आयपीएलच्या तेराव्या हंगामात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने पुन्हा एकदा आपल्या लौकिकाला साजेसा खेळ केला आहे. दुबईच्या मैदानावर झालेल्या सामन्यात एबी डिव्हीलियर्सच्या फटकेबाजीच्या जोरावर RCB ने राजस्थान रॉयल्सवर ७ गडी राखून मात केली. १७८ धावांचा पाठलाग करताना RCB कडून डिव्हीलियर्सने अखेरच्या षटकांमध्ये चौकार-षटकारांचा पाऊस पाडत २२ चेंडूत १ चौकार आणि ६ षटकार लगावले. एका क्षणाला RCB चा संघ पिछाडीवर पडलेला दिसत असताना डिव्हीलियर्सने राजस्थानच्या गोलंदाजांचा समाचार घेत एका क्षणात सामन्याचं चित्रच पालटलं.

या खेळीनंतर सोशल मीडियावर डिव्हीलियर्सचं कौतुक होत आहे. भारतीय संघाचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवागनेही डिव्हीलियर्सचं कौतुक करत IPL चा प्रसिद्ध लोगो हा एबी डिव्हीलियर्सच्या फलंदाजीच्या शैलीसारखा असल्याचं म्हटलं आहे.

१७८ धावांचा पाठलाग करताना RCB च्या संघाची सुरुवात खराब झाली. फिंच लवकर माघारी परतल्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि देवदत पडीकलने महत्वपूर्ण भागीदारी करत संघाचा डाव सावरला. मात्र यादरम्यान धावांची गती कायम न राखल्यामुळे RCB ला अखेरच्या षटकांमध्ये विजयासाठी मोठं आव्हान होतं. त्यातच पडीकल आणि कोहली एकापाठोपाठ एक माघारी परतल्यामुळे RCB अडचणीत सापडलं होतं. परंतू डिव्हीलियर्सने याचं दडपण न येऊ देता राजस्थानच्या गोलंदाजांचा समाचार घेत सामन्याचं पारडं RCB च्या दिशेने झुकवलं.