राहुल तेवतियाच्या रुपाने राजस्थान रॉयल्सला तेराव्या हंगामात एक चांगला अष्टपैलू खेळाडू मिळाला आहे. पहिल्या दोन विजयानंतर राजस्थानची स्पर्धेतली कामगिरी फारशी चांगली झालेली नाही, सध्या संघ गुणतालिकेत अखेरच्या स्थानांवर आहे. परंतू तेवतियाने आतापर्यंत मिळालेल्या संधीचं सोनं करत फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही क्षेत्रात आपली चमक दाखवली आहे. पंजाब आणि हैदराबादविरुद्धचा सामना राजस्थान गमावणार असं वाटत असतानाच तेवतियाने फटकेबाजी करत तो संघाला जिंकवून दिला होता.

दुबईच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध सामन्यातही तेवतियाने आपली चमक दाखवली. फलंदाजीत अखेरच्या षटकांमध्ये संधी मिळाल्यानंतर तेवतियाने कर्णधार स्टिव्ह स्मिथला भक्कम साथ दिली. यानंतर गोलंदाजीदरम्यान तेवतियाने RCB च्या देवदत पडीकलला माघारी धाडत संघाला महत्वाचं यश मिळवून दिलं. यानंतर काही क्षणांमध्येच तेवतियाने सीमारेषेवर विराट कोहलीचा सुरेख झेल पकडला. तेवतियाचा हा अष्टपैलू खेळ पाहून भारताचा माजी खेळाडू सेहवाग चांगलाच प्रभावित झाला आहे. सध्या ज्या पद्धतीने तेवतिया खेळतोय ते पाहता त्याला करोनावरची लस बनवण्याची संधी दिली तर तो ती देखील बनवेल असं सेहवागने म्हटलं आहे.

दरम्यान, राजस्थानने कर्णधार स्टिव्ह स्मिथने झळकावलेल्या अर्धशतकाच्या जोरावर १७७ धावांपर्यंत मजल मारली.