आपल्या कृष्णलीलांनी घर हसत-खेळत ठेवणारा केळकरांचा योगेश २००२ मध्ये अचानक वयाच्या तिसऱ्या वर्षी असह्य़ पोटदुखी, अशक्तपणा व औषधांनाही दाद न देणारा तीव्रवेगी ताप या दुखण्यांनी आठवडाभर त्रस्त झाला. सोनोग्राफी, लिव्हर बायॉप्सी केली असता हिपॅटोब्लास्टोमा म्हणजे यकृतात अर्बुद आढळला. आजाराचे मूळ कारण शोधण्यासाठी डॉक्टरांनी बोन मॅरो अ‍ॅस्पिरेशन व बोन मॅरो बायॉप्सी केली असता ८०% ब्लास्ट सेल म्हणजे कॅन्सरच्या विकृत रक्तपेशी असलेला अ‍ॅक्युट िलफोसायटिक ल्युकेमिया असल्याचे निदान झाले. केळकर कुटुंबाने मोठय़ा धीराने योगेशची दोन वष्रे केमोथेरॅपी व  रेडियोथेरॅपी चिकित्सा पूर्ण केली खरी, मात्र लगेचच २००५ मध्ये कॅन्सरने डोके वर काढले व त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. पुन्हा दोन वर्षे गेल्या वेळेपेक्षा प्रभावी केमोथेरॅपीच्या त्रासदायक चक्रातून गेल्यावर मात्र लगेचच त्यांनी कॅन्सरच्या प्रतिबंधासाठी आमच्या प्रकल्पात आयुर्वेदिक चिकित्सा सुरू केली. दोन वेळा घेतलेली केमोथेरॅपी व ल्युकेमियाचा आजार यामुळे व्याधिप्रतिकारशक्ती अतिशय दुर्बळ झाल्याने योगेशला वरचेवर सर्दी-खोकला, ताप, मानेवर गाठी येत होत्या. नियमित आयुर्वेदिक औषधोपचार व नियंत्रित पथ्यकर आहार-विहार यांच्या जोरावर सशक्त योगेश आता दहावीचा अभ्यास कंबर कसून करीत आहे.
ल्युकेमिया म्हणजे रक्ताचा कॅन्सर हा रक्तवह स्रोतसाचा आजार असून यात मुख्यत: अस्थिमज्जा म्हणजे बोन मॅरो व रक्त यांच्यात प्रथम कॅन्सरच्या विकृत पेशींची निर्मिती होते व नंतर या पेशी यकृत, प्लीहा, लसिका ग्रंथी, मस्तिष्क, वृषण या अवयवांत पसरतात. ल्युकेमियाचे कोणत्या प्रकारच्या रक्तपेशी कॅन्सरग्रस्त पेशींत परिवíतत होतात, त्या किती वेगाने वाढतात, यानुसार अ‍ॅक्युट िलफोसायटिक ल्युकेमिया (ए.एल.एल.), अ‍ॅक्युट मायलॉइड ल्युकेमिया (ए.एल.एम.), क्रॉनिक िलफोसायटिक ल्युकेमिया (सी.एल.एल.) व क्रॉनिक मायलॉइड ल्युकेमिया (सी.एम.एल.) हे प्रमुख प्रकार आढळतात.
बोन मॅरो म्हणजे अस्थिमज्जा हा अस्थींमधील आतील मृदू भाग असून त्यात प्रामुख्याने स्टेम सेल्स व परिपक्व अशा रक्त निर्माण करणाऱ्या पेशी असतात. प्राकृतावस्थेत या पेशी अनेक अवस्थांतून परिवíतत होऊन पूर्णत: विकसित अशा पांढऱ्या रक्तपेशी, लाल रक्तपेशी व प्लेटलेटस्ची निर्मिती करतात. याच परिवर्तनाच्या प्रक्रियेत विकृती आल्यास कॅन्सरग्रस्त रक्तपेशी निर्माण होतात व ल्युकेमिया निर्माण होतो. पांढऱ्या रक्तपेशींमधील िलफोसाइटस् कॅन्सरग्रस्त झाल्यास िलफोसायटिक ल्युकेमिया व्यक्त होतो व िलफोसाइटस् सोडून अन्य पांढऱ्या पेशी, लाल रक्तपेशी व प्लेटलेटस् कॅन्सरग्रस्त झाल्यास मायलॉइड ल्युकेमिया निर्माण होतो. अस्थिमज्जेत रक्तपेशी मोठय़ा प्रमाणात योग्य प्रकारे परिपक्व झाल्या नाहीत तर अपरिपक्व ल्युकेमियाग्रस्त पेशींचे पुनर्जनन होतच राहाते व अ‍ॅक्युट म्हणजे जलदगतीने पसरणारा ल्युकेमिया निर्माण होतो. याउलट जेव्हा अस्थिमज्जेत रक्तपेशी काही प्रमाणात परिपक्व होतात व बहुतांशी प्राकृत रक्तपेशींप्रमाणेच दिसतात, तेव्हा क्रॉनिक म्हणजे कूर्मगतीने फैलावणारा ल्युकेमिया होतो. मात्र या रक्तपेशी प्राकृत रक्तपेशींची काय्रे करीत नाहीत व त्यामुळे ल्युकेमियाची लक्षणे व्यक्त होतात.
