News Flash

पंचाच्या ‘त्या’ निर्णयाविरोधात पंजाब संघाची रेफरीकडे तक्रार

सामना रंगात असताना एक धाव शॉर्ट दिली

रविवारी दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब (Delhi Capitals Vs kings Xi Punjab) यांच्यात झालेला सामन्यात पंचाच्या एका चुकीच्या निर्णयाची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरु आहे. पंजाबच्या फलंदाजीवेळी पंचाने एक धाव शॉर्ट दिली होती. पंचाच्या या निर्णयावर अनेक दिग्गज क्रिकेटर आणि तज्ज्ञांनी नाराजी व्यक्त केली आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, पंजाब संघानं पंचाच्या या चुकीच्या निर्णयाची तक्रार सामन्याच्या रेफरीकडे केली आहे.

भारताचा माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ पंजाब आणि दिल्लीच्या या सामन्याचे रेफरी होते. पंजाब आणि दिल्ली यांच्यातील सामना टाय झाला. सुपर ओवरमध्ये दिल्लीने बाजी मारली. पण पंजाब फलंदाजी करत असताना १९ व्या षटकांत पंत नितिन मेनन यांनी एक धाव शॉर्ट दिली. पंच नितिन मेनन यांच्यामते फलंदाज क्रिस जॉर्डनने एक धाव शॉर्ट घेतली होती.

एएनआयने सूत्रांच्या हवाल्यानं दावा केलाय की, पंजाब संघाने पंच नितिन मेनन यांची सामन्याच्या रेफरीकडे तक्रार केली आहे. पंचाच निर्णय चकित करणारा असून त्यामुळेच सामना टाय झाला आहे. या सामन्याचे रेफरी जवागल श्रीनाथ यांनी या तक्रारीलर विचार करणार असल्याचं सांगितलेय. शिवाय पंचाचा निर्णय चुकीचा निघाल्यास आयपीएल गर्विंग काउंसिल कारवाई करु शकते. माजी क्रिकेटर आणि तज्ज्ञांच्या मते, शॉर्ट धावा देताना पंच गोंधळलेले होते, तर त्यांनी तिसऱ्या पंचाची मदत का घेतली नाही?

नेमकं काय झालं होतं?
धावांचा पाठलाग करत असताना १८ व्या षटकात पंजाबच्या क्रिस जॉर्डनने काढलेल्या दोन धावांपैकी एक धाव पंचांनी शॉर्ट रन म्हणजे फलंदाजाने बॅट पूर्णपणे क्रिजमध्ये न टेकवल्याने ग्राह्य धरली जाणार नाही असं जाहीर केलं. मात्र रिप्लेमध्ये जॉर्डनने क्रिजच्या आतमध्ये बॅट टेकवल्याने दिसत होते.

सेहवागही संतापला
“मला आजच्या समन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पटलेला नाही. ज्या पंचांनी ही धाव शॉर्ट रन घोषित केली त्यांना मॅन ऑफ द मॅच पुरस्कार द्यायला हवा. हा शॉर्ट रन नव्हता. आणि याच एका धावेचा फरक नंतर पडला,”

संघ मालकीण प्रितीची प्रतिक्रिया
सेहवागने ट्विट केलेल्या फोटोला रिट्विट करुन आपली प्रतिक्रिया नोंदवताना संघ मालकीण प्रिती झिंटाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “(करोनाची) साथ सुरु असतानाही मी उत्साहामध्ये प्रवास करुन इथपर्यंत आले. सहा दिवस क्वारंटाइन राहिले. करोनाच्या पाच चाचण्यांना अगदी हसत हसत सामोरे गेले. मात्र या एका शॉर्ट रनच्या निर्णयामुळे मी दुखावले गेले. तंत्रज्ञान वापरता येत नसेल तर ते काय कामाचे आहे? हाच योग्य वेळ आहे याबद्दल निर्णय घेण्याचा. बीसीसीआयने नवीन नियम लागू करावेत. दरवर्षी हे असं होता कामा नये,” असं प्रितीने ट्विटरवरुन म्हटलं आहे.

सामन्याचा थरार –
अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेला सामना, विजयासाठी शेवटच्या षटकांत हव्या असलेल्या धावा, फलंदाजांनी फटकेबाजी असा उत्कंठावर्धक माहोल प्रेक्षकांना आयपीएलच्या तेराव्या हंगामातील दुसऱ्याच सामन्यात पहायला मिळाला आहे. दुबईच्या मैदानावर रंगलेल्या दिल्ली विरुद्ध पंजाब सामन्यात, दिल्लीने सुपरओव्हरमध्ये बाजी मारली. पंजाबला विजयासाठी १५८ धावांचं आव्हान दिलेलं असताना, दिल्लीने अखेरच्या षटकांत सामना बरोबरीत राखण्यात यश मिळवलं. निर्धारित वेळेत सामना बरोबरीत सुटल्यामुळे सामन्याचा निकाल सुपरओव्हरवर गेला. आयपीएलच्या इतिहासातली ही दहावी सुपरओव्हर ठरली. कगिसो रबाडाने भेदक मारा करत पंजाबच्या दोन फलंदाजांना माघारी धाडत अवघ्या २ धावा दिल्या. त्यामुळे विजयासाठी आवश्यक असलेल्या ३ धावा सहज पूर्ण करत दिल्लीने सामन्यात बाजी मारली. या सामन्यामध्ये दिल्लीने विजय मिळवल्यानंतर मार्कस स्टॉयनीसला समानावीर पुरस्कार प्रदान करण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2020 5:13 pm

Web Title: kings xi punjab lodge appeal over short run say could cost a playoff berth nck 90
टॅग : IPL 2020
Next Stories
1 चेन्नईला दिलासा, महिनाभरानंतर मराठमोळा फलंदाज मैदानावर
2 “सहा दिवस क्वारंटाइन राहिले, पाच वेळा करोना चाचण्यांना हसत हसत सामोरे गेले मात्र…”; प्रितीने व्यक्त केली नाराजी
3 “मॅन ऑफ द मॅच पुरस्कार चुकीच्या व्यक्तीला दिला, माझ्या मते…”, सेहवागने व्यक्त केली नाराजी
Just Now!
X