खरंतर ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटचा तो ‘बादशाह’. मैदानाच्या कुठल्याही कोपऱ्यात अगदी लीलया चेंडू पोहोचवण्याची त्याची क्षमता. चौकार-षटकार तर जणू त्याचे गुलामचं पण वयपरत्वे त्याची जादू थोडी ओसरली म्हणून फ्रेंचायजींनी त्याच्याकडे पूर्णच पाठ फिरवली. आयपीएलचा ११ वा मोसम सुरु होण्याआधी त्याच्या नावाची साधी चर्चा सुद्धा नव्हती. प्रत्यक्ष लिलाव सुरु झाला त्यावेळी त्याच नाव वारंवार पुकारल गेलं त्यावेळी कुठल्याही संघ मालकाने त्याच्यावर बोली लावायला हात उंचावला नाही.

लिलावाच्या अगदी शेवटच्या सत्रात किंग्ज इलेव्हन पंजाबच्या खात्यात फक्त दोन कोटी रुपये शिल्लक उरले होते. उरलेल्या पैशांचं काय करायचं म्हणून त्यांनी ख्रिस गेल नावाच्या वादळावर एक शेवटचा चान्स घेतला आणि त्यानंतर आज जे काही सुरु आहे ते पाहिल्यानंतर आरसीबी, केकेआरचे संघ मालक स्वत:च्या कपाळावर हात मारुन घेत असतील. गेल आता संपला, तो काही खास करु शकणार नाही असं ज्यांना वाटत होतं त्यांनी आता नक्कीच गेलचा धसका घेतला असेल. मोठया खेळाडूचा अहंकार दुखावल्यावर तो काय करु शकतो याच गेल उत्तम उदहाणर आहे.

यंदाच्या मोसमात आतापर्यंत चार सामने खेळणाऱ्या गेलने १५१ च्या सरासरीन २५२ धावा केल्या असून यात एका शतकाचा समावेश आहे. कुणाच्या गावीही नसलेला गेल पुन्हा एकदा हॉट प्रॉपर्टी ठरला आहे. याच गेलने आरसीबीकडून सात सीझन खेळताना ३१६३ धावा केल्या होत्या. त्याच्या या सध्याच्या परफॉर्मन्सबद्दल टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना गेल म्हणाला कि, मी कोणाला चुकीचे सिद्ध केले आहे किंवा नाही हे मला माहित नाही. माझे आकडेच सर्व काही सांगून जातात. त्यामुळे मला कोणालाच काही सिद्ध करायचे नव्हते. लिलावाच्या शेवटच्या टप्प्यात माझी निवड झाली त्याची मला अजिबात चिंता वाटत नाही. इथेच शेवट झाला असता तरी त्यापुढे आयुष्य आहे.

क्रिकेटच्या पलीकडे आयुष्य आहे. एका टप्प्यावर तुम्हाला आयपीएल आणि अन्य क्रिकेटमधून बाहेर पडावे लागणार आहे. त्यामुळे मला त्याची चिंता नाही. मी नेहमीच वर्तमानात जगतो. मला कोणीतरी निवडले. नव्या संघासाठी खेळताना मी आनंदी आहे. मी पहिल्या तीन सामन्यात जो खेळ केला त्याचा मला आनंद आहे. कुठल्याही संघाने माझ्यावर बोली लावली नाही त्याचे मला सुद्धा आश्चर्य वाटते. बंद दाराआड काय झाले मला माहिती नाही. पण जे घडले ते सर्व असेच आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबचे प्रतिनिधीत्व करणे मोठी संधी आहे. मी किंग आहे त्यामुळे किंग्ज इलेव्हन पंजाबसाठी खेळणे विधिलिखत होते असे गेलने म्हटले आहे.