इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) शनिवारी कोलकाता नाइट रायडर्सचा दुसरा सामना सनरायजर्स हैदराबादशी होणार असून, कर्णधार दिनेश कार्तिकच्या रणनीतीकडे सर्वाचे लक्ष असेल.

नव्याने रचना करण्यात आलेल्या कोलकाता संघाकडून यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये मोठय़ा अपेक्षा करण्यात येत आहेत. परंतु मागील चुकांमधून कार्तिकने कोणताही धडा घेतलेला दिसत नाही. त्याच्या काही चुकीच्या निर्णयांमुळेच पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने कोलकाताला पूर्णत: निष्प्रभ केले.

गोलंदाजीचे निर्णय घेतानाही फिरकीपटू सुनील नरिनला योग्य वेळी पाचारण करण्यात कार्तिक अपयशी ठरला. रोहित शर्मा स्थिरावल्यावर नरिनकडे चेंडू देण्यात आला. ‘आयपीएल’ लिलावात सर्वाधिक बोली लागलेला पॅट कमिन्स अतिशय महागात पडला.

दुसरीकडे, हैदराबादच्या पहिल्या सामन्यात मधल्या फळीतील उणिवा प्रकर्षांने जाणवल्या. अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्शच्या दुखापतीमुळे हैदराबादच्या चिंतेत वाढ झाली आहे. आता केन विल्यम्सन दुखापतीतून सावरला तर हैदराबादची फलंदाजीची फळी अधिक मजबूत होऊ शकेल. भुवनेश्वर कु मारच्या नेतृत्वाखाली हैदराबादचा गोलंदाजीचा मारा समतोल आहे. रशीद खानच्या साथीला मोहम्मद नबीलाही संधी मिळू शकते.

रसेलचा क्रमांक बदलणार ? कोलकाताने ४९ धावांनी पराभव पत्करल्यानंतर धडाके बाज फलंदाज आंद्रे रसेलच्या फलंदाजीच्या स्थानाविषयी पुन्हा चर्चा रंगते आहे. गतहंगामात रसेलने ५१० धावा के ल्या होत्या. परंतु मुंबईविरुद्धच्या सामन्यात रसेल सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला, तेव्हा समीकरण बिकट झाले होते.

* सामन्याची वेळ : सायं. ७:३० वा.

*  थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी, स्टार स्पोर्ट्स  सिलेक्ट १