पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागणाऱ्या सनराईजर्स हैदराबाद संघाला एक मोठा धक्का बसला. गोलंदाजीदरम्यान दुखापत झालेला अष्टपैलू मिचेल मार्श संपूर्ण हंगामाला मुकण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यानंतर आता हैदराबाद संघाने अधिकृतरित्या ट्विटरवरून त्याला माघार घ्यावी लागणार असल्याची बातमी दिली. “मिचेल मार्श पायाच्या दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेला मुकणार आहे. तो लवकरात लवकर तंदुरूस्त होवो हीच प्रार्थना. वेस्ट इंडिजचा जेसन होल्डर याला मार्शच्या जागी बदल खेळाडू म्हणून ताफ्यात दाखल करून घेण्यात आले आहे”, असे ट्विट सनरायझर्सकडून करण्यात आले.

RCB विरुद्ध पहिल्याच सामन्यात कर्णधार डेव्हिड वॉर्नरने मार्शला गोलंदाजीची संधी दिली. सामन्यातलं पाचवं षटक टाकत असताना त्याच्या घोट्याला दुखापत झाली. यानंतर त्याने फिजीओच्या मदतीने उपचार घेत गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला, पण त्याला गोलंदाजी करता आली नाही त्यामुळे अपयश आलं. अखेरीस विजय शंकरने मार्शचं उरलेलं षटक पूर्ण केलं. फलंदाजीदरम्यानही मार्श खेळण्यास तितकासा सक्षम नव्हता. पण संघाला असलेली गरज पाहता तो दहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात आला. पण त्याला धावण्यास अजिबातच जमत नसल्याने त्याने पहिल्याच चेंडूवर हवाई फटका खेळला आणि त्यात तो झेलबाद झाला.

मिचेल मार्श

मार्शला झालेली दुखापत ही अत्यंत गंभीर स्वरुपाची असल्याचं बोललं जातं आहे. “मार्शला झालेली दुखापत ही गंभीर वाटत आहे. तो यापुढील सामन्यांमध्ये खेळू शकेल याची खात्री वाटत नाही”, अशी माहिती सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी हैदराबाद संघातील एका सूत्राने पीटीआयला दिली होती. त्यानंतर आज अखेर हैदराबाद संघाने घोषणा केली. मिचेल मार्श स्पर्धेला मुकणार असल्याने हैदराबाद संघासाठी तो मोठा धक्का मानला जात आहे. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया-इंग्लंड मालिकेत त्याने दमदार कामगिरी केली होती. हैदराबाद संघात मार्शच्या जागेवर आता डॅनिअल ख्रिश्चन, मोहम्मद नबी किंवा जेसन होल्डर या तीनपैकी एकाला संघात स्थान दिलं जाऊ शकतं.