सुमारे वर्षभर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दुरावलेल्या महेंद्रसिंह धोनीने १५ ऑगस्टला निवृत्ती स्विकारली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला असला तरीही धोनी पुढचे काही हंगाम आयपीएल खेळत राहणार आहे. गेल्या काही दिवसांपासून धोनीची फलंदाजी संथ झाली आहे, तो पूर्वीसारखी फटकेबाजी करत नाही अशी चर्चा सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांमध्ये रंगताना दिसत आहे. परंतू असं असलं तरीही यष्टीरक्षक म्हणून धोनी आजही सर्वोत्तम आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.

कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध सामन्याच चेन्नईच्या गोलंदाजांनी दमदार पुनरामन करत आपल्या संघाला विजयासाठी १६८ धावांचं आव्हान दिलं. राहुल त्रिपाठीचा अपवाद वगळचा KKR चा एकही फलंदाज चेन्नईच्या गोलंदाजांचा सामना करु शकला नाही. KKR च्या अखेरच्या फळीत शिवम मवी फलंदाजी करत असताना धोनीने धावा जावू नयेत यासाठी एक ग्लोव्ह्ज काढून किपींक करणं पसंत केलं. ठरल्याप्रमाणे ब्राव्होच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करायला गेलेल्या शिवम मवीच्या बॅटची कड घेऊन चेंडू सीमारेषेकडे जात होता. परंतू धोनीने हा सुरेख झेल पकडत मवीला माघारी धाडलं. पाहा धोनीचा हा भन्नाट कॅच…

दरम्यान, KKR चे इतर फलंदाज माघारी परतत असतानाही राहुल त्रिपाठीने एक बाजू लावून धरली. चेन्नईच्या गोलंदाजांचा नेटाने सामना करत राहुलने आपलं अर्धशतक झळकावलं. अखेरच्या षटकांत भरवशाचे फलंदाज स्वस्तात माघारी परतत असतानाही त्रिपाठी एक बाजू सांभाळत मैदानावर पाय रोवून उभा राहिला. मधल्या षटकांमध्ये राहुलने फटकेबाजी करत कोलकात्याला आश्वासक धावसंख्या गाठून दिली. अखेरच्या षटकांत ब्राव्होच्या गोलंदाजीवर तो देखील शेन वॉटसनकडे झेल देऊन माघारी परतला. ५१ चेंडूत ८ चौकार आणि ३ षटकारांच्या सहाय्याने राहुलने ८१ धावा केल्या. यानंतर अखेरच्या फळीतल्या फलंदाजांनी KKR ला १६७ धावांचा टप्पा गाठून दिला. चेन्नईकडून ब्राव्होने ३ तर शार्दुल ठाकूर, सॅम करन आणि कर्ण शर्मा यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले.