त पेशींचा नाश करतात. गणिती प्रारूपाच्या मदतीने वैज्ञानिकांनी हे जनुक संस्कारित विषाणू कसे काम करतात हे स्पष्ट केले आहे. गणिती आकडेमोडीच्या मदतीने आपण यातील प्रायोगिक यश किती असेल हे सांगू शकतो. कर्करोगाशी लढण्यासाठी आणखी गणिती प्रारूपे यातून तयार करता येऊ शकतात. नेचर कम्युनिकेशन या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

मधुमेहावर वर्षांला एक इंजेक्शन
वैज्ञानिकांनी मूलपेशींबाबत केलेल्या संशोधनातून मधुमेहावर वर्षांतून एकदाच घ्यावे लागणारे इन्शुलिनचे इंजेक्शन तयार करता येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या मधुमेहावर रोजच वेदनादायी इंजेक्शन घ्यावी लागतात. नवीन तंत्रात रक्ताच्या मूलपेशींना सुनियंत्रित करून त्यांचे रूपांतर इन्शुलिन स्त्रवणाऱ्या पेशींमध्ये करता येऊ शकते. लंडनच्या इम्पिरियल कॉलेजचे प्रा. नाग्यी हबीब यांच्या नेतृत्वाखाली हॅमरस्मिथ हॉस्पिटलमधील वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनात हे तंत्र प्रायोगिक तत्त्वावर यशस्वी झाले आहे. याच पथकातील वैज्ञानिक डॉ. पॉल मिंटझ यांनी सांगितले की, या संशोधनामुळे रोज इंजेक्शन घेण्याची कटकट वाचू शकते. रूग्णाच्याच मूलपेशींमध्ये काही बदल करून त्यांचे रूपांतर इन्शुलिन स्त्रवणाऱ्या पेशींमध्ये केले जात असल्याने यात बाहेरच्या पेशी वापराव्या लागत नाहीत, त्यामुळे त्या शरीराकडून नाकारल्या जाण्याची शक्यता नसते. प्रयोगशाळेत वैज्ञानिकांना ३५ टक्के सुनियंत्रित पेशी तयार करण्यात यश आले असून त्यातून इन्शुलिन स्त्रवत होते. अशा प्रकारे इन्शुलिन स्त्रावाच्या रूपात बाहेर टाकणाऱ्या १०० टक्के पेशींचा समूह तयार करण्याचा वैज्ञानिकांचा इरादा आहे. वर्षभर इन्शुलिन सोडत राहतील अशा पेशी तयार करण्याचाही त्यांचा विचार असून मूलपेशींना जैवविघटनशील जालिकेचे आवरण देऊन हा परिणाम त्यांनी साध्य केला आहे. ‘जर्नल ऑफ मॉलेक्युलर थेरपी न्युक्लिइक अ‍ॅसिड’ या नियतकालिकात हा शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे.