बंगळुरूविरूद्धच्या सामन्यात राजस्थानच्या संघाने २० षटकात १७७ धावांपर्यंत मजल मारली. स्टीव्ह स्मिथचं दमदार अर्धशतक आणि रॉबिन उथप्पाला गवसलेला सूर यांच्या बळावर राजस्थानने बंगळुरूला १७८ धावांचे लक्ष्य दिले. राजस्थानकडून स्मिथने ३६ चेंडूत ५७ धावांची तडाखेबाज खेळी केली.

नाणेफेक जिंकून राजस्थानचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने प्रथम फलंदाजी निर्णय घेतला. बेन स्टोक्ससोबत सलामीला रॉबिन उथप्पाला पाठवण्यात आले. हा डाव चांगलाच यशस्वी ठरला. सलामीवीर बेन स्टोक्स १५ धावांवर बाद झाला. पण उथप्पाने ७ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने एकूण २२ चेंडूत ४१ धावा कुटल्या. चहलच्या गोलंदाजीवर उथप्पा झेलबाद झाला. त्याच्या पुढच्याच चेंडूवर संजू सॅमसनही स्वस्तात परतला. चहलने दोन चेंडूत दोन बळी घेतल्यावर त्याची होणारी पत्नी धनश्री वर्मा हिने स्टेडियममध्ये उभं राहून टाळ्या वाजवल्या.

पाहा व्हिडीओ-

त्यानंतर कर्णधार स्टीव्ह स्मिथने चांगली खेळी केली. त्याला जोस बटलरने साथ दिली. बटलर २४ धावांवर बाद झाला. स्मिथने मात्र अर्धशतकी खेळी केली. त्याने ३६ चेंडूत ६ चौकार आणि १ षटकार खेचत ५७ धावा केल्या. शेवटच्या षटकांत राहुल तेवातियाने ११ चेंडूत १९ धावा करत संघाला १७७ पर्यंत नेले. ख्रिस मॉरिसने अप्रतिम गोलंदाजी करत २६ धावांत ४ बळी घेतले. तर चहलने ३४ धावांत २ बळी टिपले.