वरुण चक्रवर्तीची फिरकी आणि पॅट कमिन्ससह इतर गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सवर ५९ धावांनी मात केली आहे. या विजयासह KKR ने प्ले-ऑफच्या शर्यतीत आपलं आव्हान कायम राखल्यामुळे आता यापुढील संघांमध्ये रंगणारे सामने अधिक रंगतदार होणार आहेत. विजयासाठी दिलेल्या १९५ धावांचा पाठलाग करताना दिल्लीचा संघ १३५ धावांपर्यंतच मजल मारु शकला. कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांच्यात झालेल्या भागीदारीचा अपवाद वगळता दिल्लीच्या सर्व फलंदाजांनी आज निराशा केली. वरुण चक्रवर्तीने दिल्लीचा निम्मा संघ गारद केला.

विजयासाठी मोठं आव्हान मिळालेल्या दिल्लीची सुरुवातच खराब झाली. सलामीवीर अजिंक्य रहाणे शून्यावर माघारी परतला. पॅट कमिन्सने पहिल्याच षटकात अजिंक्यला माघारी धाडलं. यानंतर गेल्या तीन सामन्यांमध्ये चांगली खेळी करणारा शिखर धवन कोलकात्याविरुद्ध अपयशी ठरला. पॅट कमिन्सने शिखरचा त्रिफळा उडवत दिल्लीला दुसरा धक्का दिला. यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांनी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. दोघांनीही तिसऱ्या विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी केली. दोन्ही फलंदाजाचे पाय मैदानात स्थिरावले असं वाटत असतानाच ऋषभ पंतने वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात आपली विकेट फेकली, त्याने २७ धावा केल्या.

यानंतर दिल्लीच्या डावाला लागलेली गळती थांबलीच नाही. शेमरॉन हेटमायरही वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाला. त्याच षटकात वरुणने दिल्लीचा कर्णधार श्रेयसला माघारी धाडत प्रतिस्पर्धी संघाच्या उरल्या सुरल्या आशांवरही पाणी फिरवलं. अय्यर ४७ धावा काढून माघारी परतला. स्टॉयनिस आणि अक्षर पटेलही मोठे फटके खेळताना वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर विकेट गमावून बसले. यानंतर सामन्यात विजय मिळवणं ही कोलकात्यासाठी औपचारिकता होऊन बसली. KKR कडून वरुण चक्रवर्तीने ५ तर पॅट कमिन्सने ३ आणि लॉकी फर्ग्युसनने १ बळी घेतला.

त्याआधी, सलामीवीर नितीश राणा आणि अष्टपैलू सुनिल नारायण यांच्या धडाकेबाज अर्धशतकी खेळीच्या जोरावर KKR ने दिल्लीविरुद्ध सामन्यात १९४ धावांपर्यंत मजल मारली. शुबमन गिल, राहुल त्रिपाठी आणि दिनेश कार्तिक हे फलंदाज झटपट माघारी परतल्यानंतरही नितीश राणा आणि सुनिल नारायणने चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. दोन्ही फलंदाजांनी दिल्लीच्या गोलंदाजांचे मनसुबे उधळून लावत KKR ला सन्मानजनक आश्वासक उभारुन दिली.

नाणेफेक जिंकून दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीच्या गोलंदाजांनी धडाकेबाज सुरुवात करत कोलकाता नाईट रायडर्सला धक्के दिले नॉर्जने शुबमन गिल आणि राहुल त्रिपाठीचा अडसर दूर केला. यानंतर कगिसो रबाडाने दिनेश कार्तिकला माघारी धाडत दिल्लीला आणखी एक यश मिळवून दिलं. कोलकाता नाईट रायडर्सचा संघ पुन्हा एकदा अडचणीत सापडलेला दिसत असताना सलामीवीर नितीश राणा आणि सुनिल नारायण यांनी महत्वपूर्ण भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. नितीश आणि नारायणने दिल्लीच्या गोलंदाजांवर हल्लाबोल करत धावसंख्या वाढेल याकडे भर दिला. महत्वाची गोष्ट म्हणजे नितीश राणा आणि सुनिल नारायण हे दोन्ही खेळाडू गेल्या काही सामन्यांपासून खराब कामगिरीमुळे चर्चेत होते. परंतू मोक्याच्या क्षणी दोन्ही फलंदाजांना सूर गवसल्यामुळे कोलकात्याच्या डावाला आकार आला.

दोन्ही फलंदाजांनी चौथ्या विकेटसाठी ११५ धावांची भागीदारी केली. नितीश राणा आणि सुनिल नारायण यांनी दरम्यानच्या काळात आपलं अर्धशतकही साजरं केलं. अखेरीस कगिसो रबाडाने सुनिल नारायणला माघारी धाडत KKR ची जमलेली जोडी फोडली. नारायणने ३२ चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकारांसह ६४ धावा केल्या. नितीश राणानेही ५३ चेंडूत ८१ धावांची खेळी करत संघाचं पारडं जड राहण्याची मोलाची भूमिका बजावली. सुनिल नारायण माघारी परतल्यानंतर नितीश राणाने मॉर्गनच्या साथीने संघाला धावांचा टप्पा गाठून दिला. दिल्लीकडून नॉर्ज, स्टॉयनिस आणि रबाडाने प्रत्येकी २-२ बळी घेतले.