गुणतालिकेतील चौथ्या स्थानासाठीची स्पर्धा अगदी शिगेला पोहोचली असतानाच त्या स्थानाच्या दावेदारीवर हक्क सांगण्यासाठी मंगळवारी कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्सचे संघ आपापसात भिडणार आहेत.

या सामन्यातील पराभव हा दोन्ही संघांना चौथ्या स्थानाच्या दावेदारीतून बाद करू शकतो, त्याची दोन्ही संघांना पूर्ण कल्पना आहे. दोन्ही संघांना विजयाची लय साधणे अगदी अखेरच्या टप्प्यात शक्य झाले आहे. लागोपाठच्या पराभवानंतर कोलकाताचा संघ पुन्हा एकदा विजयी मार्गावर परतला आहे. मागील सामन्यात तर कोलकात्याने यंदाच्या मोसमातील सर्वाधिक असा २४५ धावांचा टप्पा गाठत प्रतिस्पर्धी किंग्ज इलेव्हन पंजाबला ३१ धावांनी पराभूत केले. तर दुसरीकडे स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या टप्प्यावर पोहोचलेल्या राजस्थानच्या संघाने लागोपाठ तीन विजय मिळवत चौथ्या स्थानासाठीची दावेदारी कायम राखली आहे. मागील सामन्यात राजस्थानकडून बटलरने नाबाद तुफानी ९४ धावांची खेळी करीत मुंबईला पराभूत केले होते. त्याने गत पाच सामन्यांमध्ये ६७,५१,८२,९५ आणि ९४ अशा पाच अर्धशतकी खेळी करीत संघाला फलंदाजीत तारले. राजस्थानचा कर्णधार अजिंक्य रहाणे निदान या अखेरच्या सामन्यात फलंदाजीतील चमक दाखविण्यासाठी उत्सुक असेल.

दुसरीकडे कोलकाताच्या फलंदाजांपैकी कर्णधार दिनेश कार्तिक, सुनील नरेन आणि शुभमन गिल हे चांगल्या लयीत असून संघासाठी महत्त्वाचे योगदान देत आहेत. नरेन हा गोलंदाजीसह फलंदाजीतही मोठी भूमिका निभावत असल्याने तो कोलकातासाठी अत्यंत मौल्यवान खेळाडू ठरत आहे. दोन्ही संघांनी एकमेकांशी खेळताना ७ वेळा विजय आणि ७ पराभव पत्करले आहेत. त्यामुळे हा सामना हा यंदाच्या मोसमातील उत्कंठावर्धक सामना ठरण्याची चिन्हे आहेत.

  • सामन्याची वेळ : रात्री ८ वा.
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स