सनरायझर्स हैदराबाद संघाने इंडियन प्रीमिअर लीगमध्ये कमी धावसंख्या असूनही प्रतिस्पर्धी संघाला पराभूत करण्याची मालिका कायम राखली. सोमवारी हैदराबादने बंगळुरुचा पराभव केला. हैदराबादच्या या विजयात भुवनेश्वर कुमारने टाकलेले शेवटचे षटक महत्त्वाचे टाकले. या षटकानेच बंगळुरुचा घात केला आणि पाच धावांनी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु हा सामना सोमवारी पार पडला. आयपीएलच्या या हंगामात हैदराबादच्या गोलंदाजांनी प्रभावी मारा करत प्रतिस्पर्धी संघांना कमी धावसंख्येवर रोखण्यात यश मिळवले. सोमवारी देखील त्याची पुनरावृत्ती झाली. बंगळुरु संघासमोर १४७ धावांचे लक्ष्य होते.

धावांचा पाठलाग करताना बेंगळूरुची सुरुवात समाधानकारक झाली नाही. पार्थिव पटेल (२०) शकिब अल हसनच्या गोलंदाजीवर पायचीत होऊन माघारी परतला. संदीप शर्माने टाकलेल्या चेंडूवर मनन वोहरा विचित्र पद्धतीने त्रिफळाचीत झाला. कर्णधार विराट कोहलीचा अवघड झेल टिपण्यात विल्यम्सनला आलेले अपयश बेंगळूरुच्या पथ्यावर पडेल असे वाटत होते. मात्र, शकिबने कोहलीचा अडथळा दूर केला. कोहलीने ३० चेंडूंत ५ चौकार व १ षटकार लगावत ३९ धावा केल्या. एबी डी’व्हिलियर्स आणि मोईन अली यांनाही प्रभावी फलंदाजी करण्यात अपयश आले. हैदराबादच्या गोलंदाजांच्या वैविध्यपूर्ण गोलंदाजीचे कौतुक करावे तितके कमीच होते. सिद्धार्थ कौल, संदीप शर्मा, भुवनेश्वर कुमार यांनी गोलंदाजीत प्रयोग करताना बंगळूरुच्या फलंदाजांना मोठे फटके मारण्यापासून रोखून धरले. मात्र, रशिद खानच्या एका षटकात कॉलिन डी ग्रँडहोमने जोरदार फटकेबाजी करून बंगळूरुच्या विजयाच्या आशा पल्लवीत केल्या होत्या. पण, भुवनेश्वरच्या अखेरच्या षटकाने सर्व चित्र बदलले.

शेवटच्या षटकांत बंगळुरुला सहा चेंडूंमध्ये १२ धावांची आवश्यकता होती. पहिला चेंडू भुवीने १४१ किमी प्रति तास या वेगाने यॉर्कर टाकला. या चेंडूवर ग्रँडहोमला फक्त एक रन काढता आला. मनदीपलाही भुवीने १४१. ५ किमी प्रति तास या वेगाने यॉर्करचा टाकला. या चेंडूवर मनदीपने दोन धावा काढल्या. तिसरा चेंडू भूवीने १२७. ५ किमी प्रति तास या वेगाने टाकला आणि या चेंडूवर मनदीपला फक्त एकेरी धावच काढता आली.

आता तीन चेंडूमध्ये आठ धावांची आवश्यकता होती. स्ट्रायकर एंडला बऱ्यापैकी स्थिरावलेला आणि फटकेबाजी करुन बंगळुरुच्या आशा पल्लवित करणारा ग्रँडहोम होता. मात्र, भुवनेश्वरने पुन्हा एकदा यॉर्कर टाकून ग्रँडहोमला फटकेबाजीची संधीच दिली नाही. या चेंडूवरही त्याला फक्त एकच धाव काढता आली.

दोन चेंडूवर सात धावांची आवश्यकता होती. चेंडू मनदीपच्या पायाला लागला. पण त्याने या चेंडूवर एक रन काढला. शेवटच्या चेंडूवर सहा धावांची आवश्यकता होती आणि फलंदाजीसाठी भुवीसमोर ग्रँडहोम होता. ग्रॅँडहोम फटकेबाजीसाठी ओळखला जातो. पण भुवीने पुन्हा एकदा त्याची क्षमता सिद्ध केली आणि ग्रँडहोमला चकवा देत त्याचा त्रिफळा उडवला. भुवीने या सामन्यात चार षटकांत २७ धावांच्या मोबदल्यात एक विकेट घेत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.