अ‍ॅक्युट िलफोसायटिक ल्युकेमियाचे प्रमाण ५ वर्षांखालील बालकांत व ५० वर्षांनंतर अधिक असून मृत्यूचे प्रमाण मात्र बालकांत कमी असते. आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार अ‍ॅटॉमिक बॉम्बसारख्या रेडिएशनशी व बेंझिनसारख्या केमिकल्सशी दीर्घकाळ संपर्क, डाऊन सिंड्रोम क्लायनेफेल्टर सिंड्रोम, न्यूरोफायब्रोमेटॉसिससारख्या जन्मजात क्रोमोझोमल विकृती, फिलाडेल्फिया क्रोमोझोमसारख्या जन्मोत्तर क्रोमोझोमल विकृती असलेल्या व्यक्तींत ए.एल.एल. होण्याची संभावना अधिक असते.
ताप येणे, वजन कमी होणे, रात्री अधिक घाम येणे, भूक मंदावणे, चक्कर येणे, दम लागणे, अशक्तपणा, नाक व हिरडय़ांतून रक्तप्रवृत्ती, वारंवार जंतुसंसर्ग होणे ही ए.एल.एल.ची सामान्य लक्षणे असून लसिकाग्रंथीत पसरल्यास मान, काख, जांघ येथील लसिकाग्रंथींचा आकार वाढणे; यकृत प्लीहेत पसरल्यास पोटाचा आकार वाढणे, मस्तिष्क व मज्जारज्जूत परसल्यास चक्कर येणे, डोके दुखणे, फिटस् येणे अशी लक्षणे दिसतात. रक्ततपासणी, बोन मॅरो अ‍ॅस्पिरेशन व बायॉप्सी, प्लोसायटोमेट्री, सायटोजिनेटिक्स, फिश टेस्ट, पी.सी.आर., िलफ नोड बायॉप्सी, मस्तिष्कजलाचे परीक्षण या तपासण्यांच्या साहाय्याने  ए.एल.एल.चे निदान निश्चित होते. आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार ल्युकेमियामध्ये प्रामुख्याने  मुखावाटे व शिरेवाटे केमोथेरॅपी, टारगेटेड थेरॅपी, रेडियोथेरॅपी व स्टेम सेल ट्रान्सप्लान्ट या चिकित्सापद्धतींचा अवलंब केला जातो.
आयुर्वेदाने ‘रक्तं जीव इति स्थिति।’ म्हणजे रक्तधातूस जीव- प्राण म्हटले आहे, तर सुश्रुताचार्यानी शरीरधारणेतील रक्ताचे अनन्यसाधारण महत्त्व जाणून रक्ताला वात- पित्त- कफ या तीन दोषांच्या जोडीला चौथा दोष मानले आहे. ए.एल.एल.ची निर्मिती, स्वरूप, कारणे, लक्षणे व चिकित्सा यांचा साकल्याने विचार करता आयुर्वेदोक्त रक्तप्रदोषज विकार, रक्तधातुगत ज्वर, पांडू, रक्तपित्त, रक्तज कृमी व रक्तधात्वंग्नि दुष्टी व रक्त धातुपाकावस्था या व्याधी व अवस्थांशी ए.एल.एल.चे साधम्र्य आढळते. रक्तधातू व पित्तदोष यांच्या गुण-कर्मात बरेचसे साम्य असल्याने पित्तदोषाला दूषित करणारा आंबट- खारट- तिखट चवीचा, उष्ण- तीक्ष्ण- विदाही (जळजळ निर्माण करणारा) गुणाचा आहार; दही- शिळे पदार्थ- विरुद्धान्न- आंबवलेले पदार्थ असा रक्ताची दुष्टी करणारा आहार अधिक प्रमाणात व वारंवार सेवन करणे ल्युकेमियास कारणीभूत ठरतात असे आढळले आहे. ज्या कारणांनी व्याधी निर्माण झाली आहे ती कारणे कटाक्षाने टाळणे हे चिकित्सेचे पहिले सूत्र असल्याने ल्युकेमियाच्या रुग्णांनी या सर्व गोष्टी टाळणे अनिवार्य आहे.
रक्तदुष्टीमुळे निर्माण होणाऱ्या आजारांची परिपूर्ण चिकित्सा चरकाचार्यानी केवळ दोन ओळींत उद्धृत केली आहे. ती म्हणजे,
‘‘कुर्यात् शोणितरोगेषु रक्तपित्तहरीं क्रियाम्।
विरेकं उपवासं च स्रावणं शोणितस्य च।।’’
लंघन, रक्तपित्त व्याधी नाशक चिकित्सा व पंचकर्मापकी विरेचन व रक्तमोक्षण हे उपक्रम रक्तप्रदोषज विकारांत उपयुक्त ठरतात.
ल्युकेमियाच्या अन्य प्रकारांची माहिती सांगणाऱ्या पुढील लेखांमध्ये आपण सखोलपणे ल्युकेमियाची औषधे, आहार-विहार व मानसचिकित्सेचा विचार करू.

Dr Dharmesh Patel California accident
स्वतःच्या कुटुंबालाच मृत्यूच्या दरीत ढकल्यानंतर भारतीय व्यक्तीला अटक, सुनावणी सुरू असताना समोर आली धक्कादायक माहिती
Gajlaxmi Rajyog
येत्या ७ दिवसांनी ‘या’ राशींचे येणार चांगले दिवस? ‘शुभ योग’ बनल्याने लक्ष्मी कृपेने बँक बँलेन्समध्ये झपाट्याने होऊ शकते वाढ
A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
Viral wedding photoshoot of bride working out in a park in Traditional wedding lehenga netizen say her Tiger Shroff female version
“लेडी टायगर श्रॉफ!”, चक्क लग्नाच्या लेहेंग्यात नवरी करतेय व्यायाम, हटके फोटोशूट पाहून चक्रावले नेटकरी; Video एकदा बघाच