आयपीएलच्या तेराव्या हंगामात चेन्नई सुपरकिंग्जच्या संघाची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. एरवी अंतिम फेरीच्या शर्यतीत असणारा चेन्नईचा संघ यंदा गुणतालिकेत खाली फेकला गेला आहे. सर्वात आधी रैना आणि हरभजनची अनुपस्थिती आणि त्यानंतर प्रमुख खेळाडूंचं फॉर्मात नसणं चेन्नईला चांगलंच भोवतानाा दिसतंय. त्यात इम्रान ताहीर सारख्या अनुभवी फिरकीपटूला चेन्नईने यंदा संघात खेळण्याची संधी दिलेली नाही. २०१९ साली सर्वाधिक बळी घेत आयपीएलमध्ये पर्पल कॅपचा मानकरी ठरलेल्या इम्रान ताहीरला काही दिवसांपूर्वी राखीव खेळाडूंची जर्सी घालून सहकाऱ्यांसाठी ड्रिंक्स घेऊन जाताना मैदानात चाहत्यांनी पाहिलं.

यानंतर सोशल मीडियावर ताहीरचा फोटो व्हायरल झाला ज्यात चेन्नईच्या चाहत्यांनी अनुभवी खेळाडूला अद्याप संघात जागा मिळत नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. मात्र इम्रान ताहीरने याबद्दल आपलं मत मांडलं आहे. मला संधी मिळण्यापेक्षा संघ विजयी होणं गरजेचं आहे. मी खेळत असताना माझ्यासाठी कोणीतरी ड्रिंक्स घेऊन यायचे…सध्या हे काम मला करावं लागतंय. आपल्या सहकाऱ्यांसाठी ड्रिंक्स घेऊन जाण्यात कसली शरम?? अशा आशयाचं ट्विट ताहीर केलं आहे.

दरम्यान चेन्नई सुपरकिंग्जला यंदा प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवायचं असल्यास उर्वरित सर्व सामन्यांमध्ये मोठ्या विजयाची गरज आहे. एक-दोन सामन्यांमध्येही चेन्नईचा पराभव झाला तर त्यांचं यंदाच्या हंगामातलं आव्हान संपुष्टात येऊ शकतं. चेन्नई सुपरकिंग्जचे सीईओ काशी विश्वनाथन यांनीही दुसऱ्या टप्प्यात ताहीरला संघात संधी मिळेल असं आश्वासन दिलं होतं.