IPL 2020 CSK vs KXIP: सलग तीन पराभवांमुळे टीकेचे लक्ष्य ठरलेल्या चेन्नईच्या संघाची गाडी अखेर रविवारी रूळावर आली. पंजाबविरूद्धच्या सामन्यात चेन्नईच्या संघाने निर्विवाद वर्चस्व राखत दणदणीत विजय मिळवला. कर्णधार लोकेश राहुलच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पंजाबने चेन्नईला १७९ धावांचे लक्ष्य दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर शेन वॉटसन आणि फाफ डु प्लेसिस या दोघांनी पंजाबच्या गोलंदाजांची प्रचंड धुलाई केली. पंजाबच्या गोलंदाजांना घाम फोडत या दोघांनी चेन्नईसाठी IPLमधील सर्वोत्तम सलामी दिली आणि १० गडी राखत संघाला विजय मिळवून दिला.

या आव्हानाचा पाठलाग करताना वॉटसन आणि डु प्लेसिस या दोघांनी तुफान फटकेबाजी केली. पंजाबकडून ख्रिस जॉर्डन ११वे षटक टाकायला आला. त्या षटकात चौकार मारत आधी शेन वॉटसनचे आपलं अर्धशतक पूर्ण केलं. जॉर्डनच्या पहिल्या दोन चेंडूवर चौकार लगावत त्याने ३१ चेंडूत अर्धशतक ठोकलं. IPLमधील हे वॉटसनचं विसावं अर्धशतक ठरलं. त्याने माजी ऑस्ट्रेलियन फलंदाज शॉन मार्शच्या विक्रमाशी बरोबरी केली. त्याच षटकात पाचव्या चेंडूवर एकेरी धाव घेत डु प्लेसिसने ३३ चेंडूत अर्धशतक ठोकलं. त्याचं हे IPLमधलं १५वं अर्धशतक ठरलं. त्याने कायरन पोलार्ड आणि मायकल हसीच्या कामगिरीशी बरोबरी साधली. या दोघांनी आपली विकेट न गमावता संघाला १७९ धावांचं लक्ष्य सहज गाठून दिलं. डु प्लेसिसने नाबाद ८७ तर वॉटसनने नाबाद ८३ धावा केल्या. चेन्नईच्या संघाची ही IPL इतिहासातील सर्वोत्तम सलामी भागीदारी ठरली.

त्याआधी, पंजाबच्या डावात कर्णधार राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी अर्धशतकी सलामी दिली. मयंक अग्रवालला चांगली सुरूवात मिळाली पण तो २६ धावांवर तो बाद झाला. आज संधी मिळालेला मनदीप सिंगदेखील चांगल्या सुरूवातीनंतर २७ धावांवर माघारी परतला. त्यानंतर निकोलस पूरन आणि राहुल यांनी दमदार भागीदारी करून संघाला स्थैर्य दिले. या दोघांनी ५८ धावांनी भागीदारी केली. याचदरम्यान राहुलने आपले अर्धशतक पूर्ण केले. या दोघांच्या फटकेबाजीकडे पाहता पंजाब २००पार पोहोचणार असं वाटत असतानाच शार्दूल ठाकूरने दोन चेंडूत या दोघांना बाद केलं आणि चेन्नईला सामन्यात परत आणलं. ग्लेन मॅक्सवेल आणि सर्फराज यांना शेवटच्या तीन-चार षटकांत अपेक्षित फटकेबाजी जमली नाही, त्यामुळे पंजाबला दोनशेपार मजल मारता आली नाही.