आयपीएलच्या तेराव्या हंगामात चेन्नई सुपरकिंग्ज संघासमोरच्या अडचणी काही केल्या कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाही. सततच्या पराभवांमुळे गुणतालिकेत तळातल्या स्थानावर फेकल्या गेलेल्या चेन्नईला आणखी धक्का बसला आहे. संघाचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होने दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली असून तो लवकरच आपल्या घरी जाणार आहे. तेराव्या हंगामात चेन्नईचं आव्हान जवळपास संपुष्टात आल्यात जमा आहे.

दिल्ली डेअरडेविल्स विरुद्ध सामन्यात खेळत असताना ब्राव्होला दुखापत झाली होती. यानंतर चेन्नईच्या संघ व्यवस्थापनाने राजस्थानविरुद्धच्या सामन्यात ब्राव्होला विश्रांती दिली. मात्र दुखापतीचं गंभीर स्वरुप पाहता ब्राव्होने स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. CSK चे सीईओ काशी विश्वनाथन यांनी News18 वृत्तवाहिनीशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला असून तो लवकरच आपल्या घरी जाणार असल्याचं विश्वनाथन यांनी सांगितलं.

अवश्य वाचा – BLOG : धोनीकडून पळवाट शोधण्याचा प्रयत्न??

एरवी नेहमी अंतिम फेरीच्या शर्यतीत असणारा चेन्नईचा संघ यंदा चांगलाच संकटात सापडला. स्पर्धेला सुरुवात होण्याआधी रैना-हरभजन यांनी घेतलेली माघार, खेळाडूंना झालेली करोनाची लागण, स्पर्धेदरम्यान प्रमुख खेळाडूंचं दुखापतग्रस्त असणं यामुळे हा संघ आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करु शकला नाही. त्यातच ब्राव्होच्या जाण्यामुळे चेन्नईचं स्पर्धेतलं आव्हान आता संपुष्टात आल्याचं मानलं जात आहे.