दिल्ली डेअर डेव्हिल्स आणि हैदराबाद सनरायझर्स या दोन संघांचा सामना आज दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानात रंगला. या सामन्यात दिल्ली डेअर डेव्हिल्सकडून खेळताना ऋषभ पंतला खूप चांगला सूर गवसला. ऋषभ पंतने ६३ चेंडूंमध्ये १५ चौकार आणि ७ षटकारांची खेळी करत १२८ धावा केल्या. पृथ्वी शॉ ९ धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर जॅसन रॉयही ११ धावांवर बाद झाला, श्रेयस अय्यर ३ धावांवर रनआऊट झाला, हर्षल पटेलही रन आऊट झाला, ग्लेन मॅक्सवेलही झेलबाद झाला. मात्र या सगळ्यांमध्ये दिल्लीच्या संघाची ताकद बनून खंबीरपणे उभा राहिला तो ऋषभ पंत.

ऋषभ पंतची खेळी हा दिल्लीची इनिंग पाहणाऱ्यांसाठी शब्दशः सोहळा होता. ऋषभ पंतने केलेल्या नाबाद १२८ धावांच्या खेळीवरच दिल्लीचा संघ २० षटकांमध्ये १८७ धावांपर्यंत मजल मारू शकला. शेवटच्या षटकात तर ऋषभ पंतने २ चौकार आणि २ षटकार मारत २० धावा काढल्या. त्याच्या या धडाकेबाज खेळीचे महत्त्व निश्चितच दिल्लीला मोठी धावसंख्या उभारण्यासाठी हातभार लावणारे आहे यात शंका नाही. हर्षल पटेलने २४ धावा करत ऋषभला साथ देण्याचा प्रयत्न केला. मात्र तोही बाद झाला. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलही आला मात्र तोही ८ चेंडूंमध्ये ९ धावा करत बाद झाला. संघाची घसरगुंडी होत असताना हैदराबादच्या गोलंदाजांची ऋषभ पंतने पिसे काढली आणि दिल्लीला मोठ्या धावसंख्येपर्यंत मजल मारून दिली.