शारजाच्या मैदानात रविवारी पुन्हा एकदा षटकार आणि चौकारांचा पाऊस पडला. राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांची धुलाई करत मयांक अग्रवाल आणि लोकेश राहुल या किंग्ज इलेव्हन पंजाबच्या सलामीच्या जोडीने १८३ धावांची भागीदारी केली. मयांक अग्रवालने या सामन्यात आयपीएलमधल्या आपल्या पहिल्या शतकाची नोंद केली. राजस्थानच्या गोलंदाजांवर हल्लाबोल करत मयांकने मैदानात चौफेर फटकेबाजी केली. ५० चेंडूत १० चौकार आणि ७ षटकार लगावत मयांकने १०६ धावा केल्या. टॉम करनने मयांकला माघारी धाडत राजस्थानची पहिली जोडी फोडली.

मयांकने या सामन्यात आपलं पहिलं शतक झळकावलं, परंतू एका महत्वाच्या विक्रमाने मयांकला हुलकावणी दिली. आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबकडून सर्वात जलद शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत मयांक दुसऱ्या स्थानी पोहचला. त्याने ४५ चेंडूत शतक झळकावलं. याआधी डेव्हिड मिलरने पंजाबकडून खेळताना ३८ चेंडूत शतक झळकावलं होतं. अवघ्या ७ चेंडूंनी मयांकचा महत्वाचा विक्रम हुकला.

दरम्यान मयांक मैदानात फटकेबाजी करत असताना कर्णधार लोकेश राहुलने एक बाजू लावून धरली. ५४ चेंडूत ७ चौकार आणि एका षटकारासह राहुलने ६९ धावा केल्या. अंकीत राजपूतने राहुलला बाद केलं.