आफ्रिकन सफारी हा शब्द अनेकांना परिचयाचा आहे. आफ्रिकेतील जंगलांमध्ये सफारी करण्याची एक वेगळीच गंमत असते. पण सध्या आफ्रिकेचा एक खेळाडू भारतात रिक्षाच्या सफारीचा आनंद लुटताना पाहायला मिळाला आहे. आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज एबी डिव्हिलियर्स हा त्याच्या पत्नीला आणि मुलाला घेऊन बंगळुरूच्या रस्त्यांवर चक्क रिक्षातून फिरताना दिसला आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूंचे भारताबद्दलचे प्रेम ही काही नवीन गोष्ट नाही. आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू आणि एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून नाव कमावलेल्या जॉन्टी ऱ्होड्सने तर आपल्या मुलीचे नाव इंडिया या नावावरून ठेवले आहे. मात्र एबी डिव्हिलियर्सने तर सरळ भारतातील रस्त्यांवर रिक्षातून फिरण्याचा आनंद घेतला आहे. या वेळी डिव्हिलियर्सची पत्नी आणि मुलगाही त्याच्यासोबत होते. बंगळुरूच्या चिन्नस्वामी स्टेडियमवर कोलकाता संघाशी रविवारी बंगळुरू संघाचा सामना खेळण्यात येणार होता. त्याआधी डिव्हिलियर्सने रिक्षातून फिरण्याचा आनंद लुटला. आपल्या आवडत्या खेळाडूला रिक्षात पाहून आजुबाजूने जाणाऱ्या दुकाचीस्वारांनी त्याच्याबरोबर चालत्या रिक्षाच्या बाजूनेच सेल्फी, व्हिडिओ काढले आणि ‘ए साला कप नामदे’ अशा घोषणा दिल्या. ‘ए साला कप नामदे’ (या वर्षी कप आमचाच)ही बंगळुरू संघाची या आयपीएल हंगामासाठीची टॅगलाईन आहे.

एबी डीव्हीलियर्स हा सध्या चांगल्या लयीत आहे. एक स्फोटक फलंदाज म्हणून नावलौकिक असलेला डीव्हीलियर्स यंदाच्या हंगामातही २८० धावांसह सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसरा आहे. त्याने आतापर्यंत ६ सामन्यांत ३ अर्धशतके ठोकली आहेत.