साधं, सरळ, विनासंकट असं आयुष्य सगळ्यांच्याच वाटय़ाला येत नसतं. अनेकांना असंख्य संकटांचा सामना करावा लागतो, खाचखळग्यांमधून वाटचाल करावी लागते. त्यातल्या काहींना जिवाभावाच्या व्यक्तींची साथ मिळते. तर, अनेकांना तीही नसते. अशा गरजूंना मदतीचा हात देण्यासाठी तत्पर असतात केंद्र आणि राज्य सरकारची काही खाती, स्वयंसेवी संस्था – संघटना, खासगी संस्था – संघटना. त्यांच्यातर्फे हेल्पलाइन चालावल्या जातात. या हेल्पलाइनशी दूरध्वनीवरून संपर्क साधल्यास गरजूंना तातडीची मदत मिळू शकते.
वयस्क, आजारी व्यक्तींना तसंच बाहेरच्या जगाची फारशी माहिती नसणाऱ्यांनाही या हेल्पलाइनद्वारे मदत मिळू शकते. मुलं परगावी किंवा परदेशात असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना तर या हेल्पलाइन वरदानच ठरत आहेत. प्रचंड ताणतणावांमुळे मनाचा तोल ढळू लागलेल्यांना या हेल्पलाइन तोल सावरायला मदत करतात. अगदी आत्महत्या करण्याच्या निर्णयापासून परावृत्त करणाऱ्याही हेल्पलाइन आहेत. विविध आजार-विकारांनी ग्रस्त असलेल्यांसाठीही काही हेल्पलाइन आहेत. अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमधल्या हेल्पलाइनची माहिती आम्ही या सदरातून करून देणार आहोत. आयुष्यातल्या कठीण प्रसंगांमधून बाहेर पडण्यासाठी या हेल्पलाइन निश्चितच मदत करतील, मार्गदर्शन करतील, याची आम्हाला खात्री आहे.
त्यातील बहुतांश हेल्पलाइन २४ तास विनाशुल्क उपलब्ध आहेत. परिस्थिती आणि गरज जशी असेल तशी मदत मिळू शकते. समाजव्यवस्था बदलत असल्याने या हेल्पलाइन काळाची गरज बनत आहेत.

शुभांगी पुणतांबेकर
puntambekar.shubhangi@gmail.com