IPL 2020 KXIP vs RCB: अतिशय रोमांचक अशा सुपर ओव्हरमध्ये आपला पहिला सामना गमावलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबने गुरूवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी दोन हात केले. सामन्यात कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. गेल्या सामन्यात विजय प्राप्त करणाऱ्या संघात एकही बदल न करता त्याने मैदानात उतरणं पसंत केलं. पण पंजाबकडून मात्र दोन बदल करण्यात आले. पहिल्या सामन्यात खेळलेले कृष्णप्पा गौतम आणि ख्रिस जॉर्डन यांना संघाबाहेर करत मुरूगन अश्विन आणि जिमी नीशम यांना संघात स्थान देण्यात आले.

मैदानावर उतरताना सर्व खेळाडूं दंडावर काळ्या रंगाच्या रिबन्स लावून उतरल्याचे दिसले. अनेकांना प्रश्न पडला की या फिती का लावल्या आहेत. याचं कारण सुप्रसिद्ध ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज आणि प्रसिद्ध समालोचक डीन जोन्स यांचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते. IPLमधील एक प्रसिद्ध समालोचक म्हणून भारतीय चाहते जोन्स यांना ओळखायचे. गुरूवारी दुपारच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले.

“डीन मर्व्हिन जोन्स यांचे आज निधन झाले. अचानक गुरूवारी त्यांना हृदयविकाराच्या झटका आणि त्यांचा मृत्यू झाला. डीन जोन्स हे दक्षिण आशियामधील क्रिकेटच्या विकासासाठी बराच काळ झटत होते. ते या विभागातील क्रिकेटचे सदिच्छादूत होते. नव्या दमाच्या प्रतिभावान खेळाडूंना शोधणे आणि त्यांच्यातून तरुण नवे क्रिकेटर्स तयार करणे हे त्यांच्या जीवनाचं ध्येय होतं. डीन जोन्स हे एक ‘चॅम्पियन’ समालोचक होते. त्यांच्या समालोचनाच्या खेळकर शैलीने त्यांनी अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य खुलवले. जगभरातील त्यांचे कोट्यवधी चाहते आज नाराज असतील आणि त्यांना मिस करत असतील”, अशा शब्दात स्टार इंडियाने डीन जोन्स यांना आदरांजली वाहिली.