आयपीएलच्या ११ व्या हंगामात दिल्लीच्या संघाचा खेळ पाहता संघाच्या वाट्याला आलेल्या अपयशाची जबाबदारी घेत कर्णधार गौतम गंभीरने या पदाचा राजीनामा दिला. सहापैकी पाचही सामन्यांमध्ये पराभवाला तोंड देणाऱ्या दिल्ली संघाच्या नेतृत्वाची धुरा आता श्रेयस अय्यरच्या खांद्यावर आहे. दरम्यान, गंभीरने त्याला कर्णधार पदासाठी मिळणाऱ्या २. ८ कोटी रुपयांचं मानधन नाकारण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आयपीएलच्या इतिहासात एखाद्या कर्णधाराने संघाच्या अपयशाची जबाबदारी घेत स्वत:चं मानधन नाकारण्याची ही पहिलीच वेळ आहे.

गुणतालिकेमध्ये दिल्लीच्या संघाची असणारी दयनीय अवस्था पाहता गौतमने हा महत्त्वाचा निर्णय घेतला. काही दिवसांपूर्वीच एका पत्रकार परिषदेतून तो कर्णधार पदाचा राजीनामा देत असल्याविषयी सर्वांना माहिती देण्यात आली. खुद्द गौतमनेही त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन आपण कर्णधार पदाचा राजीनामा दिल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. हा सर्वस्वी आपला निर्णय असून व्यवस्थापकीय मंडळ किंवा प्रशिक्षकांनी आपल्यावर कोणताच दबाव टाकलेला नाही हे त्याने स्पष्ट केलं. येत्या काळात संघाच्या कर्णधारपदाची धुरा आपल्या खांद्यावर नसली तरीही संघाला आपला पाठिंबा नेहमीच असेल. कारण एकट्या खेळाडूपेक्षा संघ नेहमीच महत्त्वाचा असतो, असं त्याने या ट्विटमधून स्पष्ट केलं.

संघाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गंभीरने यंदाच्या आयपीएलच्या हंगामासाठी संघाकडून कोणतंच मानधन न घेण्याचा निर्णय घेतला असून, उर्वरित सर्व सामनेही तो मानधन न आकारताच खेळणार आहे. त्याचा हा निर्णय अनेकांच्याच भुवया उंचावून गेला. एकिकडे क्रिकेटवर होणारी अमाप पैशांची उधळण आणि दुसरीकडे गंभीरचा हा निर्णय पाहता क्रीडा रसिकांनी त्याच्या या वृत्तीची प्रशंसा केली आहे. दिल्ली संघाच्या चाहत्यांनीसुद्धा गौतमचा हा निर्णय प्रशंसनीय असल्याचं म्हटलं. एका खेळाडूप्रती चाहत्यांचं हे प्रेम पाहता गंभीरला ही गोष्ट प्रोत्साहित करेल हे नक्की.

वाचा : कास्टिंग काऊचच्या मुद्द्याला राईचं पर्वत केलं जातंय- रिचा चड्ढा