कावेरी पाणीवाटपाच्या मुद्द्यावरुन आयपीएल सामन्यांना होणारा विरोध लक्षात घेता, आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने चेन्नईत होणारे सामने पुण्याला हलवण्याचा निर्णय घेतला. दोन वर्षांची बंदीची शिक्षा भोगून आयपीएलमध्ये पुनरागमन करणाऱ्या चेन्नईच्या संघासाठी व चाहत्यांसाठी हा मोठा धक्का होता. मात्र चेन्नई सुपरकिंग्जच्या संघ व्यवस्थापनाने आपल्या चाहत्यांची निराशा दूर केलेली आहे. पुण्यात शुक्रवारी होणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना पाहण्यासाठी खास व्हिजलपोडू एक्स्प्रेस सोडण्यात आलेली आहे.

चेपॉकच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यामध्ये तामिळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली, तर बदली खेळाडू फाफ डु प्लेसिसच्या दिशेने एका कार्यकर्त्याने बूटही भिरकावला. यानंतर तामिळनाडू पोलिसांनी आयपीएलच्या सामन्यांना संरक्षण देण्यात आपली असहमतता दर्शवली. त्यामुळे गव्हर्निंग काउन्सिलला चेन्नईतून सामने हलवण्याचा निर्णय घ्यावा लागला. तब्ब्ल १००० चाहते या एक्स्प्रेसमधून पुण्याच्या दिशेने रवाना झाले आहेत.

या व्हिजलपोडू एक्स्प्रेसची काही क्षणचित्र चाहत्यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केली आहेत.