आयपीएलच्या तेराव्या हंगामात आव्हान संपुष्टात आलेल्या चेन्नई सुपरकिंग्जने धडाकेबाज खेळ करत इतर संघाचं गणित बिघडवण्याचं ठरवलेलं दिसतंय. दुबईच्या मैदानावर गुरुवारी झालेल्या रंगतदार सामन्यात चेन्नईने कोलकात्यावर ६ गडी राखून मात केली. चेन्नईच्या या विजयाचा फायदा मुंबई इंडियन्सला झाला असून त्यांना प्ले-ऑफचं तिकीट मिळालं आहे. परंतू त्यामुळे चौथ्या स्थानावर पंजाब, राजस्थान, हैदराबाद, कोलकाता यांच्यातली शर्यत आता अधिकच रंगतदार झाली आहे.

आरसीबीला धूळ चारणाऱ्या चेन्नई संघानं कोलकाता संघाचा पराभव केला. त्यामुळे प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी कोलकाता संघाची वाट अधिकच बिकट झाली आहे. कोलकाता संघाला अद्यापही प्ले ऑफमध्ये पोहचण्याची संधी आहे. मात्र, त्यांना इतर संघाचा जय-पराजयावर अवलंबून राहावं लागेल. गुणतालिकेत कोलकाता सध्या पाचव्या स्थानावर आहे. कोलकातानं १३ पैकी सहा सामन्यात विजय मिळवत १२ गुणांची कमाई केली आहे. कोलकाताचा नेट रन रेट इतर संघाच्या तुलनेत खराब आहे. प्ले ऑफसाठी नेट रन रेट कोलकाताची डोकेदुखी ठरु शकतो.

अशी असतील समिकरणं-
कोलकाता संघाच्या नावावर सध्या १२ गुण आहेत. त्यांचा फक्त एक सामना बाकी आहे. म्हणजेच कोलकाता संघ जास्तित जास्त १४ गुणांपर्यंत मजल मारु शकतो. अशात प्ले ऑफमध्ये प्रवेश करणं कठीण आहे. नेट रन रेटवर निर्णय न होण्यासाठी इतर संघाच्या जय-पराजयावर कोलकाता संघाला आवलंबून राहावं लागेल.

पंजाब उर्वरीत दोन्ही सामन्यात पराभूत झाल्यास कोलकाताला क्वालिफाय होण्याची जास्त संधी आहे. तसेच राजस्थान आणि हैदराबाद यांना उर्वरित सामन्यापैकी फक्त एका सामन्यात विजय मिळावा. अशा परिस्थितीत कोलकाता संघ गुणतालिकेत १४ गुणासह चौथ्या क्रमांकावर राहिल.

नेट रनरेटच्या बाबतीत कोलकाता तळाशी आहे. त्यांच्याखाली फक्त राजस्थानचा संघ आहे. पण उर्वरीत सामने जिंकून राजस्थान नेट रनरेट सुधारु शकतो.