दुबईच्या मैदानावर रंगलेल्या आयपीएलच्या तेराव्या हंगामातील दुसऱ्याच सामन्यात दिल्लीने संघर्षपूर्ण लढतीत विजय मिळवला. पंजाबला विजयासाठी १५८ धावांचं आव्हान दिल्यानंतर एका क्षणाला मयांक अग्रवालच्या फटकेबाजीमुळे दिल्ली सामना हरणार असं चित्र तयार झालं होतं. मात्र अष्टपैलू स्टॉयनिसने अखेरच्या षटकांत भेदक मारा करत दोन बळी घेत सामना बरोबरीत सोडवला. निर्धारित वेळेत सामना बरोबरीत सुटल्यामुळे सुपरओव्हर खेळवण्यात आली.

दिल्लीकडून दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी गोलंदाज कगिसो रबाडाने ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत अवघ्या २ धावा देत २ फलंदाजांना माघारी धाडलं. रबाडाने लोकेश राहुल आणि निकोलस पूरनला माघारी धाडत दिल्लीची बाजू वरचढ केली. यानंतर ऋषभ पंतने विजयासाठी आवश्यक असलेल्या ३ धावा सहज पूर्ण करत विजयावर शिक्कामोर्तब केलं. या विक्रमी कामगिरीसह रबाडाच्या नावावर अनोख्या विक्रमाची नोंद झाली आहे. आयपीएलच्या इतिहासात दोनवेळा सुपरओव्हर टाकून दोन्ही वेळा संघाला विजय मिळवून देणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत रबाडाला स्थान मिळालं आहे.

२०१९ साली कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध रबाडाने अशी कामगिरी केली होती. यानंतर तेराव्या हंगामात आपल्या संघाकडून पहिलाच सामना खेळताना रबाडाने जसप्रीत बुमराहच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.