अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेला सामना, विजयासाठी शेवटच्या षटकांत हव्या असलेल्या धावा, फलंदाजांनी फटकेबाजी असा उत्कंठावर्धक माहोल प्रेक्षकांना आयपीएलच्या तेराव्या हंगामातील दुसऱ्याच सामन्यात पहायला मिळाला आहे. दुबईच्या मैदानावर रंगलेल्या दिल्ली विरुद्ध पंजाब सामन्यात, दिल्लीने सुपरओव्हरमध्ये बाजी मारली. पंजाबला विजयासाठी १५८ धावांचं आव्हान दिलेलं असताना, दिल्लीने अखेरच्या षटकांत सामना बरोबरीत राखण्यात यश मिळवलं. निर्धारित वेळेत सामना बरोबरीत सुटल्यामुळे सामन्याचा निकाल सुपरओव्हरवर गेला.

आयपीएलच्या इतिहासातली ही दहावी सुपरओव्हर ठरली. कगिसो रबाडाने भेदक मारा करत पंजाबच्या दोन फलंदाजांना माघारी धाडत अवघ्या २ धावा दिल्या. त्यामुळे विजयासाठी आवश्यक असलेल्या ३ धावा सहज पूर्ण करत दिल्लीने सामन्यात बाजी मारली. याआधी २०१९ च्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धचा सामना दिल्लीने सुपरओव्हरमध्ये जिंकला होता. महत्वाची गोष्ट म्हणजे या सामन्यातही रबाडानेच दिल्लीला विजय मिळवून दिला होता.

दरम्यान पंजाबकडून मयांक अग्रवालने निर्धारीत वेळेत फटकेबाजी करत ८९ धावा केल्या. त्याच्या या अर्धशतकी खेळीत ७ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. परंतू अखेरच्या षटकांत उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नात मयांक माघारी परतला आणि पंजाबला हातात आलेला विजय सोडून बरोबरीत समाधान मानावं लागलं. यानंतर सुपरओव्हरमध्येही पंजाबने मयांकला संधी न दिल्यामुळे सर्वच स्तरातून नाराजी व्यक्त होत आहे.